


✒️भूषण सहदेव तांबे(विशेष प्रतिनिधी)
मुंबई(दि.30नोव्हेंबर):- कवयित्री कविता मोरवणकर यांच्या “उद्याचा दहशतगर्द अंधार” या कवितासंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा शनिवार, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी वसई येथे उत्साहात पार पडला. समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग आणि सहयोग संस्था, वसई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या समाज, साहित्य व भाषा विचार संमेलनात ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या शुभहस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
कविता मोरवणकर या प्रख्यात शिक्षिका असून त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. साहित्यिक क्षेत्राबरोबरच समाजकार्यात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतही त्यांनी उत्कृष्ट अभिनय साकारणारा ठसा उमटवला आहे. विविध क्षेत्रांत काम करत असलेल्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकानंतर कवितासंग्रहाचे औपचारिक प्रकाशन संपन्न झाले. लगेचच कवयित्री कविता मोरवणकर यांनी आपल्या मनोगतामध्ये या संग्रहाच्या निर्मितीमागील प्रेरणा, उद्दिष्टे आणि आठवणी मांडल्या. उपस्थित सर्व मान्यवर व रसिकांनी टाळ्यांच्या दणदणाटात त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.
या सोहळ्यास अनेक दिग्गजांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रभा प्रकाशनाचे संचालक कवी अजय कांडर हेही या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. विविध मान्यवरांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम उत्साहात व यशस्वीपणे संपन्न झाला.














