


धर्मो धारयते प्रजा.प्रजेचे धारण, कुटुंब,समाज,समुहकरण,एकत्रीकरण, संरक्षण, संस्कार,विकास यासाठी धर्माची संकल्पना मांडली गेली.हिंदू काय, कोणत्याही धर्माचा उदय याच कारणे,असाच झाला आहे.फरक इतकाच स्थळ काळ परत्वे त्यात काही बदल आढळतात.
धर्म अव्याहत राहावा, पुढील पिढ्यांमध्ये संक्रमण व्हावा म्हणून मुद्दाम धर्मपिठे निर्माण केली गेली.तेथे धर्माचा सांगोपांग अभ्यास करून त्याचा प्रचार, प्रसार निरंतर चालला पाहिजे.म्हणून तेथे आधिकतम बुद्धिमान, उच्चशिक्षित, ज्ञानी, चारित्र्यवान लोकांचा भरणा होता.त्यांना धर्मपंडित,धर्मगुरू असे म्हणत असत.तेथून ज्ञान घेऊन पिठाबाहेर पडून काही लोक प्रचारक म्हणून काम करीत असत.त्यांना साधू,संत,महंत म्हणत.ते किर्तन, प्रवचन, व्याख्यान देऊन धर्माचे सार सामान्य लोकांपर्यंत पोहोचवत असत.त्यामुळे त्या त्या धर्मातील आचरण केले जात असे.ज्यांना तत्वज्ञान कळत नाही त्यांना कर्मकांड करायला सांगितले जात होते.
आता परिस्थिती विपरीत झाली आहे.धर्माचे तत्वज्ञान लुप्त होऊन फक्त कर्मकांड शिल्लक राहिलेले आहे.राजकिय पक्षांनी धर्माची धुरा आपल्या हाती घेतली आहे.सत्ता मिळवण्यासाठी धर्माचा वापर होत आहे.त्यामुळे धर्मात फक्त कर्मकांड नव्हे वितंड सुरू झाले आहे.कर्मकांड करणारे ,वितंड करणारे स्वताला धर्माचे मालक समजू लागलेले आहे.ज्यात तत्वज्ञानाचा लवलेश नसतो.म्हणून धर्माचा राजकीय सोयीप्रमाणे वापर होत आहे.यात अशिक्षित, अल्पशिक्षित लोक बळी पडत आहेत.ही परिस्थिती पाहून धर्मपंडित आणि धर्म मार्तंड स्तब्ध बसलेले आहेत.ते खरा धर्म,धर्माचे तत्वज्ञान सांगत नाहीत.त्यांना कर्मकांड करणाऱ्यांची,वितंड करणाऱ्यांची भीती वाटते.
याची अनेक उदाहरणे देता येतील.महात्मा ज्योतिबा फुले यांनी धर्माचा अभ्यास केला.सत्य शोधले.ते सांगितले.त्यानुसार आचरण केले.हे अशिक्षित, अल्पशिक्षित लोकांना कळले नाही.म्हणून मारेकरू बनून खून करायला धावले.पण जेंव्हा त्याचा संवाद महात्मा ज्योतिबा सोबत झाला.तेंव्हा त्यांना चूक कळली.ते सावध झाले.सावरले.
महात्मा गांधी यांनी सुद्धा धर्माचा अभ्यास करून त्यानुसार जिवन प्रणाली अनुसरली.जरी राजकारण केले तरी धर्माचा गैरवापर केला नाही.धर्माला बाधा आणली नाही.तरीही लोकांनी त्यांचा खून केला.
डॉ दाभोळकर यांनी सुद्धा धर्माचा अभ्यास करून त्याची सांगड विज्ञान, तत्वज्ञान,तर्काशी घातली.मळभ झटकले.पण राजकीय लोकांना ते आवडले नाही.त्यांना धर्माचा गैरवापर करणे अवघड जाऊ लागले.म्हणून त्यांचा सुद्धा खून केला.
जो कोणी धर्माचा सखोल अभ्यास करतो.कर्मकांड बाजूला सारून तत्वज्ञान सांगतो तो राजकीय लोकांना खटकतो.अशिक्षित , अल्पशिक्षित लोक त्यांचे सैनिक असतातच.कर्मकांड करणारे स्वताला धर्माचे मालक समजतात.त्यांचे म्हणणे असते लोकांना धर्माचे तत्वज्ञान सांगू नये.जर लोक शहाणे झाले तर ते आमच्या मुठीत राहाणार नाहीत.
याचकारणे धर्मातील तत्वज्ञान लुप्त होऊन फक्त कर्मकांड उरलेले आहे.आता पुन्हा धर्म पंडित,धर्मुगुरूं नी खरा धर्म लोकांना सांगितला पाहिजे.कि धर्म हा मानवाची जिवन अखंड प्रणाली सांगतो.राजकारण हे फक्त सत्ता प्रणालीशी निगडित आहे. राजकारणात काठी, लाठी, चाकू, सुरी ,भाला , तलवार वापरले जाते.धर्मात हे निषिद्ध आहे. धर्मात बुद्धी ज्ञान निती चारित्र्य पावित्र्य वापरले जाते.
✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२














