


आजच्या काळात माध्यमांची ताकद प्रचंड वाढली आहे. कुठलाही गुन्हेगार, भ्रष्टाचारात नाव असलेला नेता, किंवा समाजात वाईट प्रतिमा असलेला व्यक्ती सहजपणे टीव्हीवर, सोशल मीडियावर आपले विचार मांडतो आणि त्याचा प्रचारसुद्धा मोठ्या प्रमाणावर होतो. पण खऱ्या अर्थाने देशासाठी लढणाऱ्या, त्याग करणाऱ्या आणि समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या देशभक्तांचा आवाज मात्र लोकांपर्यंत पोहोचू दिला जात नाही.
याचे ताजे उदाहरण म्हणजे एड. शिवाजीराव ढमाले साहेब. ढमाले साहेबांनी अण्णा हजारे यांच्यासोबत केलेली चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण होती. निवडणूक प्रक्रियेबाबत, लोकशाहीच्या भवितव्याबाबत त्यांनी मुद्देसूद आणि तर्कशुद्ध मते मांडली. ही चर्चा रेकॉर्ड झाली असली, तरी तिचा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचू न देणे म्हणजे देशभक्तांचा आवाज दडपण्यासारखेच आहे.
ढमाले साहेब हे फ्लाईट कमांडिंग ऑफिसर म्हणून वायुदलात कार्यरत होते. देशरक्षणाच्या जबाबदारीतून त्यांनी काम केले. आयुष्यभर देशासाठी प्रामाणिकपणे सेवा करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर कायद्याचे सखोल ज्ञान असल्यामुळे ते कोर्टात लोकांसाठी लढतात. त्यांचा संवाद, बोलण्याची पद्धत नेहमीच सभ्य आणि सौम्य असते.
अण्णा हजारे हे तर समाजसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचलेले व्यक्तिमत्त्व आहे. गावपातळीपासून दिल्लीपर्यंत त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा उभारला. अशा दोन सच्च्या देशभक्तांची चर्चा लोकांना ऐकण्याचा अधिकार नाही का? जनतेच्या हिताचे मुद्दे ते मांडतात, मग ते मुद्दे जनतेपासून दडपले जावेत का?
आज माध्यमांवर आपण गुन्हेगार, माफिया, घोटाळेबाज यांना मुक्तपणे बोलताना पाहतो. त्यांचे निवेदने लोकांपर्यंत पोहोचवली जातात. पण देशासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्यांचे विचार लोकांपर्यंत येऊ दिले जात नाहीत. हा दुहेरी मापदंड लोकशाहीसाठी धोकादायक आहे.
एड. ढमाले आणि अण्णा हजारे यांची चर्चा ऐकण्याचा मला योग आला. ती चर्चा केवळ बौद्धिकच नव्हे तर लोकशाहीच्या शुद्धतेसाठी प्रेरणादायी होती. जर ती व्यापक जनतेपर्यंत गेली असती, तर नक्कीच समाजमनावर चांगला परिणाम झाला असता.
देशभक्तांचे विचार दडपण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देणे ही खरी लोकशाहीची गरज आहे. दोन देशभक्तांच्या संवादाला थारा न देणे म्हणजे लोकशाहीची दिशाच चुकीची दाखवणे होय.
आजची ही हाक प्रत्येकाने ऐकायला हवी—
गुन्हेगारांचे नव्हे, तर देशभक्तांचे बोलणे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.
शिवराम पाटील, मो. 92709 63122














