


✒️विशेष प्रतिनिधी(अत्तदिप धुळे)मो:-9511953580
गेवराई(दि. जानेवारी):-आजच्या गतीशील आणि तणावपूर्ण जगात तरुणाईला योग्य दिशा आणि प्रेरणा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई या छोट्याश्या गावात एक आगळं वेगळ बालकांचं गाव म्हणजे बालग्राम येथे दरवर्षी प्रमाणे संतोष दादा गर्जे व प्रीती ताई गर्जे अशा या १३० अनाथांच्या मायबापाने आयोजित केलेल्या ‘भान तरुणाई’ शिबिराने युवकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न केला. शिबिरात तरुणांना त्यांच्या आयुष्यातील उद्दिष्टे ठरवण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रेरणादायी सत्रे आयोजित केली गेली. त्यामधे अनिकेत लोहिया, ममताताई सकपाळ, गौरीताई देशपांडे, अविनाश दादा भारती अशा प्रमुख व्यक्तींनी युवकांना मार्गदर्शन केले.
तरुणाई ही समाजाची भविष्यवाणी असते, आणि तिच्या मनोधारणा, विचारधारा व कार्यशैलीला आकार देणे अत्यंत आवश्यक आहे. युवकांच्या मनातील द्वेष, मत्सर, मोह, माया, श्रीमंत-गरीब, जात, धर्म, अहंकार बाजूला सारत एकमेकांच्या प्रति आदर, विश्वास संपादन होण्यासाठी शिबिरात विविध क्षेत्रातील तज्ञ व मार्गदर्शकांची उपस्थिती होती, ज्यांनी त्यांच्या अनुभवातून युवकांना जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी आणि समाजातील सकारात्मक बदल घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा समावेश केला. यामध्ये शारीरिक व मानसिक विकास, नेतृत्व क्षमता, आणि सामाजिक जबाबदारी यांवर सखोल विचार मांडण्यात आले. मनमोकळा संवाद साधून युवकांच्या भानवा जाणून घेण्यात आल्या.
त्याचप्रमाणे, शिबिराच्या कार्यशाळांमध्ये व्यक्तिगत स्वावलंबन, संवाद कौशल्य आणि संघटनात्मक कार्याची महत्त्वता यावर जोर देण्यात आला. युवकांनी त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणा आणि मार्गदर्शन प्राप्त केले. हे शिबिर फक्त ज्ञान मिळवण्याचे ठिकाण नव्हते, तर एक वेगळी ऊर्जा, एक सकारात्मक दृषटिकोन देणारे, जीवनाला कलाटणी देणारे ठिकाण ठरले.
आजच्या तरुण पिढीसमोर अनेक आव्हाने असताना, असे शिबिर त्यांच्या जीवनाला एक दिशा देऊन त्यांना सक्षम बनवते. भान तरुणाईचे शिबिर हे एक आदर्श ठरले आहे, जे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येक युवकाला प्रोत्साहित करतो. त्यामधून सहभागी झालेल्या प्रत्येक युवकाच्या मनात आत्मविश्वास व आत्मनिर्भरतेची भावना जागृत झाली असून, त्यांचे भविष्य अधिक उज्जवल बनवण्याच्या मार्गावर एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.
आशा आहे की, भविष्यात असे शिबिर अधिकाधिक संख्येने आयोजित केली जातील आणि युवकांसाठी त्यांचा जीवनप्रवास अधिक समृद्ध, प्रेरणादायी आणि यशस्वी ठरेल.














