Home महाराष्ट्र विटा नगरपालिका निवडणुक म्हणजे नातेगोत्याचे हित जोपासणारी!

विटा नगरपालिका निवडणुक म्हणजे नातेगोत्याचे हित जोपासणारी!

208

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(सातारा)(दि.25नोव्हेंबर):- विटा नगरपालिकेची निवडणूक तब्बल आठ वर्षांनी पार पडत आहे.त्यामुळे अनेक युवा व नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक पदासाठी बाशिंग बांधले होते.त्याप्रमाणे विक्रमी अशा हौशा ,गौशा व नवशांनी अर्ज दाखल केले होते.परंतू छाननी नंतर दोन्ही पॅनेलच्या अंतिम उमेदवारांची यादी पाहिली असता,विट्यामध्ये फक्त नातेगोते,भाऊबंदकी व सोयरीकांना प्राधान्य दिल्याचे दिसले.याचा अर्थ सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त घोषणाबाजी, खुर्च्या उचलणे, सतरंजी अंथरूणे,झेंडे वाहणे व अंगावर केसेस घेणे एवढेच काम करावे असे नेत्यांची निग्रहाची भावना दिसून येत आहे.खरेतर हा खऱ्याखुऱ्या व एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या सहनशक्तीचा व प्रामाणिकपणाचा अंत पाहण्यासारखे आहे.जे स्वाभिमानी कार्यकर्ते असतात ते काही वेळा बंडखोरी करून आव्हान देतात, आपली ताकद,जीगर नेत्यांना दाखवतात.अशी अनेक उदाहरणे आहेत.तर कमकुवत, गर्भगळीत कार्यकर्ते उदास होऊन, फसवणूक झाल्याने, नैराश्याने राजकारणातून बाहेर पडतात.खरेतर हे लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी व नवीन कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात सहभागी होण्याच्या दृष्टीने खूप घातक व वाईट पायंडा आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ज्यांनी उमेदवारी केलेली असते,त्यांनी आपल्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते घडवण्यासाठी व त्यांना अनुभव देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूकीत संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित असते.परंतू विट्यातील नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांची सद्यस्थिती पाहिली असे दिसून येते की ठराविक त्याच त्या कुटुंबाने विट्याच्या राजकारणावर कब्जा केला आहे. उदाहरणार्थ मा.आ.हणमंतराव पाटील यांच्या घराण्यातील तिसरी पिढी सलगपणे शहराचे नेतृत्व करण्यासाठी सरसावली आहे.तसेच एकूण २६ उमेदवारांपैकी २५%उमेदवार एकट्या पाटील घराण्यातील आहेत.तर या घराण्याने फक्त सत्ता काबीज करण्यासाठी सोयीस्कररित्या अनेकदा पक्ष बदलले आहेत.याचा फटका त्यांना गेल्या पंधरा वर्षांपासून बसत आहे.राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यापुर्वी विधानसभा, जिल्हा मध्यवर्ती बॅंक या मोठ्या निवडणुकीत त्यांनी नशीब अजमावले होते, परंतु त्यात अपयश आले.गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांना विटा नगरपालिका सोडून इतर कोणत्याही निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालेले नाही.आता त्यांनी पुन्हा एकदा आपला पारंपरिक विटा संस्थांनाचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी हातपाय हालवत आहेत.यापुर्वी अशीच संधी न मिळाल्याने त्यांच्यापासून अनेक निष्ठावंत व चांगले कार्यकर्ते दुरावले आहेत.

यामध्ये सातत्याने त्यांनी अनेक एकनिष्ठ, प्रामाणिक कार्यकर्त्यांचा बळी देऊन आपल्या घराण्याचे हित जोपासण्याचे काम केले आहे.उदाहरण म्हणून विटा भाजप शहरात गेले 30वर्ष अनिल म.बाबर आप्पा प्रतिनिधीत्व करत होते.परंतू चार महिन्यांपुर्वी भाजपात प्रवेश करून पाटील घराण्याने भाजपावर वर्चस्व मिळवले.त्यामुळे या सर्व जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना गुगली राजकारणामुळे विस्थापित, परागंदा व्हावे लागले आहे.सध्या भाजपमधून जे लढत आहेत,ते सर्व त्यांच्याच घराण्यातील सदस्य व जूनेच लोक आहेत.नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही.तर दुसरीकडे त्यांच्याच पॅनेलमधून कॉग्रेसचे जेष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी आपले पुत्र व पुतणे यांना पुन्हा दुसऱ्यांदा नगरसेवक पदासाठी भाजपकडून उतरवले आहे.यामुळे त्यांनीही त्यांच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा राजकीय बळी दिला आहे.याचा अर्थ भाजपमध्ये पाटील व गायकवाड घराणे एकत्र येऊन लढत आहेत.

