


✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
नागपूर(दि.२०जानेवारी):-नवउन्मेषण साहित्य सभा व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, दक्षिण नागपूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१९ जानेवारी रोजी समाजातील विधवा, वंचित व उपेक्षीत महिलांना सर्वसामान्य महिलांसमवेत संक्रांती निमित्त समसन्मानाने वाणाचे वाटप करून सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम दत्तात्रय नगर येथील सुधाताई बामनपल्लीवार यांच्या घरी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून म.अंनिसचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार व रजनी ग. सुरकार खास वर्धा येथून आले होते. यावेळी सामाजिक व परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय कार्यकर्ते विजय बाभूळकर सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्त्री उद्धारासाठी झटणारे सत्यशोधक म.जोतिबा फुले, सावित्रीमाई फुले व प्रबोधनकारी सत्यशोधक व अंधश्रध्दा निर्मूलनाचे चालते बोलते प्रचारक संत गाडगेबाबा यांच्या फोटोला सर्वांनी पुष्प अर्पण केले.
प्रास्ताविक नवउन्मेषण साहित्य सभेच्या अध्यक्षा सुधाताई बामनपल्लीवार यांनी केले. विधवा स्त्रियांना माणूस म्हणून वागणूक मिळावी म्हणून केशवपन बंद करण्यासाठी न्हाव्यांचा संप, पीडितांसाठी सुतिकागृह, बालहत्या प्रतिबंधक गृह, विधवा पुनर्विवाह इ.फुले दांपत्याचे ऐतिहासिक कार्य आणि मकरसंक्रांतीच्या कार्यक्रमात विधवांना इतर स्त्रियांप्रमाणे सन्मान मिळावा अशा प्रकारे कार्यक्रमाची भुमिका म.अंनिस, दक्षिण नागपूर शाखेच्या कार्याध्यक्ष आशू सक्सेना यांनी भुमिका मांडून विधवा, वंचित व उपेक्षीत महिलांच्या समसन्मानाची संक्लपना स्पष्ट केली. यानंतर प्रा. अंकिता हुलके यांनी सर्व उपस्थित महिलांना वाणाची भेटवस्तू देऊन व हळद कुंकू लावून आनंदाने सन्मानित केले. यानंतर उपस्थित प्रत्येक महिलांनी चिठ्ठीव्दारे काढलेल्या विषयावर मांडणी करून आपल्या भावना व्यक्त करीत मनमोकळे केले. कार्यक्रमाचा शेवट गजेंद्र सुरकार, विजय बाभूळकर व बाबा बीडकर यांच्या संबोधनाने झाला. आभार अनुज हुलके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी म.अंनिस चे नागपूर जिल्हा प्रधान सचिव विनोद उलीपवार, दत्तात्रय नगर शाखेचे कार्याध्यक्ष दिवाकर शिर्के, लता ढोक व विश्वास पिट्टुलवार यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात आठ विधवा महिला, पाच वंचित व उपेक्षीत महिलांसह सर्वसामान्य महिला या मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या व त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमात सुशीला साकोरे,सरला मुप्पीडवार,सुनिता गड्डमवार, आशा शिर्के, विणा उलीपवार, कु. मानसी उलीपवार,रंजना बीडकर,शीतल जाधव,उमा पाल,रूपा शाहू,सुमन चिचमलकर,लक्ष्मी लांजेवार,अल्का वांढरे,रंजना कोल्हे व लक्ष्मी चौबे तसेच अशोक पाटील हे सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना म.अंनिसची सन २०२५ ची दिनदर्शिका भेट म्हणून देण्यात आली.














