


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.10मार्च):-चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसीसाठी अधिग्रहित करून त्या ठिकाणी जेएसडब्ल्यू कंपनीचा स्टील प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समोर आले आहे. या निर्णयाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून शेतीयोग्य जमिनी उद्योगासाठी वापरणे हे शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
भेंडाळा, फोकुर्डी, फराडा, घारगाव, डोटकुली, वाघोली, वेलतूर तुकूम, सगनापूर, कानोली, कळमगाव, नवेगाव, माल, चाकलपेठ आदी गावांच्या ग्रामसभांनी जमीन अधिग्रहणाला विरोध दर्शवित यासंदर्भातील ठराव मंजूर केले आहेत. ग्रामसभा व स्थानिक शेतकऱ्यांचा स्पष्ट विरोध असतानाही शासनाकडून विविध प्रकारचे दबाव तंत्र वापरून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया राबविणे चुकीचे आहे.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून भेंडाळा परिसरातील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प तात्काळ रद्द करून त्यासाठी पर्यायी जागेचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
चिचडोह व कन्नमवार जलाशयामुळे भेंडाळा परिसरातील मोठ्या प्रमाणातील शेतजमीन सिंचनाखाली आली असून या भागात बारमाही व उत्पादनक्षम शेती केली जाते. अशा सुपीक जमिनी उद्योगासाठी घेणे म्हणजे शेतकऱ्यांना भूमिहीन करण्यासारखे असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम होणार असल्याचे खासदार किरसान यांनी पत्रात नमूद केले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून भेंडाळा परिसरातील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प रद्द करण्यात यावा व उद्योगासाठी जिल्ह्यातील सुपीक शेतीचे नुकसान होणार नाही अशा जागेचा पर्याय शोधण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासोबतच, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करण्याचा प्रयत्न केल्यास येत्या काळात शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी दिला आहे.














