


▪️गावातील पाण्याचे जलस्त्रोत आटले; नागरिकांना मिळेल तिथून आणावे लागते पाणी
✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.15एप्रिल):-एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला लागला असून, ग्रामीण भागात पाणीटंचाईचे भीषण सावट पसरले आहे. राजुरा तालुक्यातील पाचगाव ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या कोडापे गुड्यावरील पाण्याचे मुख्य स्त्रोत पूर्णपणे कोरडे पडल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असून नागरिकांना नाईलाजाने शेतातील विहिरीच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे.
राजुरा तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण पाणीटंचाईचे चटके जाणवायला लागले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाच्या तडाखा वाढला आहे. पाचगाव ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या कोडापे गुडा या जवळपास १५० लोकसंख्येच्या गावात हातपंपांनी तळ गाठला आहे. गावातील सार्वजनिक जुनी नळ योजनाही कुचकामी ठरली आहे. कडाक्याच्या उन्हात गुड्यावरील पाण्याचे स्त्रोत आटल्याने नागरिकांना विशेषतः महिला डोक्यावर गुंड घेऊन तसेच बैलबंडीवर ड्रम बांधून अर्धा किमी अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीतून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे. पाण्याचे हे भीषण दृश्य ग्रामीण भागातील पाणीटंचाईची भीषणता अधोरेखित करणारे आहे.
आमच्या गुड्यावर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. शेतातील विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसले, तरी तहान भागवण्यासाठी आमच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही अशी व्यथा कोडापे गुडा येथील नागरिकांनी बोलून दाखवली आहे.त्यामुळे कोडापे गुड्यावर पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नळयोजनेची टाकी बांधली मात्र पाणीपुरवठाच नाही…..
कोडापे गुडा येथे नागरिकांना पाणी मिळावे यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे.मात्र अजूनही पाइपलाइन टाकण्यात आली नाही.त्यामुळे नळ योजनेचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
———-
पाचगाव ग्राम पंचायत अंतर्गत कोडापे गुडा येथील पाण्याचे जलस्त्रोत आटल्याने पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना नाईलाजाने गावाबाहेल विहिरीवरून तसेच इतर ठिकाणांहून पाणी आणावे लागत आहे. यावर प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
_ नामदेव आळे
सरपंच, ग्राम पंचायत,पाचगाव ता. राजुरा
:::::::::::::
कोडापे गुडा येथील पाण्याचे जलस्त्रोत आटल्याने नागरिकांना गावाबाहेरील विहिरीतून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे.याकडे प्रशासनाने लक्ष देऊन गावकऱ्यांच्या पाण्याची व्यवस्था करून दिल्यास पाण्यासाठी होत असलेली पायपीट थांबेल.
— मानकु कुमरे
नागरिक रा. कोडापे गुडा














