


भजनातील क्रांतिकारी शब्दातून स्वातंत्र्याची प्रेरणा जनसामान्यांमध्ये निर्माण करणारे राष्ट्रसंत, ग्रामसुधारणेचे व्रत घेतलेले थोर समाज सुधारक,राष्ट्रभक्तीचा बुलंद आवाज व ग्रामविकासाचा दीपस्तंभ आणि राष्ट्रभक्त कवी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या दि.३० एप्रिल २०२६ रोजी असलेल्या ११७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ॥ ग्रामजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॥
माणिक बंडोजी ठाकूर हे राष्ट्रसंतांचे तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव. सन -१९०९ सालातील एप्रिल महिन्याच्या तीस तारखेला यावली, जि.अमरावती येथे झाला.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरू वरखेड अडकोजी महाराज यांनी माणिकला ‘तुकड्या’ हे नाव दिले,तेव्हापासून ते तुकडोजी म्हणून ओळखले जाऊ लागले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजसुधारणेचे कार्य फार मोठ्या प्रमाणात केले.समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर प्रहार केला. जातीभेद,अस्पृश्यता आणि कर्मकांडांविरुद्ध आवाज उठविला.त्यांनी कोणत्याही एका विशिष्ट जातीचा,पंथाचा धर्म न सांगता ‘मानवता धर्म’ आणि ‘विश्वधर्म’ सांगितला.त्यांच्या मते, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे आणि समाजाची सेवा करणे हाच खरा धर्म आहे.मानवता धर्म आणि विश्वबंधुत्व
महाराजांनी ‘ग्रामगीता’ या ग्रंथातून मांडले.”मानवता हाच खरा धर्म” असल्याचे त्यांनी आयुष्यभर आपल्या कीर्तनांतून, भजनातून आणि लेखनातून पटवून दिले.त्यांनी सर्व धर्मीयांना एकत्र आणण्यासाठी ‘सामुदायिक प्रार्थना’ सुरू केली. त्यांच्यामते, “ग्रामसेवा हीच खरी देशसेवा आणि देवपूजा” आहे. गाव स्वच्छ ठेवणे,व्यसनांपासून दूर राहणे आणि गावाला स्वावलंबी बनविणे हा प्रत्येक नागरिकाचा धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.खरा धर्म हा विवेकनिष्ठ असावा,असे त्यांचे मत होते.त्यांनी कर्मकांडे, अंधश्रद्धा आणि जातीभेदाला कडाडून विरोध केला.त्यांच्या मते, माणसाला नीतीमान बनवणारा विचार म्हणजे धर्म.तुकडोजी महाराजांचा धर्म म्हणजे ‘सर्वधर्मसमभाव’ आणि ‘श्रमनिष्ठा’ यांचा संगम होय. त्यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून आजही हा ‘सेवाधर्म’ जगभर पोहोचविला जातो. महाराजांनी लिहिलेला ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ म्हणजे ग्रामीण विकासाचा महाग्रंथ मानला जातो. खेड्यांचा विकास कसा करावा?,स्वच्छता कशी राखावी?, स्वावलंबी कसे जगावे? हे या ग्रंथात सांगितले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ‘ग्रामगीता’ या ग्रंथाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताच्या पुनरुत्थानाचा विचार मांडला आहे. त्यात त्यांनी ‘ग्रामनाथां’साठी जे तत्त्वज्ञान दिले आहे,ते अत्यंत व्यावहारिक आणि प्रगतशील आहे.गावाची सेवा करणे म्हणजे प्रत्यक्ष देवाची सेवा करणे होय.
ग्राम-स्वराज्य आणि स्वावलंबन
ग्रामनाथांनी गावाला स्वावलंबी बनवण्यासाठी झटले पाहिजे, हे त्यांचे प्रमुख सूत्र होते.
गावातील गरजा गावातील उत्पादनांतूनच पूर्ण व्हाव्यात.
ग्रामनाथांसाठी त्यांनी अत्यंत कडक शब्दांत सांगितले आहे की, जोपर्यंत गावात जात-पात आणि अंधश्रद्धा आहे, तोपर्यंत गावाचा विकास होऊ शकत नाही.सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन सामूहिक प्रार्थना आणि सहभोजन करावे. जुन्या जाचक रूढी सोडून विज्ञानाची कास धरावी. गावाचे नेतृत्व करणाऱ्या ‘ग्रामनाथाने’ स्वतः चारित्र्यसंपन्न असावे. दारू, गांजा, जुगार यांसारख्या व्यसनांनी गाव उद्ध्वस्त होते, म्हणून ग्रामनाथांनी गावाला व्यसनमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा.संयमित जीवन आणि सदाचार हेच सुखी गावाचे आधारस्तंभ आहेत. शिक्षण ही केवळ पदवी नसून ते जीवन जगण्याची कला असावी.गावातील प्रत्येक मूल शाळेत गेले पाहिजे.शिक्षण हे शेती आणि उद्योगाशी जोडलेले असावे, जेणेकरून तरुण गावातच राहून प्रगती करू शकतील.तुकडोजी महाराजांनी ‘सामूहिक प्रार्थना’ हे गावाच्या एकतेचे साधन मानले.जेव्हा गावातील सर्व लोक एकत्र येऊन प्रार्थना करतात, तेव्हा त्यांच्यातील भेदाभेद मिटतात आणि संघटनशक्ती वाढते. एक विचाराने चालणारे गाव हेच ‘सुखी गाव’ होऊ शकते. तुकडोजी महाराजांचे तत्त्वज्ञान सांगते की, “गाव सुधरेल तरच देश सुधरेल. ” ग्रामनाथांनी केवळ स्वतःचा स्वार्थ न पाहता ‘सर्वांगीण ग्रामविकास’ हेच आपले जीवनध्येय मानावे, हाच ग्रामगीतेचा मूळ संदेश आहे. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाची स्थापना गुरुकुंज मोझरी, जि.अमरावती येथे त्यांनी केली, ज्याद्वारे आजही सामाजिक आणि शैक्षणिक कार्य सुरू आहे.राष्ट्रसंतांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रचार व प्रसार प्रामाणिकपणे केला जातो.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या खंजिरी भजनांच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात स्वातंत्र्याची आणि समाजसुधारणेची मोठी लाट निर्माण केली होती. त्यांच्या भजनांमध्ये फक्त भक्तीच
नव्हे तर राष्ट्रभक्ती फार मोठ्या प्रमाणात होती.
