


जळगाव शहरातील लोक महाराष्ट्रातील इतर कोणत्याही शहरांपेक्षा जास्त कर भरतात. शिवाय येथे खूप मोठी व्यापारी पेठ आहे. त्याचा खूप मोठा कर आणि महानगरपालिका मालकीच्या दुकानांचे भाडे येते. त्यात भर भर म्हणून पुन्हा एमआयडीसीचा इंडस्ट्रीयल टॅक्स तर तगडा येतो. इतका पैसा जमा होऊनही जळगाव शहरातील रस्ते बनले नाहीत. बनवले नाहीत आणि बनतही नाहीत. जे बनले ते टिकले नाहीत. तर मग कराचा पैसा गेला कुठे?
जळगाव जिल्ह्यात विद्यापीठ आहे. अकरा इंजिनिअरींग कॉलेज, तीन मेडिकल कॉलेज, एक जिल्हा सत्र न्यायालय, त्यातील तीस न्यायाधीश सत्तर वकील. तीनशे प्रोफेसर चार युपीएससी अधिकारी, साठ एमपीएससी अधिकारी. तरीही जळगाव मधील रस्त्यांचे घोडे पेंड खाते. रोज रस्त्यावर अपघात होऊन बाया, माणसे, पोरं मरतात. काही तर कायमचे अपंग झालेत. एक दोन दिवसा आड रस्त्यासाठी आंदोलन होतात.मला बोलवतात. मी जातो.
मी म्हणतो, रस्ता बनवणे हे आमदार खासदार मंत्री चे काम आहे. तेच लोक जिल्हा नियोजन समिती मधे सदस्य आहेत. ते प्रस्ताव टाकतात. त्याची तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी होते. इस्टीमेट नुसार निधी मंजूर होतो. वर्क ऑर्डर पण दिली जाते. आमदार आणि नगरसेवक हेच ठेका घेतला. साला, पाव्हणा, जावई,भाचे जावई यांच्या नावाने. पण कामे न करता मेझरमेंट बुक भरले जाते. पैसा दिला जातो. रस्ता नाही बनवला तरीही पैसा दिला जातो. गटार नाही बनवली तरीही पैसा दिला जातो. नो वर्क, फुल पेमेंट!
तरीही जळगावचे लोक बोलत नाहीत. का बोलत नाहीत? काहीतरी रहस्य असलेच पाहिजे. जर कोणाला जाग आली आणि राग आला तर तो सरळ महानगरपालिका आयुक्त किंवा कलेक्टर कडे जातो. जे लोक नोकर आहेत. ते एक्झिक्युटिव्ह आहेत. ते नियोजन करीत नाहीत.ते प्रस्ताव टाकत नाहीत. ते फक्त वर्क ऑर्डर ची कारवाई राबवतात. तरीही जळगाव शहरातील डॉक्टर, वकील इंजिनिअर प्रोफेसर व्यापारी उद्योजक हे आयुक्त आणि कलेक्टर कडे का डोकेमारी करतात? याचे रहस्य आहे.
जळगाव शहरातील लोक रस्ता, गटार साठी आमदार खासदार, पालकमंत्री कडे जात नाहीत. कारण काय? यांना त्यांचेकडे जाण्याचे, तक्रार करण्याचे नैतिक बळ नसते. का? कुठे हरवले, नैतिक बळ? ते विकले. फक्त पांचशे, हजार, दोन हजार रुपयात. यावेळी एका मताचा विक्री दर होता दोन हजार रूपये. मत खरेदीचे बजेट होते चाळीस कोटी रूपये. जर आमदारांनी मतदारांचे मत खरेदी केले असेल तर हे मतदार त्या आमदारांच्या पुढे नाक लावू शकत नाहीत. जरी ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस सांगत असले तरीही! जरी ते वल्लभभाई पटेलांचे वारस सांगत असले तरीही! जरी ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वारस सांगत असले तरीही! वारस असू द्या हो! अब्रू विकून पैसा कमावणारी बाई, आणि मत विकून पैसा कमावणारा पुरूष यांच्यात वर मान करुन, ताठ मान करून बोलण्याची हिंमत उरत नाही. ज्यांनी अब्रू विकली, ज्यांनी मत विकले त्यांची कोणतीही हैसियत राहातं नाही. म्हणून ते रस्ता गटार पाणी आरोग्य साठी आमदार खासदार, पालकमंत्री कडे न जाता आयुक्त आणि कलेक्टर कडे जातात. ते पण उच्चशिक्षित माणसे. आला कोणी निवेदन द्यायला घेऊन टाकतात. फोटो काढून घेतात. हा विकला गेलेला माणूस आणि बाई यांना मुर्ख बनवणे त्यांच्या दृष्टीने बाये हातका खेल है!
आम्ही महाराष्ट्र जागृत जनमंच ने मागील दहा वर्षांपासून रस्ता गटार पाणी आरोग्य साठी मोहिम काढली होती. सर्वच प्रभागातील रस्ता गटार पाणी आरोग्य बाबत जागेवर जाऊन ओरडलो. व्हिडीओ काढले. प्रसारीत केले. लोकांनी वाहवा केली.पण या मोहिमेत भाग घेतला नाही. कारण तसेच दमदार होते. जर या मोहिमेत दिसलो तर विधानसभा आणि नगरसेवक उमेदवार पैसा देणार नाही. जर मागायला गेला तर सांगतो,”तू शिवराम पाटील सोबत दिसला होता. लई शहाणा बनला होता. तर मग शिवराम पाटील कडून पैसा मागून घे. “ही भीती त्यांना या मोहिमेत येऊ देत नव्हती. मी शिवाजीनगर मधील धनाजी काळे नगर मधील एका महिलेला मतांचे पैसे घेतात, याबाबत बोललो. तर ती महिला म्हणाली ,” लोक घेत असतील पण मी नाही घेत. “मी ताबडतोब तिचा पाया पडलो. तसाच फोटो काढला. तर ती महिला मला विनवत होती. “भाऊ,तो फोटो डिलीट कर. नाहीतर मामा माले काय म्हणतील?” त्या महिलेला मताचे पैसे मिळाले नसते. मला दया आली. मी पाया पडतानांचा फोटो डिलीट केला.
हजार दोन हजार रूपयांसाठी जर महिला इतकी गयावया करीत असेल तर या लाचारीचा गैरफायदा आमदार तर घेणारच! असे मत विकणारे माणसे आणि बाया जळगाव मधे आहेत तो पर्यंत रस्ता न बनवता पैसा हडप होणारच! तो बिचारा उमेदवार कोठून देणार पैसा? घर, शेत, दुकान विकून देणार का? तो रस्ता गटार पाणी आरोग्य मधूनच चोरणार. हो चोरणारच! जर मतांचे पैसे द्यावे लागत असतील तर तो चोरी करणारच!चोरी करणे हा त्याचा घटनात्मक अधिकार आहे. मत विकणाऱ्याला हा अधिकार मान्य करावाच लागेल.
शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव मो.९२७०९६३१२२















