


✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.5मे):- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, इशारा अशी महत्त्वाचे दिशादर्शक ग्रंथ लिहिले. आपल्या ग्रंथरुपी साहित्यामधून त्यांनी धर्मावर परखड भाष्य केल्याचे दिसून येते. धर्म माणसाला गुलाम बनवतो. धर्म माणसांमध्ये भेदभाव निर्माण करतो. माणसाला हीन लेखतो. त्यामुळे धर्माची वारंवार चिकित्सा होणे गरजेची आहे. महात्मा फुले यांनी जात आणि वर्णव्यवस्था यांचे यांचे प्राबल्य असणाऱ्या विषमतावादी वैदिक हिंदू धर्माची धर्मचिकित्सा मानवमुक्तीसाठी केली असे प्रतिपादन डॉ. सोमनाथ कदम यांनी केले.
ते महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त सत्यशोधक इतिहास परिषद आणि मानवतावादी सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने वर्षभर प्रबोधनपर दोनशे व्याख्यानांचा संकल्प करण्यात आला असून या अंतर्गत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून सत्य हाच धर्म! करावा कायम!! ज्योती म्हणे! या विषयावर पहिले जाहीर व्याख्यान देतांना राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी बोलत होते.
अध्यक्षस्थानी असलेले इतिहास संशोधक डॉ. कपिल राजहंस म्हणाले, सध्याच्या सरकारला महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाची विसर पडला आहे. महात्मा फुले यांचे विचार जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचणार नाहीत याची काळजी सरकारच्या वतीने घेतली जात आहे. त्यामुळे महात्मा फुले यांचे क्रांतिकारी विचार समाजात पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने, अॅड. करुणा विमल, मदन पवार, लालासाहेब नाईक, विजय शिंगाडे, अंतिमा कोल्हापूरकर, आदित्य म्हमाने यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी आपला महाराष्ट्र उभा करण्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या आणि नाविन्यपूर्ण काहीतरी करणार्या विजय शिंगाडे, मदन पवार, विकास डावरे, आशा रावण, लालासाहेब नाईक, डॉ. आशा शितोळे, भगवान माने, देवीदास पांचाळ, संतोष कमते, प्रतिक्षा पाटील या मान्यवरांच्या हातांचा क्रियेटिव्ह हँड ऑफ महाराष्ट्रा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सुरेश केसरकर, डॉ. अनिल कवठेकर, अश्वजीत तरटे, मोहन मिणचेकर, तुषार नाईकनवरे, वृषाली कवठेकर, विमल पोखर्णीकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानवतावादी संस्कृती चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन अभिजीत मासुर्लीकर यांनी केले.














