Home महाराष्ट्र सांगडी येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे उद्घाटन: उध्दव साबळे यांच्या ग्रामगुज ग्रंथाचे...

सांगडी येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे उद्घाटन: उध्दव साबळे यांच्या ग्रामगुज ग्रंथाचे प्रकाशन 

235

▪️राष्ट्रसंतांचे साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवले गेले पाहिजेत- सुहासिनी रेड्डी चिट्टाला 

   डॉ . मोतीजी महाराज साहित्य नगरी सांगडी

      राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि सांगडी श्रीगुरुदेव सेवा मंडळ , ग्रामस्थांच्या सहकार्याने सांगडी (मंडल -बेला), जि. आदीलाबाद येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलनाचे उद्घाटन डॉ. मोतीजी महाराज साहित्य नगरीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. दि. ६ व ७ मार्च या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन आदिलाबाद जि. प. चे माजी अध्यक्ष सुहासिनी रेड्डी चिट्टाला यांचे हस्ते झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून पुणे येथील गोविज्ञान अभ्यासक पंढरीनाथ चंदनखेडे , ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाळ पदवाड, नागपूर श्रीगुरुदेव सेवाश्रमाचे अध्यक्ष एड. अशोक यावले, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, फिल्म निर्माते अनुप श्रीरामे, स्वागताध्यक्ष प्रभाकर नवघरे, माजी सैनिक तथा जरूड गावाचे माजी सरपंच सुधाकर मानकर, सौ. विजया दहेकर, मारोतराव इचोडकर , विठ्ठल पुनसे, डॉ . चंद्रकांत शहासने , डाखरे महाराज आदींची उपस्थिती होती.

      संमेलनाध्यक्ष पंढरीनाथ चंदनखेडे म्हणाले की, साहित्य विश्वातील श्रेष्ठ कलाकृती म्हणजे ग्रामगीता हा ग्रंथ आहे . याच ग्रामगीतेतील पंधरावा अध्याय गोवंश सुधार असून अलीकडच्या काळात गोमातेची घटती संख्या लक्षात घेता गोमातेचे संवर्धन करणे गरजेचे आहे , असे ते म्हणाले.गोमातेची सेवा करणे म्हणजे मातृत्वाच्या सागराचे महाकाव्य अनुभवणे आहे .गोमाता ही ममतेचा सागर असून ते देशाचे अध्यात्म शास्त्र आहे , असे संमेलनाध्यक्ष श्री. चंदनखेडे म्हणाले. यावेळी सुहासिनी रेड्डी म्हणाल्या की, राष्ट्रसंताचे समग्र साहित्य मानवतावादी तसेच परिवर्तनवादी आहे. त्यामुळे हे साहित्य नव्या पिढींमध्ये रूजले गेले पाहिजे यासाठी तेलंगणा स्टेट मधील शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समाविष्ट करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

    राष्ट्रसंत साहित्य स्वकाळाच्या पलीकडे जाऊन भावी काळाची जडणघडण करण्याची ऊर्जा देणारे आहे, असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले तर एड. यावले यांनी तेलंगण स्टेट मध्ये साहित्य संमेलनाचे उत्तम आयोजन केल्याबद्ल परिषदेचे कौतुक केले. डॉ. बाळ पदवाड, अनुप श्रीरामे यांनी राष्ट्रसंत साहित्यावर प्रकाश टाकला. स्वागताध्यक्ष प्रभाकर नवघरे यांनी सांगडी गावाचा इतिहास आणि डॉ. मोतीजी महाराजांचे योगदान याबाबत विचार मांडले. सूत्रसंचालन एड. राजेंद्र जेनेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन इंजि. विलास उगे यांनी मानले‌ . यावेळी उध्दव साबळे (नागपूर) यांच्या ग्रामगुज या ग्रंथाचे प्रकाशन तसेच केशवराव दशमुखे गुरूजी संपादित गडचिरोली पत्रिकाच्या संमेलन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

         त्यानंतर दुपारच्या पहिल्या सत्रात श्रीगुरुदेव सेवा मंडळातील माणिक माेती या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडाेपंत बाेढेकर होते. यावेळी गीताचार्य श्री तुकारामदादा यांचे सेवाकार्य आणि लेखन यावर प्रा.

