Home चंद्रपूर आदर्श शिक्षक श्री हिरामण श्रीकुंडावार गुरुजींचा ९१ व्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार निमकर...

आदर्श शिक्षक श्री हिरामण श्रीकुंडावार गुरुजींचा ९१ व्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार निमकर यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार धोबी समाजात जन्म, शिक्षणातून परिवर्तन… ३५ वर्षे सेवा देणाऱ्या कर्मयोगी हिरामण श्रीकुंडवार गुरुजींच्या जीवनप्रवासास राजूरा नतमस्तक

184

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजूरा – स्वातंत्र्यपूर्व काळात एका गरीब धोबी कुटुंबात जन्म, गाठलेले ज्ञानाचा उच्च शिखर आणि पचवलेली साधी राहणी… हा प्रवास कुण्या नामवंत उद्योजकाचा नाही तर जिल्हा परिषदेच्या शाळेत तब्बल ३५ वर्षे शिक्षक म्हणून सेवा करणाऱ्या हिरामण श्रीकुंडवार गुरुजींचा आहे. वयाची ९० वी पार करूनही उत्साहाणे भरलेली नजर, मनामध्ये अजूनही तरुणाला लाजवेल असे चैतन्य, आणि आयुष्यभर शिक्षण देतानाचा आत्मिक आनंद… अशा गुरुजींचा व त्यांच्या जीवनसाथीचा सत्कार नुकताच नक्षत्र सभागृहात मोठ्या भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

माजी आमदार सुदर्शन निमकर आणि सौ. वर्षा निमकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे निमकर हे स्वतः गुरुजींचे माजी विद्यार्थी! ‘माझ्या हातून घडलेली ही पालवी आज मोठं झाड होऊन मला वाकून नमन करत आहे, अशा शब्दात गुरुजींनी भावना व्यक्त करत संपूर्ण हा क्षण ‘भाग्यवान’ असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

६ ऑगस्ट १९३५ साली राजूरा येथे बाराबलुतेदारातील पारंपरिक गरीब धोबी समाजात जन्मलेले श्रीकुंडवार गुरुजी हे केवळ शिक्षक नव्हते, ते त्या काळात शिक्षणाच्या प्रकाशाचा झोत घेऊन दुर्गम गावात गेलेले एक ज्ञानयोद्धा होते. १९५८ मध्ये फक्त ९० रुपयांच्या पगारावर नोकरीला सुरुवात करून त्यांनी जीवनभर शिक्षणासाठी वाहून घेतले. जिवती तालुक्यातील शेडवाई सारख्या दुर्गम भागात त्यांनी विद्यादान केलं, तर माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या चुनाळा गावात तब्बल १० वर्षे शिक्षक म्हणून काम केलं. आज निमकर जे काही आहेत, ते या गुरुजींच्याच शिकवणुकीमुळे, हे त्यांनी आवर्जून नमूद केलं.

‘मै भी कुछ कम नही’ म्हणत खांद्याला खांदा लावून आयुष्यभर सोबत देणारी त्यांच्या धर्मपत्नींचीही उपस्थितांमध्ये तितकीच कौतुकास्पद चर्चा झाली. आजही त्यांच्या उत्साहाने तरुणांनाही लाजवेल अशी त्यांची तब्येत आणि व्यक्तिमत्त्व आहे.

या कृतघ्नता सोहळ्याला माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, गुरुजींचे चिरंजीव कार्यक्रमाचे आयोजक मुरलीधर श्रीकुंडावार, संजय श्रीकुंडावार सह विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, आप्तेष्ट, सामाजिक कार्यकर्ते आणि धोबी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका गुरुजींचा गौरव हे केवळ त्यांचं वैयक्तिक यश नव्हे, तर शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवणाऱ्या संपूर्ण शिक्षक समाजासाठीचा सन्मान होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here