


▪️नामनिर्देशन १० ते १७ नोव्हेंबर; विशेष पिंक व आदर्श मतदान केंद्रांची उभारणी
✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.7नोव्हेंबर):-नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला असून निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी (दिनांक 6 नोव्हेंबर गुरुवार) रोजी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला.
या निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा कालावधी दि.१० ते १७ नोव्हेंबर असा निश्चित करण्यात आला आहे. १८ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी, तर २५ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. यानंतर २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत नागरिकांना मतदान करता येणार आहे.
मतमोजणीची प्रक्रिया ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल आणि सर्व मोजणी पूर्ण होईपर्यंत ती अखंडित सुरू राहील. पुढील प्रमाणे अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी जिवराज डापकर (उपविभागीय अधिकारी,गंगाखेड) सह निवडणूकनिर्णय अधिकारी उषाकिरण श्रंगारे (तहसिलदार,गंगाखेड)नियंत्रक अधिकारी पालमचे तहसिलदार कैलासचंद्र वाघमारे,(निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य) जयवंत सोनवणे (मुख्याधिकारी गंगाखेड नगरपरिषद) काम पाहणार आहेत
मतदान आणि मतमोजणी केंद्र अर्ज स्वीकारण्याचे व मतमोजणीचे केंद्र उपविभागीय अधिकारी कार्यालय, गंगाखेड येथेच राहणार आहे. मतदान पेट्या आणि इतर निवडणूक साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी “हिरकणी कक्ष” निश्चित करण्यात आला आहे. मतदान केंद्रांची संख्या व रचना करण्यात आली असून गंगाखेड शहरातील १३ प्रभागांमध्ये एकूण ४७ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
नियमाप्रमाणे शासकीय व निमशासकीय इमारतींमध्ये मतदान केंद्रे ठेवली जातील. तथापि प्रभाग क्रमांक ४ मध्ये शासकीय इमारत उपलब्ध नसल्याने, तेथे नगरेश्वर मंगल कार्यालयात दोन आणि श्रीकृष्ण प्राथमिक विद्यालयात दोन मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात येईल. असे स्पष्ट केले.
पिंक व आदर्श मतदान केंद्र मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी यंदा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.
महिलांसाठी ‘पिंक मतदान केंद्र’ तसेच आदर्श मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.या केंद्रांवर सर्व सुविधा महिला कर्मचाऱ्यांकडूनच दिल्या जातील. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर विकलांग मतदारांसाठी रॅम्प, बसण्याची सोय, पिण्याचे पाणी व व्हीलचेअरची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे
डापकर यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी महसूल आणि पोलीस विभागाचे विशेष पथक तैनात केले जाणार आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन करून सुरक्षा व्यवस्था चोख असणार असल्याचेही पत्रकार परिषदेदरम्यान म्हटले. पत्रकार परिषदेस उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर,तहसीलदार उषाकिरण शृंगारे,तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, नायब तहसीलदार अशोक केंद्रे व महसूल कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.