डाॅ. श्रावण बानासुरे (बल्लारपूर) यांनी प्रकाश टाकला तर, आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलूरकर यांच्या साहित्य लेखन संबंधाने उद्धव साबळे (नागपूर) यांनी विचार मांडले , विठ्ठल डाखरे महाराज (वडगांव) यांनी डॉ . मोतीजी महाराज जीवन व कार्य संबंधित मनोगत व्यक्त केले तर श्रीकांत धाेटे (टाकळी) यांनी प्रा. रघुनाथ कडवे यांच्या राष्ट्रसंत साहित्य अनुषंगाने केलेल्या ११५ साहित्य ग्रंथ संबंधाने मौलिक विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. धर्मा गावंडे यांनी केले तर सुरेंद्र चोथले यांनी आभार मानले. सायंकाळच्या सामुदायिक प्रार्थनेवर ज्येष्ठ प्रचारक लटारू मत्ते गुरुजी (राजुरा ) यांचे चिंतन प्रस्तुत झाले.‌ सामुदायिक प्रार्थनेचे नियोजन श्रीकृपा श्रीगुरुदेव सेवा मंडळ राजुरा यांनी केले. संमेलनाध्यक्षाची मुलाखत प्रा. नामदेव मोरे यांनी घेतली तर प्रबोधन संध्या सत्रात सुधाकर चौधरी (गोदोंडा ) यांचे कीर्तन, चेतन ठाकरे व अनुराग मुळे (आरमोरी) यांचे भारूड, पालिकचंद बिसणे(सिंदीपार) यांचे बासरी वादन तसेच पुरूषोत्तम लांजेवार (कवडशी डाक) यांचे एकपात्री प्रयोग आदी कार्यक्रम संपन्न झाले. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनोहर पासपुते संजय वैद्य, सुखदेव चौथाले, डॉ .उदार , सुरेंद्र चोथले ,चंदू पाथोडे , संजय तीळसम्रृतकर, गणेश भेदोडकर, भूमा रेड्डी तसेच ग्रामस्थ सांगडीच्या आयोजन समितीने अथक परिश्रम घेतले. 

    राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे वतीने देण्यात येणारे विशेष पुरस्कार सुधाकर मानकर, केशव दशमुखे, पुरूषोत्तम लांजेवार, सुधाकर चौधरी, प्रेमेश्वर बारसागडे, मारोती साव, नामदेव पिज्दूरकर तसेच आदर्श विद्यार्थी सन्मान कु. मोक्शा सामावार,कु.तृप्ती मालेकर , सुरीदास अड्डीकवार,वेदन नवघरे यांना प्रदान करण्यात आला.

————

क्षणचित्रे:

१. राष्ट्रसंत साहित्य दिंडीत सांगडी – बेला परिसरातील मोठ्या प्रमाणात गुरुदेव भक्त मंडळी सहभागी झालेली होती.

२. मराठी भाषेच्या अभ्यासकांनी अनेक तेलगू शब्द आपल्या भाषणात वापरून संमेलनात रंगत आणली.

३. सांगडी लगतच्या उत्तर वाहिनी पैनगंगेच्या नदीच्या पात्रात अनेक प्रतिनिधींनी स्नानाचा आनंद घेतला.

४. राष्ट्रसंत साहित्य दिंडीत राष्ट्रसंताची ग्रामगीता, श्री तुकारामगाथा, विवेकानंद साहित्य, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, बायबल , कुराण आणि भारतीय संविधान ग्रंथ ठेवण्यात आले होते. 

५. संमेलनाची सुरूवात ग्राम सफाई व सामुदायिक ध्यानाने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here