


महाराष्ट्र राज्याच्या शासकीय आदेशानुसार राज्यभर दि.८ एप्रिल २०२५ ते दि.२५ एप्रिल २०२५ पर्यंत संकलित मूल्यमापन –२ PAT आयोजित करण्यात आलेली आहे. तसेही मार्च महिण्यात इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या परीक्षा घेतल्या जातात. इयत्ता १० वीचे पेपर्स तपासणीचे कार्य व त्यानंतर इयत्ता १ ली ते ९ वीचे पेपर्स घेतले जातात. त्यानंतर निकालपंजी, गुणपञके, पेपर्स तपासणीचे, संचयी नोंदपञके भरण्याचे कार्य सुरू असते. या कामालाही बराच कालावधी लागतो.
सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे मराठी शाळांना पटसंख्येचे निकष पाहता तेवढे विद्यार्थी प्रवेश आपल्या शाळेत घेण्यासाठी उन्हातान्हात खेडोपाडी दारोदार फिरावे लागते, त्यांच्या पालकांना निरनिराळी आमिषे दाखवावी लागतात. एखाद्या राजकीय उमेदवारासाखे गावोगाव, दारोदार भटकावे लागते. हे सर्वात मोठे ञासाचे तेवढेच गरजेचे काम करावे लागते नाहीतर पटसंख्येअभावी शिक्षक अतिरिक्त ठरतात व शिक्षकांना या गाववरून त्या गावी जावे लागते.
मी व माझी संघटना अनेकदा शिक्षण विभाग, शासनाकडे अशी मागणी करीत आहो की, इयत्ता १ ली ते १० वीच्या शाळा प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश पद्धती निर्माण करावी. मा.नागो गाणार सर हे शिक्षक आमदार असताना हा प्रश्न सभागृहात मांडला होता परंतू इतरांनी या प्रश्नावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यांनी शिक्षण विभागाशी या मागणीवर अनेकदा पञव्यवहार केलेला आहे. आज अनेक गावात इंग्रजी शाळा व काॅन्व्हेण्टची संख्या भरपूर प्रमाणात वाढल्यामुळे मराठी शाळांना विद्यार्थी मिळणे दुरापास्त झालेले आहे. इंग्रजी शाळांचे प्रवेश झाल्यानंतर शिल्लक असणार्या विद्यार्थी संख्येवर मराठी शाळांना केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार विद्यार्थी वाटप करावे व त्या संख्येवर त्या गावातील जे शिक्षक आहे ते निश्चित करावे. कुणालाही अतिरिक्त ठरवू नये.
शासनाने संपूर्ण महाराष्ट्रभर परीक्षेच्या एकच तारखा ठरविताना विदर्भाचा विचार केला नाही.विदर्भात मार्च महिण्यातच कडक उन्हाळा आहे.आताच तापमान खूप आहे.इयत्ता १० वीच्या परीक्षेनंतर खूपतर एप्रिलच्या १० तारखेपर्यंत शाळेच्या परीक्षा आटोपायला पाहिजे होत्या विद्यार्थ्यांचा विचारही व्हायला पाहिजे.परंतु त्या २५ एप्रिल पर्यंत रखडत नेणे योग्य वाटत नाही.त्यात असे ऎकिवात येते की,काही खाजगी संस्था व एनजीओ शासनाच्या असे निदर्शनास आणून देत आहे की, परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती लावण्यात येते व शालेय पोषण आहाराचेही पॆसे देण्यात येतात, हे सत्य आहे. परंतू अनेक वर्षांपासून परीक्षा आटोपल्यानंतर विद्यार्थी शाळेत येत नाही परंतू त्यांची उपस्थिती दाखविण्यात येते, तीही सञाच्या शेवटच्या दिवसापर्यंत परीक्षा संपल्यावर शिक्षक दररोज शाळेत येवून निकालाची कामे करतात. एरव्ही परीक्षेनंतर अध्यापनाचे कार्य नसतेच मूल्यमापनाचे काम असते त्यातही महत्त्वाचे ते काम कधी बाजूला ठेवून विद्यार्थी भरतीचे काम करावे लागते. संपूर्ण दिवसभर राञीलाही ही दोन्ही कामे सुरू असतात. विद्यार्थी उपस्थिती दर्शवून यात एक उपाय करता येतो त्यात तेवढ्या दिवसाचे धान्य वाटप करता येते. संकलित मूल्यमापन—२ च्या तारखा ठरविताना विदर्भातील तापमान,शिक्षकांच्या कामाचा बोझा इ. गोष्टींचा विचार करण्यात आलेला नाही.यावर फेरविचार करून बदल करण्यात यावा.
राजेंद्र मोहितकर, (प्रसिद्धी प्रमुख- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा)














