Home महाराष्ट्र पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

74

▪️गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.10मार्च):- गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पीस बिल्डर्स फोरम या राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन कस्तूरबा गांधी व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आले. गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृह येथे झालेल्या उद्घाटन समारंभाप्रसंगी कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन, गांधी रिसर्च फाऊंंडेशनच्या डॉ. गीता धरमपाल, एकता परिषदेचे अध्यक्ष राजगोपाल, जिल कारहॅरीस, सावत्रीबेन, इंद्राजी उपस्थित होते. दि. ९ ते ११ मार्च दरम्यान शांतीच्या विविध आयामांना स्पर्श केला जाणार आहे. त्यासाठी माहितीपट (डॉक्युमेंट्री) प्रदर्शन, संवाद व चर्चासत्रे आयोजित केली आहेत. यामध्ये कॅनडासह, आंध्रप्रदेश, केरळ, बिहार, तामिळनाडू, ओडिसा, मणिपूर, नागालॅंड, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, झारखंड, तेलंगणा, गुजरात राज्यांसह देशभरातील मान्यवर पीस वर्कर सहभागी झाले आहेत.

शांती, न्याय व परिवर्तन हा गुण महिला शक्तीचा असल्याने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष नृत्य प्रस्तुती करण्यात आली. डॉ. अपर्णा भट-कासार संचलित प्रभाकर कला संगित अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी अप्रतिम कथक नृत्य सादर केले. कथक नृत्याची सुरवात वंदेमातरम या गीताने झाली. नृत्यातुन महिला शक्तीचा जागर करीत देवी स्तूतीने आदीशक्तीला वंदन करण्यात आले. त्यानंतर कृष्ण भजन सादर करुन उपस्थितांना कृष्ण भक्तीची अनुभूती करुन दिली. महिलांना समर्पित असलेली कलाकृती सादर केली ही कलाकृती प्रभाकर कला अकॅडमीच्या श्रेया अग्रवाल, तेजस्विनी क्षीरसागर, संस्कृती गवळे, मधुरा इंगळे, दीपिका घैसास, समृद्धी पाटील, वरदा तळेले यांच्यासह कलावंतांनी सादर केली. गीता धरमपाल यांनी महिला दिना निमित्त विशेष संदेश देत गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कार्याविषयी सांगितले.

जिल कारहॅरीस यांनी समन्वय करताना सांगितले की, शोध, संवाद, प्रशिक्षण, युवाप्रशिक्षणातून समाजात शांती न्याय व परिवर्तन घडविण्यासाठी एकता परिषद व गांधी रिसर्च फाऊंडेशन चे कार्य महत्त्वाचे आहे, महात्मा गांधी विचारांच्या प्रचार प्रसारातून समाजात परिवर्तन घडेल असेही त्या म्हणाल्यात. यावेळी एकता परिषद व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्यावतीने २०१६ मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय महिला परिषदेची विशेष डाक्युमेंट्री (माहितीपट) दाखविण्यात आली. दीपक मिश्रा यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here