


✒️सुयोग सुरेश डांगे(चंद्रपूर प्रतिनिधी)
चिमूर(दि.22ऑक्टोबर):-सुरेश डांगे यांच्या दखल या ग्रंथाचे प्रकाशन समारंभ चिमूर येथील प्रसिद्ध बालाजी मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले .याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे डॉ.गजानन कोटेवार (वर्धा ) अध्यक्षस्थानी होते. वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान आयोजित या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह भाऊराव पत्रे, साहित्यिक डॉ. देवमन कामडी, वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष एड. भूपेश पाटील,साहित्यिक डॉ. विलास गजबे,पत्रकार रामकुमार चिचपाले, धनलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा उज्वला डांगे,पुस्तकाचे लेखक सुरेश डांगे उपस्थित होते.
डॉ. कोटेवार यांनी सध्याची वाचकांची स्थिती , वाचन चळवळ, लेखकांची जबाबदारी यासंदर्भात अभ्यासपूर्ण भाष्य केले. झाडीबोली साहित्य मंडळाचे केंद्रीय सदस्य साहित्यिक बंडोपंत बोढेकर म्हणाले की, चिमूर ही राष्ट्रसंताची क्रांतीभूमी, तपोभूमी आहे.
अशा या निसर्गरम्य झाडीपट्टी परिसरातील माणिक मोतींवर प्रकाश टाकण्याचे परिश्रमपूर्वक काम सुरेश डांगे यांनी केले आहे, या सर्वांच्या कार्याची प्रेरणा येणारी पिढी निश्चितच घेईल ,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह भाऊराव पत्रे , देवमन कामडी यांनी साहित्य निर्मितीचे महत्त्व विषद दकेले तर साहित्यिक ऍड. भूपेश पाटील यांनी समाजाचे होत चाललेले अध:पतन, लोकांची उदासीन मानसिकता असताना निरपेक्ष भावनेने कार्य करणारे काही दिवे आजही लकाकत आहेत, समाजाने त्यांना जपले पाहिजे असे मत व्यक्त केले. लेखक सुरेश डांगे,डॉ. विलास गजबे,रामकुमार चिचपाले,उज्वला डांगे यांनी याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या.तुळशीराम महल्ले, अश्विनी रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले.
समारंभाचे संचालन विरेनकुमार खोब्रागडे यांनी केले. प्रास्ताविक रामदास कामडी यांनी केले. आभार प्रकाश कोडापे यांनी मानले. कार्यक्रमाला साहित्यिक,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.














