


✒️किरण रामी बाबुराव(मोहिते)संपर्क:-9561883549
“पंजाब, सिंध, गुजरात, मराठा…”
जेव्हा भारताचे राष्ट्रगीत अभिजात कवि रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले, तेव्हा त्यांनी त्या शब्दांमधून भारताच्या विविध भागांचा गौरव केला. पण महाराष्ट्र या नावाचा उल्लेख नसून “मराठा” असा उल्लेख आल्याने अनेकांना प्रश्न पडतो – *टागोरांनी ‘मराठा’ शब्द का वापरला?*
हा प्रश्न जितका भाषिक आहे, तितकाच तो ऐतिहासिक आणि अस्मितामूलकही आहे. *”मराठा” हा शब्द त्या भूमीची ओळख नाही, तर त्या भूमीच्या स्वाभिमानाची शपथ आहे.*
*मराठा –एका संघर्षशील इतिहासाचे नाव*
*”मराठा”* म्हणजे केवळ एक जात नव्हे. तो आहे एक विचार–जो अन्यायाविरुद्ध बंड करतो, जो गुलामगिरी स्वीकारत नाही, जो ‘स्वराज्य’ ही फक्त राजकीय संकल्पना नसून *सामाजिक परिवर्तनाची दिशा* मानतो.
*छत्रपती शिवाजी महाराज* यांनी *”मराठा स्वराज्य”* स्थापून ही दिशा दिली. पण हे स्वराज्य तलवारीपुरते मर्यादित नव्हते. *समानतेचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा घोष* यामध्ये होता. *मराठा* ही एक समृद्ध, लढवय्या, समतावादी मनोवृत्ती होती – जी आपल्या न्यायासाठी शेवटपर्यंत लढते.
*फुले-शाहू-आंबेडकर – मराठा संकल्पनेचे व्यापक रूप*
“मराठा” हा शब्द राष्ट्रगीतात का आला, याचे उत्तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्यात नाही, तर *महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या कार्यात आहे.
*महात्मा जोतिबा फुले* यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक क्रांती घडवून आणली. त्यांनी जातीव्यवस्थेच्या पायाभूत विषमतेविरुद्ध लढा दिला. त्यांचं कार्य म्हणजे *मराठा संकल्पनेला सामाजिक न्यायाची धार देणे*.
*राजर्षी शाहू महाराज** हे खर्या अर्थाने सामाजिक लोकशाहीचे आद्य प्रवर्तक होते. त्यांनी आरक्षण, शिक्षण, बहुजन कल्याण या माध्यमातून *मराठा संकल्पनेचे समावेशक रूप* समोर आणले.*महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर* हे तर त्या संकल्पनेचे अंतिम प्रगल्भ रूप होते. त्यांनी संविधान रचून स्वराज्याला *समता, न्याय आणि बंधुता* या मूल्यांची शाश्वत चौकट दिली.
*टागोरांचा दृष्टीकोन – मराठा म्हणजे राष्ट्राभिमान*
रवींद्रनाथ टागोर यांचा “मराठा” हा शब्द फक्त भूगोल नसून इतिहासाचा आणि भविष्याचा संगम होता. त्यांनी ज्या *मराठा* चे स्मरण राष्ट्रगीतात केले, तो फक्त महाराष्ट्र नव्हता – तो होता त्या भूमीचा लढवय्या स्वभाव, अन्यायाविरुद्ध उभी ठाकणारी वृत्ती, आणि समतेसाठी अहोरात्र झुंजणारी जाणीव.*तो ‘मराठा’ होता–जो फक्त तलवारीनेच राज्य नाही करत,तर विचारांनी समाज बदलतो, आणि शिक्षणाने भवितव्य घडवतो.*
*आजच्या काळातील अर्थ – मराठा म्हणजे समतेचा आवाज*
आज ‘मराठा’ हा शब्द राजकारणाच्या समीकरणांमध्ये अडकतो, आरक्षणाच्या चर्चेत गोठतो, आणि जातीच्या चौकटीत मर्यादित केला जातो. पण सत्य हे आहे की – *मराठा ही केवळ जात नसून चळवळ आहे.*
ती चळवळ आहे –शेतकऱ्याच्या आत्महत्येचा विरोध करणाऱ्या युवकाची, शोषित विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या संस्थेची, अन्यायाने ग्रस्त महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याची,जातीपातीच्या पलिकडे जाऊन *”नवभारत”* उभारणाऱ्या विचारांची.
*‘मराठा’ ही आपली ओळख आहे, फक्त इतिहास नाही*
*”मराठा” हा शब्द राष्ट्रगीतात असण्यामागे एक ऐतिहासिक ठसा आहे. तो शब्द त्या भूमीचा गौरव आहे, जिच्या कुशीत राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर फातिमा शेख,छत्रपती शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती रमाई, कर्मवीर भाऊराव पाटील, साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे असे अनेक महान व्यक्तींत्व, महामानव जन्मले.*
*”मराठा”* म्हणजे स्वाभिमान, न्याय, समता आणि परिवर्तनाचे प्रतीक. तो शब्द गाताना आपण महाराष्ट्र नाही – तर समग्र भारताच्या स्वातंत्र्याची आणि सामाजिक न्यायाची गाथा गातो.
*संदर्भ: टागोर लेखसंग्रह, फुले समग्र वाङ्मय, शाहू महाराज भाषणे, डॉ.आंबेडकर लेखन संच, भारताचा सामाजिक इतिहास]*














