Home महाराष्ट्र वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व 

वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व 

185

वाचन प्रेरणा। दिनाच्या शुभेच्छा ।

मनस्वी सदिच्छा । वाचकांना ॥

वाचन संस्कृती । वृद्धिंगत करू।

वाचन ते सुरू । नियमित ॥

       भारतरत्न डॉ.अबुल पाकीर 

जैनुलबदिन अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवशी म्हणजे १५ ऑक्टोबरला ‘ वाचन प्रेरणा दिन ‘ म्हणून साजरा केला जातो.

डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे झाला. ते भारताचे अकरावे राष्ट्रपती, प्रख्यात वैज्ञानिक आणि ‘मिसाइल मॅन’ म्हणून ओळखले जातात. डॉ. अब्दुल कलाम यांना ९४ व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥

            बालपणापासूनचे त्यांचे संघर्षमय जीवन, त्यांचे अनमोल विचार आणि त्यांचे सत्कर्म हे भारतीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणास्रोत आहे.

वाचकांचे असे । कलाम प्रेरक । 

घडती वाचक । जीवनात ॥

             ‘ वाचनाचा नाद म्हणजे ज्ञानाचा झरा’ असे ते समजत असत. वाचन हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता. त्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले, वाचलेल्या पुस्तकातील ज्ञानाचे चिंतन आणि मनन केले त्यातूनच त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडत गेले.

डॉ. अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’ (Wings of Fire) हे आत्मचरित्र संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे, प्रज्वलित मने,भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध आणि ‘अदम्य जिद्द’, स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस (भारतीय प्रबोधनपर्व – वैभवशाली भारताची आगामी दिशा.)

अशी अनेक पुस्तके डॉ.कलाम यांच्या सिद्धहस्त लेखनीतून निर्माण झालेली आहेत. जी युवकांनाच नव्हे तर सर्वांना प्रेरणादायी ठरलेली आहेत.

          डॉ.अब्दुल कलाम यांनी केलेल्या भाषणामध्ये नेहमीच युवापिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सतत प्रयत्न केले. त्यांना प्रोत्साहन दिले.पुस्तक प्रेमी असलेले डॉ. कलाम यांना पुस्तक हे ज्ञानाचा सागर वाटत असे म्हणूनच ते पुस्तकांना ‘उत्तम गुरू’ मानत असत.

” कलामांचे खरे । ग्रंथ हेच गुरू । 

  वाचन ते सुरू । रात्रंदिन ॥”

                त्यांच्या या पुस्तक वाचून महान बनण्याच्या प्रेरणेतूनच महाराष्ट्रात त्यांचा जन्मदिवस हा ‘वाचन प्रेरणा दिन ‘ म्हणून साजरा करतात. ‘वाचनाचे महत्त्व प्रत्येकाला समजले पाहिजे,यासाठी या वाचन प्रेरणा दिनाचे मोल अनमोल आहे.वाचन प्रेरणा दिनाचा ‘ समाजात,विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे हा उद्देश आहे. वाचकाला ज्ञानाने समृद्ध करणारे वाचन प्रत्येकाने केले पाहिजे. नवविचार, नवसंकल्पना आणि संस्कृतींची ओळख वाचनामुळे वाचकाला होते. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलताही वाढते. विचारशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यास मदत करणाऱ्या वाचनावर प्रत्येकाने प्रेम केले पाहिजे.वाचनामुळे मानसिक व्यायाम मिळतो ज्यामुळे वाचकाचे मन अधिक तीक्ष्ण होते; कारण वाचकाला वाचनामुळे ज्ञानाचा सागर मिळतो.

“रिते न होणारे । शब्दांचे भंडार ।

ज्ञानाचा सागर । पुस्तकच ॥”

          पुस्तक वाचनामुळे विविध लेखकांच्या दृष्टिकोनातून जग पाहण्याची संधी वाचकाला मिळते. यामुळे जीवनातील समस्यांकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी विकसित होते. वाचन आपले शब्दभांडार वाढवते आणि भाषेवर प्रभुत्व मिळविण्यास मदत करते.चांगले वाचन, चांगले लेखन आणि चांगले बोलणे याला आधार देते.तणाव कमी करण्यासाठी वाचन हा एक प्रभावी उपाय आहे.

तनाव मुक्तीच्या। आनंदात असे ।

लाभ मिळतसे । वाचकाला ॥

     शांत ठिकाणी बसून वाचनात रमल्याने मनःशांती मिळते. आजचे तंत्रज्ञानाचे युग म्हणजे भ्रमणध्वनी व इंटरनेटचे आहे. आजचा युवक हा मोबाईलच्या इतका आहारी गेलेला आहे की त्याला मोबाईल समोर काहीच सुचत नाही. युवक चार चौघात जरी बसलेला असला तरी प्रत्येक युवक हा आपल्या मोबाईलमध्ये मग्न असतो. त्यांच्यातील संवाद सुद्धा संपुष्टात येत आहे. अशा युवकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे.

मोबाईल जग । बाजूला सारून ।

करावे वाचन । युवकांनी ॥

                वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबवून अशा युवकांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.अशा युवकांनी त्यांना आवडणाऱ्या पुस्तकांचे वाचन करून वाचन प्रेरणा दिनाची सुरुवात करावी. पंधरा ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये विविध उपक्रम आयोजित केले पाहिजे. या उपक्रमांमध्ये ग्रंथ प्रदर्शन, कथाकथन, पुस्तक चर्चा, निबंध स्पर्धा आणि लेखकांच्या मुलाखती घेतल्या पाहिजे. या दिवशी डॉ.अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे -विचारांचे वाचन केल्यानंतर चिंतन – मनन करून त्यांच्या कार्याला नमन केले पाहिजे – वंदन केले पाहिजे – सलाम केला पाहिजे.पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त थोर पुरुषांच्या जीवनगाथा, संतांचे बोधपर अभंग,थोरांची आत्मचरित्रे, कथा, कविता आणि इतर विविध जीवनाला कलाटणी देणारे माहितीपर पुस्तके वाचायला हवीतच. यासाठी स्वतःच्या दैनंदिनीमध्ये सर्वांनी दररोज वाचनासाठी वेळ राखून ठेवणे आवश्यक आहे. वाचनामुळे वाचकांचे जीवन ज्ञानमय व अर्थपूर्ण होते.

वाचक जीवन । होई ज्ञानमय ।

कशाचे ना भय । जीवनात ॥

          वाचक वाचनामुळे उत्तम प्रकारे जीवन जगू शकतो. वाचकांचे जीवन वाचनामुळेच आनंदी,सुखमय व भयमुक्त होते. या वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचा संकल्प प्रत्येकाने करणे आवश्यक आहे.

               ग्रंथांना गुरू मानून विविध ग्रंथातील ज्ञान ग्रहण करून स्वतः सोबतच इतरांचेही जीवन समृद्ध करणाऱ्या डॉ. अबुल पाकीर जैनुलबदिन अब्दुल कलाम यांना त्यांच्या ९४ व्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥

कलाम कर्मांना । करितो नमन ।

करांनी वंदन । जन्म दिनी ॥

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here