Home लेख लोकराजा राजर्षी शाहू महाराज

लोकराजा राजर्षी शाहू महाराज

121

 

 

 

 

 

 

महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत, दीन शोषितांचे तारणहार, थोर समाज सुधारक राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंती दिनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचार कार्यावर एक दृष्टीक्षेप टाकून या लोकराजाचे आपल्या रयतेविषयी चा जिव्हाळा लोककल्याणकारी ध्यास व मानवतावादी बंधाचे स्मरण करण्याचा हा प्रयत्न….!

लोकराजा म्हटले की कृतज्ञतेने नतमस्तक व्हावे असे एकमेव नाव समोर येते ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज..! शाहूराजांनी संपूर्ण आयुष्यभर रयत हाच केंद्रबिंदू मानून लोकहितासाठी जेजे करता येईल ते ते या राजाने केल्याचे दिसून येते याची नोंद इतिहासात आढळून येते. व कित्येक लोकांच्या मनामनात राजांची छाप दिसून येते म्हणूनच तर ते लोकराजा आहेत. ‘राजर्षी’ ही पदवी त्यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या महान कार्यामुळे कानपूर येथे क्षत्रिय परिषदेत बहाल करण्यात आली. तसेच शाहूं राजांचे प्रजेविषयीच्या कर्तव्य निष्ठेचे कौतुक करून राणी व्हिक्टोरियाने त्यांना ‘महाराजा’ ही पदवी बहाल केली. म्हणजेच लोकराजा, राजर्षी, महाराज ही नामाभिधाने शाहूंच्या मौलीक कार्यकर्तृत्वाचा वारसा सांगणारी आहेत ही कोणतीही पारंपारीक नावे नव्हेत म्हणूनच प्रस्तुत लेखाचे शीर्षक’ लोकराजा राजर्षी शाहू महाराज’ असे आहे.

 

राजर्षीची शैक्षणिक क्रांती

 

 

‘ समतेवर आधारित समाजव्यवस्था निर्मितीसाठी शिक्षणप्रसार’ हे शाहू महाराजांचे शैक्षणिक तत्वज्ञान होते या तत्त्वाचा ध्यास घेऊन त्यांनी शैक्षणिक धोरणे अंमलात आणली. शिक्षणानेच आमचा तरणोपाय होईल असे राजांचे मत होते ज्या काळात शिक्षण ही ठराविक समाजाची मक्तेदारी होती ती राजर्षीनी मोडून काढली व बहुजनांना शिक्षण देण्याची सोय केली. सर्वांना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. मुलांना शाळेत न पाठविल्यास, मुलगा गैरहजर राहिल्यास पालकांना ‘एक रुपया’ दंड करावा असा आदेश काढला. शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या वसतिगृहांमधून अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले ही प्रेरणा घेऊनच सध्या शासनातर्फे विविध वसतिगृहांची सोय करून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास प्रवृत केले जाते. शाहू राजांनी १९०२ मध्ये ५० टक्के आरक्षणाचा कायदा शिक्षण व रोजगार यामध्ये केला. असे आरक्षण भारतामध्ये कागदोपत्री देणारे शाहूजी पहिले राजे आहेत म्हणूनच शाहूजींना आरक्षणाचे जनक म्हटले जाते.

 

*समतावादी राजे*

 

 

विसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस वर्षात सामाजिक जीवन ढवळून काढणारे, बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणारे व सामाजिक समतेची प्रतिष्ठापना करणारे महामानव म्हणजे राजर्षी शाहू होय. वर्षानुवर्षे जातीच्या आधारावर बहुसंख्य समूहाला ज्ञान, सत्ता, संपत्ती इतकेच नव्हे तर मानवी मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले होते. ही सामाजिक विषमता नष्ट करण्याकरिता राजर्षीनी केलेले कार्य अतुलनीय आहे. कुस्तीच्या आखाड्या मध्ये महाराजांनी विविध जातीधर्माच्या पैलवानांना आश्रय दिला त्यांना वेगवेगळी नावे देऊन सर्वांना समान कुस्तीचे प्रशिक्षण देऊ केले. सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी विविध वसतिगृहे स्थापन केली व शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांना समतेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले.

जातीभेद संपवण्यासाठी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली व तसा कायदा मंजूर केला. या कायद्याची सुरुवात स्वतःची चुलत बहीण चंद्रप्रभाबाई हिचा विवाह इंदोरच्या यशवंतरावहोळकर यांच्याशी घडवून आणला व स्वतःच्या उदाहरणांमधून सामाजिक परिवर्तनाचा आदर्श घालून दिला. सर्व समाजात एकात्मता असावी, न्यायासनासमोर सर्वजण सारखे समजले जावेत, सर्वांना सारखा सामाजिक न्याय मिळावा, वरिष्ठ कनिष्ठ वर्गातले भेद नाहीसे व्हावे या सर्वांकरिता बजावलेली भूमिका या सर्व योगदानामुळे महाराष्ट्र शासनातर्फे शाहू महाराजांचा जन्मदिवस 26 जून हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो.

