Home चंद्रपूर भर उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; विद्यार्थी व पालकांना मोठा फटका

भर उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; विद्यार्थी व पालकांना मोठा फटका

34

▪️पालकांनी घेतला झाडांचा आसरा.

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.27एप्रिल):-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेली उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि. २६ एप्रिल २०२६) रोजी पार पडली. इयत्ता ४ थी व ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची परीक्षा असून, राज्यभरातील हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.

या परीक्षेचा पहिला पेपर सकाळी ११ ते १२:३० या वेळेत मराठी व गणित या विषयांचे एकूण ७५ प्रश्न १५० गुणांसाठी होता. त्यानंतर दुसरा पेपर दुपारी २ ते ३:३० या वेळेत इंग्रजी व बुद्धिमत्ता या विषयांचा होता त्यातही ७५ प्रश्न १५० गुणांसाठी ठेवण्यात आला होता. मात्र, एप्रिल महिन्यातील कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. विशेषतः दुपारच्या सत्रात परीक्षा असल्याने उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत होता.

अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व थंडावा देणाऱ्या सुविधांची कमतरता जाणवत होती. लहान वयातील विद्यार्थी भर उन्हात परीक्षा देताना थकलेले दिसत होते, काही पालकांनी या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली आहे. “दुपारच्या वेळेत परीक्षा ठेवण्याऐवजी सकाळीच दोन्ही पेपर घ्यायला पाहिजे होती असे पालकांचे मत होते. परीक्षा केंद्रांवर पुरेशा सावलीची व पाण्याची सोय नसल्याचेही सांगण्यात आले. तसेच अनेकांनी शाळेच्या परिसरातील हिरव्यागार वृक्षांच्या सावलीचा आसरा घेत वेळ काढला.

दोन पेपर च्या मध्ये दीड तासांची विश्रांती असल्याने अनेक पालक आपल्या मुलांची वाट बघत परीक्षा केंद्रावरच थांबून राहिले. अश्यातच परिसरातील वृक्षांनी दिलेली छाया नक्कीच त्यांना सुखावह ठरली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून पुढील काळात तरी या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here