Home चंद्रपूर ब्रम्हापुरी करानी ‘मी’ गाण्यासाठी मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स 2024 मानाचा पुरस्कार पटकावला

ब्रम्हापुरी करानी ‘मी’ गाण्यासाठी मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स 2024 मानाचा पुरस्कार पटकावला

573

 

रोशन मदनकर (उपसंपादक, मो. 88886 28986)

ब्रह्मपुरी:- येथील प्रतिभावान गीतकार-संगीतकार व संगीत संयोजक अक्षय मदनकर, रोहित वावरे आणि शिवम गुरनुले यांनी ‘मी’ गाण्यासाठी मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स 2024 मध्ये “बेस्ट म्युझिकल अरेंजर (सर्वोत्कृष्ट संगीत संयोजन) या श्रेणीत मानाचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच, याच गाण्यासाठी त्यांना “बेस्ट सिंगर” (सर्वोत्कृष्ट गायक) या पॉप गाण्याच्या श्रेणीत नामांकनही मिळाले होते. विशेष म्हणजे, या पुरस्कारांच्या इतिहासात विदर्भातील कलाकारांना प्रथमच नामांकन मिळाले होते.
‘मी’ गाण्याने श्रोत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. या गाण्यासाठी त्रिकुटाने शांत आणि मनाला स्पर्श करणारे बोल आणि अप्रतिम संगीताची निर्मिती केली आहे. प्रसिद्ध मराठी गायक जयदीप वैद्य यांनी या रिप्राइज गाण्याला आपला सुमधुर आवाज दिला आहे, ज्यामुळे गाण्याची लोकप्रियता आणि कलात्मकता अधिक वाढली आहे. ‘मी’ गाण्याची रिप्राइज आवृत्ती VDO Jar OTT प्लॅटफॉर्मवर आणि Rhyfil मराठी या YouTube चॅनेलवर प्रदर्शित झाली आहे.
मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स 2024 चा शानदार सोहळा 9 मार्च 2024 रोजी पुणे येथे संपन्न झाला. या सोहळ्याला महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि कलाकारांची उपस्थिती होती.
पुरस्कार सोहळ्यात मराठी पॉप भावगीत, खान्देशी पॉप भावगीत, कोकणी/मालवणी पॉप भावगीत, आगरी कोळी पॉप भावगीत, लोकगीत, शास्त्रीय-उपशास्त्रीय, भक्तिगीत, नवोदित, विशेष पुरस्कार आणि जीवनगौरव संगीतरत्न पुरस्कार यांसारख्या विविध श्रेणींमध्ये कलाकारांना सन्मानित करण्यात आले.
विशेष सन्मान आणि नामांकने:
अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांना मराठी इंडी म्युझिक आयकॉन पुरस्काराने गौरवण्यात आले.
सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या कार्यक्रमाला आयकॉनिक इंडी मराठी शो पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशोक पत्की यांना संगीतरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाना पाटेकर यांना सर्वोत्कृष्ट गीतकार (Best Lyricist) साठी नामांकन मिळाले होते.
विजय प्रकाश, रोहित राऊत, हृषिकेश रानडे, जयदीप वैद्य आणि अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट गायक (Best Singer) या श्रेणीत नामांकन मिळाले होते.

ब्रह्मपुरीच्या कलाकारांनी ‘मी’ गाण्याच्या माध्यमातून मिळवलेले हे यश विदर्भासाठी अभिमानास्पद आहे आणि मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स 2024 हा सोहळा महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीने विशेष ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here