Home महाराष्ट्र प्रवीण बागडे यांना ‘प्रबुद्ध साहित्यरत्न’ पुरस्कार : समाजाभिमुख लेखणीचा गौरव

प्रवीण बागडे यांना ‘प्रबुद्ध साहित्यरत्न’ पुरस्कार : समाजाभिमुख लेखणीचा गौरव

112

 

 

नांदेड- साहित्य हे केवळ भावनांचे चित्रण नसते, तर ते समाजाला दिशा देणारे, विचारांना चालना देणारे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे सामर्थ्यवान साधन असते. या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लेखन करणारे साहित्यिक प्रवीण बागडे यांना यंदाचा ‘प्रबुद्ध साहित्यरत्न पुरस्कार’ नांदेड येथे झालेल्या दैनिक प्रबुध्द परिवार या वर्तमानपत्राच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळयात प्रदान करण्यात आला. श्री. बागडे यांच्या लेखनात केवळ भाषेची समृद्धी दिसून येत नाही, तर त्यांच्या प्रत्येक लेखात माजाच्या वेदना, संघर्ष आणि परिवर्तनाची आर्त हाक ऐकू येते. जात, धर्म, वर्ण यांच्या पलीकडे जाऊन समानतेचा विचार, उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याची तळमळ, तसेच तरुण पिढीला जागृत करणारे विचार हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच त्यांचे लेखन आजच्या काळात अधिक परिणामकारक ठरत आहे.

आजच्या धावपळीच्या, बाजारपेठेच्या आणि स्वार्थाच्या साहित्य प्रवाहातही प्रवीण बागडे यांसारखे साहित्यिक समाजहिताची ज्योत जिवंत ठेवतात, हीच खरी साहित्यिक परंपरेची ताकद आहे. त्यांची लेखणी हा केवळ शब्दांचा खेळ नाही, तर वाचकांच्या मनात परिवर्तनाची ठिणगी पेटवणारा दीपस्तंभ आहे. ‘प्रबुद्ध साहित्यरत्न’ पुरस्काराने प्रवीण बागडे यांच्या लेखनाचा गौरव तर झाला आहेच, पण त्याचबरोबर समाजपरिवर्तनासाठी कार्यरत असलेल्या सर्वच लेखकांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे. पुरस्कार स्वीकारताना प्रवीण बागडे यांनी भावना व्यक्त करतांना “हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर जबाबदारी आहे. लेखणी ही वैयक्तिक अभिव्यक्तीची साधने नाही, ती समाजातील आवाज दाबल्या गेलेल्या लोकांचे प्रतिनिधित्व करणारी ताकद आहे. या ताकदीचा उपयोग परिवर्तनासाठी करण्याचा प्रयत्न पुढेही सुरू राहील.”

कार्यक्रमाला अनेक नामवंत साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here