 तर आ.बाबर घराण्याने विधानसभा, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, बाजार समिती, पंचायत समिती,जि.प.यामध्ये त्यांनी एकहाती नेतृत्व केले आहे.सगळीकडे त्यांनी स्वतःचे हित पाहिले आहे.कुठेही त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांला संधी न देता विटा नगरपालिकेत पुन्हा आपल्या जेष्ठ बंधुच्या नगरसेवक पदासाठी हट्ट धरला आहे.तर कॉग्रेसचे अशोक गायकवाड यांचे कनिष्ठ बंधू कृष्णात अण्णा गायकवाड हे शिवसेकडून उमेदवार म्हणून लढत देत आहेत.विशेष म्हणजे गायकवाड घरातील तिनही उमेदवार वेगवेगळ्या प्रभागातून लढत आहेत . या तिघामध्ये अंतर्गत समेट घडून तिघेही निवडून येऊन नव्या नगरपालिकेत दिसले तर आश्चर्य वाटायला नको. असेही फिक्सिंग होऊ शकते.तीच गोष्ट गुळवणी घराण्याची आहे.गेली 50 वर्षे गुळवणी घराण्याने विटा नगरपालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावली आहे.सध्या जेष्ठ नेते विनोद गुळवणी हे शिवसेनेकडून तर भाजपकडून त्यांचे पुतणे युवा कार्यकर्ते मयुरेश गुळवणी वेगवेगळ्या प्रभागातून लढत असल्याने, त्यांच्यामध्येही अंतर्गत तह,सेटींग होऊन आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळेल.तर विट्यातील मातब्बर घराणे असलेले विश्वनाथ कांबळे यांचा परिवार.या कुटुंबातील स्वतः विश्वनाथ कांबळे, त्यांच्या पत्नी मालती कांबळे,त्यांचे पुत्र प्रशांत कांबळे यां तिघांनी यापूर्वी नगरपालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे.तर यावेळी स्वतः प्रशांत कांबळे हे भाजपकडून लढत आहेत तर त्यांना त्यांचे कनिष्ठ बंधू भालचंद्र कांबळे, शिवसेनेकडून उमेदवार म्हणून निकराचे आव्हान दिले आहे.याचा अर्थ म्हणजे या निवडणुकीत हार असो की जीत शेवटी नगरसेवक कुटुंबातील होणार हे निश्चित.त्यामुळे ही कुस्ती नुरा होणार याची चर्चा शहरात रंगली आहे. 

तीच गोष्ट सपकाळ भावकीत आहे.त्यांच्याही भावकीतील दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत.ते एकमेकांना मदत करून आपल्या भावकीचे हित जोपासण्याची शक्यता आहे.

वरील सर्व तेच ते उमेदवार, ठराविक कुटुंबे व त्यांचे फिक्स प्रभाग पाहिल्यावर असे लक्षात येते की विट्यामध्ये लायक,सक्षम, होतकरू उमेदवारांची वानवा आहे की? प्रस्थापित घराण्यांना आपला स्वार्थ सोडवत नाही.आपले कायम हित साधण्यासाठी निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करावा लागतो. या ठराविक घराण्यांच्या स्वार्थी राजकारणामुळे विट्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या रामोशी, लिंगायत, मुस्लिम, वडार, चर्मकार, नाभिक, भटकेविमुक्त,बारा बलुतेदार व वंचित घटकातील एकाही जातीला प्रतिनिधीत्व तर सोडा साधी उमेदवारी मिळू शकलेली नाही,हे खूप धक्कादायक आहे.ही सर्वसमावेशक लोकशाहीची अक्षरशः थट्टा आहे. समाजातील अंतिम व्यक्तीच्या समस्या सोडविण्यासाठी लोकशाही मार्गाने ही संधी मिळणे अपेक्षित असते.उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी त्यांचा राजकीय क्षेत्रात सहभाग आवश्यक असतो. विकासाच्या मुख्य प्रवाहात व 

 निर्णय प्रक्रियेत त्यांचा आवाज ऐकला जावा हा उदात्त हेतू असताना.तेच तेच लोक पुन्हा पुन्हा निवडून येऊन या दुर्बल घटकांवर सामाजिक अन्याय करत आहेत.

 शहरातील ठराविक, प्रस्थापित,प्रबळ घराण्यांनी पैसा, दंडेलशाही, गुन्हेगारी, अफरातफर व अनैतिकता व कुनिती वापरून लोकशाहीला रखेल बनवले आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा निवडणूक, लोकशाही यावरून विश्वास उडत चालला आहे.

२ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, त्यातून जे नवीन नगरसेवक निवडून येतील ते विट्याचे खरेखुरे प्रतिनिधी नसतील कारण ते फक्त ठराविक कुटुंब, परिवार,भावकी,जातीचे सदस्य असतील.सामान्याचा आवाज त्यामध्ये नसेल.

या निवडणुकीत तर अनेक उमेदवार याअगोदर नगरपालिकेत दोन,तीनदा ते स्वतः किंवा त्यांच्या कुटु़ंबातील सदस्य निवडून आले असूनही यावेळी पुन्हा उमेदवारीचा हव्यास केला आहे.त्यामुळे हे लोकप्रतिनिधी विट्यातील पन्नास हजार लोकसंख्येचे प्रतिनिधी नसतील हे लक्षात घ्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here