Home लेख उपकारी व्यक्तीबद्दल मनात नेहमी कृतज्ञतेचा भाव ठेवा…

उपकारी व्यक्तीबद्दल मनात नेहमी कृतज्ञतेचा भाव ठेवा…

105

 

ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत, त्या उपकारी व्यक्तीबद्दल कृतघ्न नव्हे तर नेहमी मनात कृतज्ञतेचा भाव ठेवायला हवे. परंतु धवल शेठने श्रीपालबद्दल कृतज्ञता ठेवली नाही, उलट षड्यंत्र रचून त्याला अडचणीत आणले. उपकारी व्यक्तीबद्दल मनात सदैव कृतज्ञतेचा भाव ठेवावा, असे आवाहन प.पू. निलेशप्रभाजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनात श्रीपाल चरित्रात्मक कथेत सांगितले.

कुंकुद्विप येथे धवल शेठचे जहाज पोहोचले. राजाची भेट घेऊन तो राजवाड्यात पोहोचतो. तिथे अकस्मातपणे श्रीपालची भेट होते. एकसारख्या दिसणाऱ्या जगात अनेक व्यक्ती असतात, त्यामुळे खात्री पटवण्यासाठी तो श्रीपालची माहिती काढतो. तोच श्रीपाल आहे, ही खात्री पटल्यावर त्याला अडचणीत आणण्याचे षड्यंत्र आखतो. भांड समूहाला गाठून त्यांना १ लाख सुवर्णमुद्रा देण्याचे कबूल करून येथील राजाच्या जावयाला ठार मारण्याचे काम देतो. ते नाही जमले, तर ‘तो भांड आहे’ असे राजाला पटवून द्या, असा सल्ला कुमंत्री धवलला देतो. श्रीपाल भांडाला पान विडा देत असताना ते भांड त्याच्याशी विविध नाते सांगू लागतात “हा तर माझा मुलगा आहे.” राजाला श्रीपालबद्दल संशय निर्माण करण्यात भांडांचा समूह यशस्वी होतो. राजा श्रीपालला विचारतो, “खरे काय आहे?”
त्यावर श्रीपाल म्हणतो, “मी माझी स्तुती काय करू? कन्या देऊन तुम्ही माझे कुळ विचारत आहात, हे अयोग्य आहे.” श्रीपालचा मात्र आपल्या कर्मावर विश्वास असतो. “मी मांड आहे…” असे श्रीपाल राजाला म्हणतो. रागाने राजा श्रीपाल आणि लग्न लावणाऱ्या पुरोहिताला फाशीची शिक्षा देतो. त्या राज्याची कन्या, श्रीपालची पत्नी गुणमाला, हिला तिची दासी येऊन हा वृत्तांत सांगते. गुणमाला राजाला भेटण्यासाठी राजसभेत पोहोचते. धवल शेठ याच्यावर उपकार करणाऱ्या श्रीपालविरुद्ध षड्यंत्र रचतो, दुष्ट वर्तन करतो.
श्रमणसंघाचे युवाचार्य प.पू. महेंद्रऋषी म.सा. यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने त्यांचा गुणगौरव करून शुभेच्छा देत अभीष्टचिंतन धर्मसभेत करण्यात आले. राजस्थान प्रवर्तिनी, श्रमणीसूर्या प.पू. सुप्रभाजी म.सा. यांनी देखील या वेळी आपले विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, “संतांचे जीवन हे तेजस्वी चंद्र-सूर्याप्रमाणे असते. ते स्वतः तेजस्वी असतात, परंतु इतरांनाही तेजस्वी करतात.” ५० वर्षांपूर्वी ते वैराग्य अवस्थेत असताना राजगुरू माता प.पू. काश्मीर प्रचारिका प.पू. उमरावकुंवरजी म.सा. यांच्या समवेत झालेल्या भेटीची आठवण सांगून, महेंद्रऋषीजींच्या जीवनात विवेक, विनय, बुद्धिमत्ता आणि सहिष्णुता आहे, असे गुणगान त्यांनी केले.(ऑक्टोबर ०४: २०२५
जळगाव, महाराष्ट्र)

(शब्दांकन – किशोर कुलकर्णी, मो. 94227 76759)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here