


कराड: (दि.30, प्रतिनिधी) “महिलांनी आपल्या व्यक्तिगत आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. स्त्रियांनी सकस आहार, व्यायाम, व्यक्तिगत स्वच्छता याकडेही लक्ष द्यावे. वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रियांनी शारीरिक व मानसिक आरोग्यही निरोगी ठेवावे. आपली भारतीय आहार पद्धती ही जगात सर्वश्रेष्ठ पद्धती आहे.”, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे मा. डॉ. स्नेहा शेजवळ (वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड) यांनी केले. त्या मौजे किवळ येथे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या वरिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजेनेच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिरात” महिलांचे आरोग्य या विषयावर बोलत होत्या.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रामचंद्र पांडुरंग साळुंखे (संचालक, शिवाजी शिक्षण संस्था) म्हणाले की, “राष्ट्रीय सेवा योजनेतून श्रमाचे संस्कार होतात. सर्वांनी श्रमाबरोबर आपले आरोग्यही तंदरुस्त ठेवावे. नियमित व्यायाम करावा. आणि आपले ध्येय पूर्ण करावे. ”
सदर कार्यक्रमास मा. श्रीमती संगिता साळुंखे (माई) (सदस्य, केंद्रीय दिशा समिती), सौ. उर्मिला साळुंखे, सौ. सुनीता साळुंखे, सौ. भारती साळुंखे, सौ. सुनीता अधिक साळुंखे, सौ. अनुजा साळुंखे, सौ. अनिता मोहिते, सौ. सुवर्णा गुरव, सौ. राजश्री फणसे, सौ. भारती कारंडे, सौ. सुनिता काशीद इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी एन.एस.एस. गीत सादर केले. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. बोंगाळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. प्रज्ञा हेगडे हिने करून दिला. तर सर्व मान्यवरांचे आभार कु. स्वाती तुपारे हिने मानले. सूत्रसंचालन कु. वैष्णवी तवर हिने केले. या समारंभास मौजे किवळ येथील सरपंच मा. श्री. प्रदीप काशीद, उपसरपंच मा. कैलास साळुंखे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, तसेच वेणूताई चव्हाण कॉलेजचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एन. ए. पाटील, प्रा. श्रीमती एस. सी. भस्मे, प्रा. श्रीमती ए. एम. मुजावर, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.