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात त्यांची अनेक भजनं अत्यंत लोकप्रिय झाले होती.क्रांतीचे वारे घराघरांत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले. इंग्रजांना देश सोडावाच लागेल,असा इशारा तुकडोजी महाराजांनी अनेक भजनातून दिला होता.
“या भारतात बंधुभाव नित्य वसू दे “
हे फक्त भजन नव्हते तर भारताच्या सामाजिक एकात्मतेचे ‘राष्ट्रगीत’ मानले जाते. स्वातंत्र्यासोबतच तो टिकवण्यासाठी लागणारी एकता त्यांनी यात मांडली आहे. “नांदोत सुखे गरीब-अमीर एकमताने” त्यांच्या भजनांतून त्यांनी ‘देव’ आणि ‘देश’ यांना एकरूप केले. त्यांच्या शब्दांत इतकी शक्ती होती की,१९४२ च्या ‘छोडो भारत’ चळवळीत त्यांच्या भजनांनी प्रेरित होऊन अनेक तरुण तुरुंगात गेले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढले.स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आधी मनातील गुलामगिरी आणि अंधश्रद्धा नष्ट करणे गरजेचे आहे, असे ते सांगत असत. त्यांनी सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून लोकांमध्ये जात-पात विसरून ‘एक राष्ट्र’ म्हणून जगण्याची प्रेरणा दिली.
ते म्हणतात की,
”हर देश में तू, हर भेष में तू,
तेरे नाम अनेक, तू एक ही है…”
१९४२ च्या क्रांतीमध्ये चिमूर आणि आष्टी येथील लढ्यात तुकडोजी महाराजांच्या
“आता उठा रे, कंबर कसा रे,
उठा आता या वेळेला”
या भजनाने स्वातंत्र्याची ऊर्जा भारतीय जनतेमध्ये निर्माण केली; म्हणूनच तत्कालीन ब्रिटीश सरकारने त्यांच्यावर बंदी घालून त्यांना तुरुंगात डांबले होते.
राष्ट्रसंतांची भजने ही फक्त गाणी नव्हती तर तो एक ‘स्वातंत्र्याचा मंत्र’ होता, स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करणारी ऊर्जा होती. जी आजही आपल्याला कर्तव्यदक्ष राहण्याची प्रेरणा देत आहे आणि पुढे देत राहील .
सन -१९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी त्यांनी सीमेवर जाऊन सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी विविध देशभक्तीपर भजने गायली.राष्ट्रसंतांच्या खंजिरी भजनांनी सामान्य माणसांवर खूप प्रभाव पडला होता. मराठी आणि हिंदी भाषेतून त्यांनी प्रासादिक शब्दात जगण्याचे तत्त्वज्ञान सांगितल्यामुळे ते जनसामांन्यांच्या हृदयापर्यंत पोहोचले.समाजपरिवर्तन घडण्यास ते कारणीभूत ठरले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराज यांचे सागराएवढे सर्व समावेशक कार्य बघून त्यांना ‘राष्ट्रसंत’ या पदवीने सन्मानित केले. तेव्हापासून राष्ट्रसंत म्हणून ते ओळखले जाऊ लागले. ‘जपानमध्ये झालेल्या विश्वशांती परिषदेत त्यांनी ‘आत्मबोध’ या विषयावर विचार मांडले,ज्याचे जगभर कौतुक झाले.”देव मंदिरात नसून तो मानवात आहे आणि खरी भक्ती ही देशसेवा व समाजसेवेत आहे.हा त्यांचा विचार आज आचरणात आणणे काळाची गरज आहे .”तुकडोजी महाराजांनी दिलेला ‘ग्रामोद्धाराचा’ मंत्र आजही भारताच्या अनेक क्षेत्रातील प्रगतीसाठी अनमोल आहे.
३० एप्रिल राष्टसंतांचा जन्मदिवस हा त्यांच्या नावाने साजरा न करता तो ग्रामजयंती म्हनून साजरा करावा. ग्रामाग्रामात सर्वांनी ग्रामस्वच्छतेचे,श्रमदानाचे कार्यक्रम घेऊन रामधूनच्या माध्यमातून प्रबोधन करावे. ही उत्तुंग संकल्पना त्यांनी आपल्या अनुयायांसमोर मांडली व स्वतः ग्रामाग्रामात अशाप्रकारचे कार्यक्रम घेऊन स्वतः सांगितलेल्या संकल्पनेचे प्रत्यक्ष आचरण केले.भारतातील प्रत्येक ग्राम सुधारले पाहिजे हा त्यामागचा उद्देश होता.राष्ट्रसंत आपल्या भजनात सांगत असत,
” गावागावासी जागवा।
भेदभाव हा समूळ मिटवा।
उजळा ग्रामोत्रतीचा दिवा। तुकड्या म्हणे।। “
भारतातील ग्रामा ग्रामातील ग्रामवासियांना जागवणारे व राष्ट्रप्रेमाची ज्योत जनतेमध्ये निर्माण करणारे थोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना ११७ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ॥

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले(अमरावती)मो:-८०८७७४८६०९














