Home महाराष्ट्र मग मध्यमवर्गीय आणि गरिबांची मुले शिकणार कुठे?-आमदार अभिजित वंजारी यांचा विदर्भस्तरीय शिक्षक...

मग मध्यमवर्गीय आणि गरिबांची मुले शिकणार कुठे?-आमदार अभिजित वंजारी यांचा विदर्भस्तरीय शिक्षक मेळाव्यात सवाल

106

✒️शेगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

शेगाव (जिल्हा बुलडाणा) : आज मराठी माध्यमाच्या शाळांच्या भवितव्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या शाळा एकामागून एक बंद होत आहेत. अगदी अनुदानित शाळांची अवस्थाही दयनीय होत चालली आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे सध्याचे धोरण असेच राहिले, तर येणाऱ्या २५ वर्षांत ही शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडलेली असेल. मग मध्यमवर्गीय आणि गरिबांची मुले शिकणार कुठे? अशा परिस्थितीत समाज कसा प्रगत होणार? हा मूलभूत प्रश्न आपण सर्वांनी विचारण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन आमदार अभिजित वंजारी यांनी केले. 

राज्‍यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या ज्‍वलंत विषयांवर चर्चा करून त्यावर प्रभावी उपाययोजना करता यावी म्हणून विदर्भस्तरीय शिक्षक मेळाव्याचे उद्घाटन रविवारी (३१ जानेवारी) संतनगरी शेगाव (जि. बुलढाणा) येथील गणेश प्रस्थ मंगल कार्यालयामध्ये पार पडले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी आमदार सुधाकर अडबाले, उद्‌घाटक म्‍हणून माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे, प्रमुख पाहुणे म्‍हणून प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, दिलीप कडू उपस्थित होते. 

आमदार अभिजित वंजारी म्हणाले, सरकारची ही प्राथमिक जबाबदारी आहे की प्रत्येकाला दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण मिळावे. या संघटनेची ताकद भविष्यातही टिकून राहणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षांत मी विदर्भातील अनेक जिल्हास्तरीय अधिवेशनांना उपस्थित राहिलो आहे आणि प्रत्येक ठिकाणी शिक्षकांची मिळणारी ही अलोट गर्दी संघटनेच्या भक्कम अस्तित्वाची साक्ष देते. आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या संघटनेची ताकद खरोखरच कौतुकास्पद आहे. काल-परवापर्यंत या संघटनेचे नऊ आमदार विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करत होते. ही काही छोटी गोष्ट नाही. तुमचा कोणताही राजकीय पक्ष नाही किंवा निवडणुका लढवणे हा तुमचा मुख्य उद्देश नाही, तरीही शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही जी वज्रमूठ बांधली आहे, ती मोठी ताकद आहे. आता नऊ आमदारांचा हा ‘सिंगल डिजिट’ आकडा आपल्याला ‘डबल डिजिट’मध्ये न्यायचा आहे. दहावा आमदार निवडून आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि म्हणूनच दिलीपराव कडू साहेब आज आपल्यामध्ये उमेदवाराच्या रूपाने उपस्थित आहेत. दिलीपरावांच्या रूपाने एक खंबीर नेता आणि कार्यकर्ता आपल्याला मिळाला आहे. आता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, नागपूर आणि अमरावती या दोन्ही विभागांच्या निवडणुकांमध्ये आपण एकजुटीने काम करून विजय मिळवावा.

महाराष्ट्राचा शैक्षणिक आलेख एकेकाळी खूप उंचावर होता. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी दूरदृष्टी दाखवत मोठ्या प्रमाणावर शाळा आणि महाविद्यालयांना परवानगी दिली, ज्यामुळे शिक्षणाचे जाळे विस्तारले. पण आजची परिस्थिती चिंताजनक आहे. शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर सर्व अशैक्षणिक कामांना जुंपले जात आहे. कधी त्यांना चौकात उभे केले जाते, तर कधी जनगणनेच्या कामात लावले जाते. निवडणूक आयोगाची कामे तर पाचवीलाच पुजलेली आहेत. महसूल यंत्रणा सर्व निवडणुका राबवताना शिक्षकांचा वापर करून घेते, पण त्यांच्या प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.

नुकत्याच झालेल्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांचे उदाहरण घ्या; एका कॅन्सरग्रस्त शिक्षकाला देखील निवडणुकीची ड्युटी लावली गेली. आम्ही अनेकदा हा प्रश्न सभागृहात मांडला आहे की हे कुठेतरी थांबले पाहिजे. राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी केवळ मंत्री म्हणून नाही, तर या व्यवस्थेचे ‘पालक’ म्हणून जबाबदारी स्वीकारली पाहिजे. शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here