Home महाराष्ट्र रामदास खरे यांचा ‘साइड इफेक्ट्स’ : घटनांच्या पलीकडील गूढ अर्थांचा शोध

रामदास खरे यांचा ‘साइड इफेक्ट्स’ : घटनांच्या पलीकडील गूढ अर्थांचा शोध

185

मराठी कथासाहित्यात गूढकथा म्हणजे फक्त भयकथा किंवा रहस्यकथा असा विषय नव्हे. ती कथा तर धुक्यासारखी असते; ते अधिक दाट नसावे, पातळही नसावे. यात मनोव्यापारांचे सूक्ष्म चित्रण असते, माणसाचे विभ्रम, भीती, अपेक्षा आणि तडजोडी यांचा तो छान असा गाभा असतो. रामदास खरे यांचा ‘साइड इफेक्ट्स’ हा कथासंग्रह नेमका असाच आहे. अनुभवी पारखी नजरेच्या खाणाखुणा घेऊन लिहिलेल्या या बारा कथांमधून आयुष्यातील प्रत्येक घटनेचे अनपेक्षित चित्रण, ‘साइड इफेक्ट्स’ उलगडताना दिसतात. घटना जणू वाचकाला त्या कथाप्रवाहात वाहून नेतात, पण त्यांच्या पलीकडे दडलेल्या अर्थांचा शोध घ्यायला भाग पाडतात.

या कथा पूर्णपणे काल्पनिक वाटत नाहीत, जणू वास्तवच आहेत असे वाचताना जाणवते. या कथांचे बीज वर्तमानपत्रातील विचित्र बातम्या, आजूबाजूची अस्वस्थता, विचित्र माणसे, त्यांचे स्ट्रेस, लैंगिकता आणि देहबोली यांचे निरीक्षणातून त्या घडल्या आहेत. लेखकाने पात्रांच्या संवादांतून कोलाहल, अतर्क्य गोष्टी आणि निर्जीव वस्तूंच्या माध्यमातून माणसांचे स्वभाव उतरवले आहेत. उदाहरणार्थ, कोकणात सुचलेली ‘अबाधित’ ही कथा वाचकाला एका सामान्य माणसाच्या मनातील अबाधित भीती आणि सामाजिक दबावाच्या जाळ्यात अडकवते. तिच्या शांत पृष्ठभागाखाली दडलेला मनोव्यापार अनपेक्षित वळण घेऊन वाचकाला अस्वस्थ करतो. नाशिक मुक्कामात ‘नेक्स्ट?’ आणि कोळ्याचं ‘जाळं’ सुचल्या , बाकी मुंबई महानगराच्या घुसळणीतून जन्म घेतल्या बहुतांश कथा आहेत. कथेतील पात्रे आजही आजूबाजूला जगत आहेत असेच जाणवते. सामाजिक बंधने पाळत स्वतःचे अस्तित्व जपण्याची धडपड, आदिम स्वभावातील प्रेम-असूया-द्वेष, तिरस्कार,भीती यांचा नेमका वेध यामध्ये घेतलेला स्पष्ट जाणवतो. 

शीर्षकप्रमाणे, आयुष्यातील प्रत्येक घटनेचे अनपेक्षित परिणाम लेखक अधोरेखित करत मनाची पकड घेत पूढे जाताना दिसून येता. माणूस अर्थ लावतो, पण तो पूर्ण उमगतोच असं नाही. जगण्यातले काही अनुभव कायमचे मनात रुतून बसतात, आयुष्यभर साथ देतात. कथांमधील विरोधाभास हे मनोव्यापारांचे गुंतागुंतीचे स्वरूप संयतपणे उलगडले आहे. काही कथा अस्वस्थ करतात, काही विचारप्रवृत्त करतात. भाषा साधी, प्रवाही, आशयघन अलंकार नको, थेट भिडणारी. मुखपृष्ठ आणि मांडणी आशयाशी सुसंगत.

समकालीन मराठी गूढकथांत ‘साइड इफेक्ट्स’ लक्षवेधी ठरतो. वाचकाला वाचनसुख देत आत्मपरीक्षणास प्रवृत्त करणारा हा संग्रह संवेदनशील वाचकांनी आवर्जून वाचावा. गूढकथेचा खरा आनंद म्हणजे जास्त न सांगतात की ते वाचकावर सोडणेच योग्य असते आणि खरे यात यशस्वी झालेले दिसतात. आजचे आघाडीचे कथाकार, चित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांनी या कथासंग्रहाची पाठराखण (blurb) केली आहे. मुखपृष्ठ स्वतः कथा लेखक, चित्रकार रामदास खरे यांनीच रेखाटले आहे.

✒️पुस्तक परिचय:-किशोर कुलकर्णी(मो:-9422776759,जळगाव खान्देश)

_साईड इफेक्ट्स (गुढकथा संग्रह)_

_लेखक व मुखपृष्ठ – रामदास खरे,_

_डिंपल पब्लिकेशन, वसई._

_पृष्ठे – १२२ , मूल्य – २००_

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here