Home महाराष्ट्र राजकीय नेत्यांना वाकून नमन करणे म्हणजे गुलामगिरी?

राजकीय नेत्यांना वाकून नमन करणे म्हणजे गुलामगिरी?

200

भारत इंग्रजांचा गुलाम होता. हे माझ्या गावातील लोकांना माहिती नव्हते. जे माझ्या आजोबांच्या समकालीन होते. माझी बायको, माझी पोरं, माझी शेती, माझा बांध यातच ते व्यस्त होते. उरला सुरला वेळ तो दुष्काळ आणि आजार.

     आम्ही गुलाम आहोत, ही जाणीव ज्यांना त्यावेळी झाली ते लढले, इंग्रजांच्या विरोधात. टिळक, गांधीजी, नेहरू, नेताजी याची सुद्धा माहिती माझ्या गावात नव्हती. मी विचारले तर म्हणे, कोणीतरी सांगितले कि गांधीजींना मारले.

    आज सुद्धा याहून वेगळी अवस्था नाही. पन्नास वर्षांनंतर मुलांना, नातवांना शाळेतून कळले तर ते गुमान झेंडा वंदन ला जाऊन येतात.

    शेतकरी,कामगार, मजूर, महिला, नोकर अजूनही आपल्याच पोटापाण्याच्या नादात आहेत‌. मला भाव वाढवून पाहिजे. मला रोजगार मिळाला पाहिजे. मला अनुदान पाहिजे. मला पगार वाढवून पाहिजे. मला आरक्षण पाहिजे. मला फुकट पाहिजे. किमान शंभर कोटी लोक तरी या मागणीच्या आंदोलनाला स्वातंत्र्य समजतात. नवरा बायको, मुले-बाळे आणि पोटापाण्याच्या पलिकडे विचार करीतच नाही. उलट मी गरीब आहे. मी कर्जबाजारी आहे. मी विधवा आहे. मी परित्यक्ता आहे. मी अपंग आहे. मी मागास आहे. मी दलित आहे. मी वंचित आहे. असे सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू आहे.

               इंग्रजांच्या काळात आम्हाला अधिकार नव्हते. हे तेंव्हा कळले नाही. ते कळले पन्नास वर्षानंतर. आज तर मताचा अधिकार तरी का आहे? हेच कळत नाही. कोणीही येतो दारूवाला, टपरी वाला, रेतीवाला, पिस्तूल वाला, डान्सबार वाला. हजार पांचशे हातावर ठेवतो आणि मत घेऊन जातो. अजूनही कळत नाही कि याने मला पैसे का दिले? अशी माणसे फक्त साक्षर झाली, शिक्षित नाही. शहरातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्रोफेसर, व्यापारी, उद्योजक सुद्धा अक्षरांचे आणि आकड्यांचे चित्र काढणे शिकले. अक्षर आणि आकड्यांचा अर्थच कळला नाही. गाणे छान म्हटले पण गाण्यातील भाव कळलाच नाही. म्हणून तर एक दारूवाला, टपरीवाला, रेतीवाला, डान्सबार वाला, पिस्तूल वाला नगरसेवक, आमदार, खासदार निवडून दिला जातो. अजूनही या डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्रोफेसर, व्यापारी, उद्योजक यांना जाणिव होत नाही कि, माझा नेता माझ्यापेक्षा जास्त अशिक्षित. तो कलंदर आणि मी बिलंदर. तो मालक आणि मी गुलाम. असा बिलंदर व्यासपीठावर आणि बिलंदर जमीनीवर. त्याला वाकून नमन करतो, वंदन करतो. ही सुद्धा गुलामगिरी आहे. हेच त्या साक्षर माणसाला जाणवत नाही. कोणी बनवला याला मालक? आम्हीच. आम्ही पैसा घेऊन माझा अधिकार याला विकला. कसली चिंता नाही. हे चूक कि बरोबर? निरक्षर आणि साक्षर दोघांना.अजूनही गुलाम आहेत.

      आम्ही ऐंशी करोड लोकांना मोफत धान्य देतो. प्रयाग ला चाळीस कोटी लोक डुबकी मारतील. अशी शेखी मिरवणारे आहेत तरी कोण? हे आहेत टोपी विकणारे. एक टोपी विकणारा टोपी घालतो म्हणून माकडांनी टोपी घातली. ती त्याने काढून फेकली म्हणून माकडांनी काढून फेकली. यात आम्ही कोणत्या श्रेणीत आहोत हे माकडांना कळलेच नाही. एक नेता येतो. प्रयागला गंगेत डुबकी मारतो. ते टिव्ही वर दाखवले जाते. ते पाहून अनेक बाया माणसे प्रयागकडे प्रयाण करतात. डुबकी मारण्यासाठी. टोपी विकणारा आणि डुबकी वाला यात फरक आहे का? ती माकडे आणि आमच्यात फरक आहे का? हा फरक कळायला अजून पन्नास वर्षे लागतील. तो पर्यंत तो टोपी विकणारा, तो डुबकी मारणारा नवीन क्लृप्ती शोधून काढील. माकडांना आपल्या कलेने नाचवण्यासाठी.

    मी हे कोडे उलगडून दाखवले तर मला विचारणा केली कि, तुम्ही हिंदू धर्माच्या विरोधात लिहीतात. अज्ञानात धर्म असतो, अशी त्यांची संकल्पना.

      आम्ही अजूनही महापुरूषांच्या पुतळ्याच्या सावलीत बसून नोकरीचे आरक्षण मागत आहोत. पारतंत्र्य कळायला पन्नास वर्षे लागलीत. स्वराज्य कळायला आणखी पन्नास वर्षे लागतील. कारण आज रोजी आमचे नेते खोके घेऊन सांडलेले दूध दही चाटणारे बोके बनलेले आहेत. ते सत्तेचे गुलाम आहेत. आणि आम्ही त्या गुलामांचे गुलाम.

      सत्तर वर्षापुर्वी परदेशी सत्तेचे गुलाम होते. आज स्वदेशी सत्तेचे गुलाम आहोत. याची जाणिव होईल तेंव्हा नेणिवा सुरू होतील.

   

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here