 

*शेती, उद्योग, यामध्ये सहकार तत्वाचा पाया रचणारे राजर्षी शाहू*

 

महाराष्ट्रात शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर दिसतो याची पायाभरणी शाहू महाराजांनी केल्याचे दिसून येते 1902 मध्ये शाहू महाराजांनी पाटबंधारे खाते निर्माण केले. जलव्यवस्थापनाचा उत्कृष्ठ नमुना राधानगरी धरण बांधले ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या संकल्पनेतील जलसंधारणाचे काम शाहू राजांच्या काळात झाले. शेतीक्षेत्राला उदयोग व्यापाराची जर जोड मिळाली तर आर्थिकदृष्ट्या समृद्धी येईल हा विचार करून राजांनी कोल्हापूर व जयसिंगपूर येथे बाजारपेठा उभारल्या. आजही देशातील सर्वात मोठी गुळाची बाजारपेठ म्हणून कोल्हापूरकडे बघितले जाते परंपरागत पिकांबरोबरच चहा, कॉफी व रबराचे मळे निर्माण केले. याचबरोबर सुती कापड उद्योग, मधुमक्षिका पालन उद्योग, सुगंधी तेल, औषध उद्योग सुरू केले. आज आपणास जिल्ह्यात दिसणाऱ्या सहकारी संस्था, सहकारी बँका, सहकारी उद्योग, ग्रामीण पाणीपुरवठा संस्था…. इ. सुस्थितीमध्ये दिसत आहेत या सहकारी तत्वाची पायाभरणी शाहू महाराजांनी केली हे सहकार तत्व आजही राज्याच्या विकासामध्ये हातभार लावत आहे.

 

क्रीडा, कला प्रेमी शाहूराजे

 

एखादया सुसंस्कृत समाजासाठी कलेचे महत्व अनन्यसाधारण आहे. समाजासाठी कला या भावनेतून कलेचा आस्वाद घेणारे आणि कलेला प्रोत्साहन देणारे राजाश्रय देणारे राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळेच कोल्हापूर नगरीस कलानगरी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक जडणघडणी मध्ये शाहूराजांचे मोलाचे योगदान आहे. संगीत कलेला प्रोत्साहन देण्यासाठी१८९२ साली कोल्हापूरात देवलक्लब या संगीत संस्थेची स्थापना करण्यात आली. नाट्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी शाहू महाराजांनी१९१५ साली बांधलेले भव्य राजेशाही पॅलेस थिएटर बांधले व नाट्य रसिकांची सोय करून दिली. चित्रपट कलेसाठी थिएटर बांधण्यासाठी बाबूराव पेंटर यांच्या कंपनीसाठी मंगळवार पेठत जागा दिली यामुळेच कोल्हापूरची ओळख मराठी चित्रपट सृष्टीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. शाहू महाराजशरीराने बलदंड होते त्यांनी स्वतः नेमबाजी, कुस्ती, अश्वारोहण या क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवले होते खेळाला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी कुस्तीसाठी अनेक तालमींची निर्मिती केली सध्या कोल्हापूर हे कुस्तीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते संपूर्ण भारतातून अनेक मल्ल प्रशिक्षणासाठी कोल्हापूरात येताना आपण पाहतो ही शाहू महाराजांची देण आहे.

 

*सर्व स्त्रियांना संरक्षण देणारे राजे*

समताधिष्ठीत समाजव्यवस्थेसाठी झटणारे राजे सर्व स्त्रियांकडे आदराने व सन्मानाने पाहत तत्कालीन परिस्थिती मध्ये स्त्री उन्नती साठी त्यांनी पोटतिडकीने काम केल्याचे दिसून येते स्त्रियांना शिक्षण व समान हक्क मिळालेच पाहिजे यासाठी ते आग्रही होते. शाहू महाराजांनी मुलींना शैक्षणिक फी माफी, शिष्यवृत्या, बक्षीसे तसेच वसतिगृहाची सोय केली मुलींसाठीच्या स्वतंत्र शाळेचाही त्यांनी पुरस्कार केला या प्रयत्नामुळेच त्या काळात स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढले. स्त्रीशिक्षणा बरोबरच तिच्या नैसर्गिक हक्कांचे संरक्षण करणारे अनेक कायदे ही केले.

अॅड करुणा विमल, कोल्हापूर
मो. 9921864129

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here