Home खेलकुद  महाराष्ट्राचा युवा नेमबाज श्लोक हजारे झेक प्रजासत्ताकातील 54व्या ग्रँड प्रिक्स ऑफ प्लझेनमध्ये...

महाराष्ट्राचा युवा नेमबाज श्लोक हजारे झेक प्रजासत्ताकातील 54व्या ग्रँड प्रिक्स ऑफ प्लझेनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार

83

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)

खटाव(दि.4एप्रिल):-महाराष्ट्राचा श्लोक हजारे आता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सज्ज झाला असून मध्य युरोपातील झेक प्रजासत्ताकातील प्लझेन (पिल्सेन) शहरात, प्रागजवळ आयोजित होणाऱ्या 54व्या ग्रँड प्रिक्स ऑफ प्लझेन (Grand Prix of Plzeň) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत श्लोक भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

                      एअर वेपन प्रकारातील ही स्पर्धा 28 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत पार पडणार असून, जगभरातील नामांकित नेमबाज या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

  खेळाडूंच्या जागतिक क्रमवारीसाठी तसेच ऑलिम्पिक पात्रतेसाठीही महत्त्वाची मानली जाणारी ही स्पर्धा ,श्लोकची निवड ही केवळ वैयक्तिक यशाची बाब नसून, महाराष्ट्र आणि देशासाठीही गौरवाचा क्षण मानला जात आहे.

श्लोक हजारे सध्या एम.एल. डहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे शिक्षण घेत असून, त्याने आपले शालेय शिक्षण लिलावतीबाई पोदार हायस्कूल, मुंबई येथून पूर्ण केले आहे. लहान वयापासूनच नेमबाजीची आवड जोपासणाऱ्या श्लोकने कठोर सराव, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान भक्कम केले आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) कडून त्याला “Renowned Shot Shooter” हा सन्मान बहाल करण्यात आला आहे.

10 मीटर पीप साईट एअर रायफल प्रकारात श्लोकने सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करत अनेक प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. यामध्ये ऑल इंडिया जी.व्ही. मावळणकर शूटिंग चॅम्पियनशिप, CISCE नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप यांसारख्या राष्ट्रीय स्पर्धांतील विजेतेपदांचा समावेश आहे. या यशामुळे तो युवा नेमबाजांसाठी प्रेरणादायी चेहरा बनला आहे.

आपल्या या यशामागे श्लोक आपल्या प्रशिक्षिका सौ. स्नेहल पापळकर कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे नमूद करतो. त्या ISSF प्रमाणित प्रशिक्षक असून, मुंबईतील विले पार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल शूटिंग रेंज येथे त्यांनी श्लोकच्या तांत्रिक कौशल्यासोबतच मानसिक तयारी, शिस्त आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील हा मजबूत समन्वयच आज श्लोकला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचवण्यास कारणीभूत ठरत आहे.

महाराष्ट्राचा युवा नेमबाज आता जागतिक रंगमंचावर आपली छाप उमटवण्यासाठी सज्ज असून, त्याच्या यशकथेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here