Home चंद्रपूर ने.हि. उच्च माध्यमिक विद्यालय येथे किशोरवयीन आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

ने.हि. उच्च माध्यमिक विद्यालय येथे किशोरवयीन आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

355

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

ब्रम्हपुरी:- किशोरवय हा काळ प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील टप्पा असतो. या काळात शारीरिक,मानसिक,भावनिक, सामाजिक परिवर्तन वेगाने घडत असतात. या टप्प्यावर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज लक्षात घेऊन नेवजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालय,ब्रम्हपुरी आणि एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र, ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयामध्ये ‘किशोरवयीन आरोग्य मार्गदर्शन’ कार्यक्रम नुकतेच संपन्न झाले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. पी.आर.जिभकाटे , तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. कु.नितू खाडीलकर या उपस्थित होत्या.

सदर कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक सौ. प्राजक्ता देवगडे, समुपदेशक ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना, किशोरवयात होणारे व्यक्तीतील शारीरिक, मानसिक, भावनिक बदल आणि या वयात घ्यावयाची काळजी व आवश्यक असणारी समज यावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून अमली पदार्थ व्यसनामुळे होणारे गंभीर दुष्परिणाम व त्यापासून दूर जाण्यासाठी उपाययोजना, व्यक्तीला एच.आय.व्ही. एड्स, कर्करोग यासारखे भयंकर आजार होण्याची कारणे आणि ते होऊ नये यासाठी घ्यावयाची खबरदारी, मुलींनी मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी आणि स्वच्छता, पौष्टिक आहाराचे महत्व इ. विषयावर भाष्य करतांना विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला.

पर्यवेक्षक प्रा.पी.आर.जिभकाटे यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात, किशोरवय हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा व नाजूक काळ आहे. या टप्प्यावर योग्य मार्गदर्शन, सहकार्य मिळाल्यास विद्यार्थी भविष्यातील जबाबदार नागरिक बनू शकतात हे मत मांडतांना विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्त्व उंचवण्याचा नेहमी प्रयत्न करावा असा आशावाद व्यक्त केला.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचे आभार डॉ. पी. एन. बेंदेवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here