Home महाराष्ट्र आ.डॉ.गुट्टे : राज्यपाल अभिभाषणावर विधानसभेत मांडली भूमिका

आ.डॉ.गुट्टे : राज्यपाल अभिभाषणावर विधानसभेत मांडली भूमिका

380

 

अनिल साळवे, परभणी जिल्हा प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड :-राज्यातील सर्व समाज घटकांच्या विकासासाठी तत्पर असलेले आपले महायुती सरकार योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. गेल्या टर्ममध्ये घेतलेले निर्णय, योजना आणि प्रकल्प अद्यापही सुरू आहेत. त्यामुळे सर्व क्षेत्रे आणि समाज घटकांना याचा मोठा फायदा होत आहे. त्यातून सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी, युवक, युवती, खेळाडू यांच्यासह सर्व क्षेत्रातील नागरिकांची प्रगती होत आहे. तसेच भविष्यात सुध्दा महायुती सरकारकडून लोकहिताची भूमिका कायम जपली जाईल. सध्या राज्यात मोठी गुंतवणूक आली आहे. बेरोजगारांना रोजगार मिळत आहेत. शेतकरी बांधवांना चांगल्या सवलती आणि महिलांना विविध योजनांचे लाभ मिळत आहेत. लाखो नागरिकांना हक्काची घरे मिळत आहेत. त्यामुळे महायुतीच्या धोरणात्मक कारभारामुळे महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होत आहे, असे गौरोद्वार गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी काढले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने विधानसभेत राज्यपालाच्या अभिभाषणावर भूमिका मांडताना ते बोलत होते. समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन महायुती सरकार ठोस काम करीत आहे. त्यामुळे राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने महामहीम राज्यपाल यांनी सरकारची भूमिका आणि सद्यस्थिती मांडत असताना घेतलेला परामर्ष अगदी योग्य आणि वस्तुस्थितीला धरून आहे. त्यामुळे राज्य सरकारचे मनापासून अभिनंदन करतो आणि राज्यपाल यांच्या भाषणाशी सहमत दर्शवितो. राज्य शासन सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी व विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी काम करीत आहे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी म्हटले. तसेच
रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजांसह सहकार आणि कृषी क्षेत्रात शासनाने घेललेले निर्णय, योजना आणि धोरण याचा थोडक्यात आढावा घेतला. शिवाय, मतदारसंघातील विविध प्रश्न आणि अडचणी मांडून त्या दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशीही विनंती त्यांनी केली. राज्य सरकार सध्या चांगली कामगिरी करत असून भविष्यात सुद्धा धोरणात व सकारात्मक कामगिरी होईल, असेही विश्वास आ.डॉ.गुट्टे यांनी सांगितले.
माझ्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पालम येथे बस स्थानकास जागेसह मंजुरी मिळावी. पाण्याचे प्रश्न सोडवावेत. एमआयडीसीला जागा उपलब्ध करून द्यावी. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यावी. त्यांच्या अनुदानामध्ये वाढ करावी आणि वैद्यकीय क्षेत्रातील समस्या व अडचणी सोडवाव्यात. तसेच दावोस येथे झालेले गुंतवणूक करार, रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यांना बाजारपेठ नसल्यामुळे येत असलेल्या समस्या, शक्तीपीठ महामार्गाचे महत्त्व, राज्यात झालेली इलेक्ट्रिकल बसेची खरेदी, दळणवळणाला मिळालेली चालना, मागेल त्याला सौर पंप योजनेचे महत्त्व आणि फायदे, साखर कारखान्यात तयार होत असलेल्या प्रेसमड आणि पेन्टवॉज याचा शेतीला होणारा फायदा, त्यातून वाढणारे शेती उत्पादन, पाण्याच्या समस्या वर उपाय योजना, शेतकऱ्यांना विविध योजनांची लाभ वेळेवर मिळावेत, पीकविमा कर्ज त्वरीत उपलब्ध व्हावे, असे विविध मुद्दे आ.डॉ.गुट्टे यांनी मांडले. तसेच जालना जिल्ह्यातील कैलास बोराडे नामक युवकाला झालेल्या अमानुष मारहाणीचा जाहीर निषेध करून या घटनेतील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. सोबतच या अमानवी घटनेचा योग्य तो तपास करण्यासाठी एक निःपक्षपाती चौकशी समिती नेमावी, अशीही मागणी आ.डॉ.गुट्टे यांनी राज्य शासनाकडे केली.
आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, राज्यशासन कृषी क्षेत्रातील संधीचा विस्तार करून शेतकरी हितास प्राधान्य देणारे निर्णय घेत आहे. राज्यामध्ये सौरऊर्जा पंपांद्वारे शेतीकरिता पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याकरिता मागेल त्याला सौर पंप योजना या अंतर्गत ३ लाख १२ हजार सौरपंप बसवले गेले आहेत. या योजनेतंर्गत पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांना १० लाख सौर पंप पुरविण्यात येतील. प्रधानमंत्री-कुसुम व मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या अंतर्गत राज्यातील सर्व कृषी वाहिन्या सौरऊर्जाकृत करणारे देशातील पहिले राज्य बनण्याचे लक्ष्य महाराष्ट्राने ठेवले आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या अंतर्गत राज्यातील ९५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची लाभार्थी म्हणून निवड केली असून ८७ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना बँकांद्वारे किसान क्रेडिट कार्ड सुविधा पुरविण्यात आली आहे. शिवाय राज्याच्या कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे जलद व प्रभावी वितरण सुलभ होण्यासाठी ॲग्रीस्टॅक कृषी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा या नावाची एक नवीन योजना सुरु केली आहे. शाश्वत ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी व कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी इथेनॉलचा पर्यायी इंधन म्हणून वापर करण्यावर भर देऊन, इथेनॉलचे उत्पादन व पुरवठ्याला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात १० वर्षे सेवा केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांना, आरोग्य सेवेतील मान्यताप्राप्त समकक्ष पदांवर सामावून घेण्यात येईल. केमोथेरपी व रेडिओथेरपी केंद्रांमध्ये, कर्करोग रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्करोगशास्त्रातील कुशल परिचारिकांच्या उपलब्धतेसाठी पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑन्कॉलॉजी नर्सिंग हा पाठ्यक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांकरिता रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी अंगणवाडी सेविकांची सुमारे १८ हजार रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. महिलांचे कौटुंबिक उत्पन्न वाढविण्यासाठी लखपती दीदी उपक्रम राबवित आहे. तसेच राज्यातील विविध समाजाच्या उन्नतीसाठी १८ महामंडळे स्थापन केली आहेत. त्यासाठी प्रत्येक महामंडळाला ५० कोटी रूपये इतके भाग भांडवल मंजूर करण्यात आले आहे. अनुसूचित जमातींच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा, या उद्देशाने अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांकरिता शिकवणी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशा विविध धोरणामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण करेल, असाही विश्वास आ.डॉ.गुट्टे यांनी आवर्जून व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here