


चंद्रपूर (प्रतिनिधी)-
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात महिला सक्षमीकरण आणि लघुउद्योग या महिलांच्या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रभाताई वासाडे होत्या. तर सिने अभिनेत्री सायली देठे, गडचिरोली येथील लघुउद्योजिका प्रमिला अलोणे, संस्थेचे प्राचार्य आर. बी. वानखेडे, कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर, गटनिदेशक सौ. जे.व्हि.निमसरकार , रासेयो स्वयंसेवक प्रमुख एलिना गायकवाड आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर यांनी करून महिला सक्षमीकरण संबंधाने विचार व्यक्त केले. अलिकडे वेशभूषा, फिल्म एक्टींग, नाट्य या सारखे क्षेत्र महिला वर्गांना आकर्षित करते आहे.तेव्हा सकारात्मक विचार करत या क्षेत्रात परिश्रम घेतल्यास कलेच्या क्षेत्रात यशस्वी होता येते , असे प्रतिपादन अभिनेत्री सायली देठे यांनी केले. तर प्रमिला अलोणे यांनी टेलरिंग व्यवसाय ते कापड गारमेंट विक्री दुकान असा संघर्षमय प्रवास कथन करत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ . प्रभाताई वासाडे म्हणाल्या की, आर्थिक स्वातंत्र्य व सामर्थ्य हे महिलांच्या सक्षमीकरणातून प्राप्त होत असते. आर्थिक वाढीच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग महत्त्वाचा असतो. त्यामुळे त्यांच्या भूमिकेचीही दखल घेतली गेली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. सूत्रसंचालन निदेशक सौ. ढेंगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन निदेशक सौ. सुमती गराड यांनी मानले .
सकाळच्या सत्रात वाहतूक सुरक्षितता आणि युवकांची जबाबदारी या विषयावर वाहतूक विभागाचे एपीआय श्री. सोनोणे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थांना वाहतुकीचे नियम , गावात घडलेले भयंकर अपघात , झालेली मनुष्यहानी या संदर्भात विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितले.
शिबिराचा दरम्यान रोज सकाळच्या सत्रात संस्था परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले तर दुपारनंतर मेंटेनन्स अभियान राबविण्यात आले. सर्वच समितींनी उत्साहात दिलेल्या कार्यात सहभाग नोंदविला.













