


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.31ऑक्टोबर):-शासन गोरगरीब नागरिकांसाठी अनेक योजना राबवते कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना पैसे द्यावे लागत नाहीत तर काम करून घेण्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैसे देण्याची गरज नाही जर कोणी अधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांकडून पैशाची मागणी केली तर गाठ माझ्याशी आहे म्हणून पारदर्शक काम करा सामान्य नागरिकाकडून पैसे घेऊ नका असा सज्जड दम जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री ना.मेघना साकोरे बोर्डीकर यांनी गंगाखेड येथे आयोजित जनता दरबारामध्ये दिला.
नागरिकांच्या विविध तक्रारी जाणण्या व सोडविण्यासाठी शहरातील कापसे मंगल कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. जनता दरबारामधे आपल्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकांनी मंत्री महोदयांपुढे तक्रारींचा महापूरच मांडला,शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वच विभागातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतात पैसे दिल्याशिवाय कुठलेच काम होत नाही घरकुलाचे हप्ते,मस्टर,विद्युत जोडणी, कृषि विषयक अशा अनेक योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर पैसे द्यावे लागतात पैसे दिल्याशिवाय काम होत नाहीत ग्रामीण व शहरी भागातील घरकुलाचे हप्ते पाडण्यासाठी गटविकास अधिकारी, अभियंता यांना पैसे द्यावे लागतात त्यांना पैसे दिले तरच घरकुलाचा हप्ता खात्यामध्ये वर्ग होतो अन्यथा होत नाहीत आरोग्याच्या समस्या अशा अनेक तक्रारी पालकमंत्री ना.बोर्डीकर यांच्यापुढे पोटतिडकीने नागरिकांनी मांडल्या.
गंगाखेड ते कौडगाव जाणारा आठ किलोमीटरचा रस्ता करून देण्याची मागणी तसेच गावातून वाहणाऱ्या मासोळी नदीवर मोठा पूल बांधून देण्यात यावा दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर येतो पूर आल्याने नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो तीन तीन दिवस तालुक्याचा संपर्क तुटतो म्हणून नवीन पूल बांधून देण्यात यावा रस्त्यासाठी चार कोटी रुपये निधी आला असताना देखील अद्याप पर्यंत काम झाले नाही कुठे घोडे अडले आहे अशी तक्रार गावातील ज्येष्ठ नागरिक माऊली बुट्टे यांनी मांडली.अमजद शेख यांनी महातपुरी येथील आरोग्य केंद्रामध्ये सर्व सुविधा पुरविण्याची मागणी केली.
जनता दरबारास उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचे तक्रारी ऐकून पालकमंत्री ना.बोर्डीकर यांनी प्रशासनातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांना,कर्मचाऱ्यांना सजड दम देत नागरिकांचे कामे वेळेवर व कुठल्याही प्रकारचे पैसे न घेता करून द्या असे आदेश दिले अन्यथा आपली गाठ माझ्याशी आहे सर्व सामान्य नागरिकांना शासनाच्या सर्व योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे म्हणून प्रशासनाने नागरिकांच्या हक्काच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या त्यांना सेवेचा लाभ द्यावा नागरिकांच्या सर्व तक्रारी सोडवाव्या अशा सूचना दिल्या.
याप्रसंगी उपस्थित असलेले गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी अधिकाऱ्याची कान उघडनी करत माझ्या विधानसभेतील नागरिकांच्या कुठल्याही तक्रारी असो त्या सर्वच विभागातील अधिकाऱ्यांनी तात्काळ सोडवाव्या नागरिकांना वेठीस धरू नये पैशाची मागणी करून नये अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली तर नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले. गंगाखेड शहरात डुकरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या तक्रारी येत होत्या नगरपालिकेला सूचना दिल्या असून नगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात डुकरांची धरपकड करून बाहेर सोडण्यात येत आहेत.
जनता दरबारास आ.डॉ.रत्नाकर गुट्टे,भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे,प्रेरणा वरपूडकर,माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे,माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे,जयश्री मुंडे,उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर,तहसीलदार उषाकिरण शृंगारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.लखमावार, गटविकास अधिकारी अक्षय सुक्रे, तालुका आरोग्य अधिकारी मनोजकुमार दीक्षित, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.हेमंत मुंडे, कृषी अधिकारी मारुती शेंडगे,महावितरण अभियंता पंकज गुहे,सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते














