Home महाराष्ट्र प्रसारमाध्यमे : ब्राम्हणी व्यवस्थेचे बटिक

प्रसारमाध्यमे : ब्राम्हणी व्यवस्थेचे बटिक

131

बोलणाऱ्यांची मातीही खपते, परंतु न बोलणाऱ्यांचे मोतीही खपत नाही. ही अतिशय गहन अर्थपूर्ण म्हण बरंच काही सांगून जाते. बोलून अर्थात, प्रचार प्रसार करून कुठलीही गोष्ट लोकांच्या मनावर ठसविता येते आणि लोकांना फसवता येते. याबाबतीत देशविदेशातील अनेक ऐतिहासिक गोष्टी आपल्या नजरेस येऊ शकतात. अलिकडच्या ईलेक्ट्रॉनिक मीडियावर येणाऱ्या अनेक उत्पादनांच्या जाहिराती आणि त्या ऐवजांची सुमार गुणवत्ता यावरून सामान्य माणसाला देखील फसवणूक लक्षात येऊ लागली आहे. आणि भांडवली मीडियाचे पैशापासरी चरित्र उमजून येत आहे.

प्रसारमाध्यमे जनमानस घडवणारे अतिशय महत्त्वाचे आणि कमालीचे प्रभावी साधन असल्यामुळे आधुनिक समाजाच्या जडणघडणीत प्रसारमाध्यमांची भूमिका फार महत्त्वपूर्ण समजली जाते.आधुनिक इतिहासातील एक महत्वाचे साधन म्हणजे पत्रकारिता होय. लोकशाहीचे चार स्तंभ.चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. पण एवढे महत्त्वाचे साधन असलेल्या मीडियाचे चरित्र आज वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. उत्पादनांच्या जाहिरातीपासून तर राजकारण, निवडणुका, धर्मप्रसार आणि सांस्कृतिक घडामोडी पर्यंत उच्च जातवर्चस्ववादी मीडिया तटस्थपणे वागू शकत नाहीच उलट वर्णजातवर्गीय व्यवस्थेचा प्रमुख आधारस्तंभ बनला आहे. असा ठपका मीडियावर बसलेला आहे.

या देशात हजारो वर्षे मूठभर उच्च जात समूहाचे वर्चस्व जनमानस घडवणऱ्या साधनांवर कायम टिकून राहिलेले आहे. स्त्रीशूद्रातिशूद्र अज्ञानात चाचपडत ठेवले गेले. ब्राम्हणी धर्मग्रंथाच्या आडपडद्यात विद्येची दारे बंद करून ठेवली आणि चातुर्वर्ण्य रचनेत शीर्षस्थानी बसलेल्यांनी मतलबी धर्म स्त्रीशूद्रातिशूद्र जनांच्या बोकांडी बसवून अमानुष विचारांचा हजारो वर्षे प्रचार प्रसार केला. चातुर्वर्ण्य म्हणजे धर्म आणि त्या उतरंडीतच जातीबंधनं पालन करणे हाच धर्म. त्यांनीच रचलेले पाखंडी धर्मग्रंथ,ग्रंथातील चमत्कार,पावित्र्य, भूदेवांचे श्रेष्ठत्व, जातिव्यवस्था पक्के करणारी धर्मसूत्रे अहोरात्र सांगत राहिले.

भेदाभेद-विषमतेचे विष पेरणारी ही वैदिक वाङ्मयीन कृती अपौरुषेय आहे आणि म्हणून वेदांची चिकित्सा केली जाऊ शकत नाही. वर्षोंवर्ष हे एरंडाचे गुऱ्हाळ सिंधुजनांच्या पुढ्यात वाढून हा जनसमुदाय मूढमती ठेवण्याची शक्कल योजत आले. याचे प्रचारक कोण? हा पण पारंपरिक पाखंडी मीडियाच ना! धर्मप्रचार, वर्ण जातबंधनं घट्ट करणारा मीडिया कोणाच्या ताब्यात? शिक्षणबंदी लादलेले स्त्रीशुद्रातिशुद्र या प्रसारप्रचार यंत्रणेत चुकूनही कुठेही दिसणार नाही ही तजवीज कटाक्षाने केलेली.

देव कोण आणि राक्षस कोण? भले कोण आणि वाईट कोण? धर्मसूत्रांनी ठरवलेला हे सांगण्याचा आणि ते समाजावर बिंबवण्याचा त्यांचाच कार्यभाग. वैदिकांशी लढणारे राक्षस, दानव, दैत्य, अक्राळविक्राळ, कुरुप हिडीस, खलनायक.अवैदिक परंपरेतील लोकप्रिय नायक महामानव उत्तुंग व्यक्तिमत्त्व लेखणीच्या बळावर अगदी चारित्र्यहनन करुन खलनायक म्हणून उभे करुन संभ्रम निर्माण करणे किंवा त्यांचेही वैदिकिकरण ब्राम्हणीकरण करुन त्यांची अवैदिक परंपरेपासून नाळ तोडून टाकणे. असे अनेकानेक नारदी मीडियाचे कारनामे सिंधुजनांच्या जिव्हारी लागणारे आहेत.

प्राचीन काळापासून चालत आलेली उच्च जातीय वर्चस्ववादी मीडियाची ही सद्दी संपत तर नाहीच, आधुनिक प्रसारमाध्यमेदेखील अगदी सावध पणाने त्यांच्या ताब्यात ठेवून त्यांना हवा तसा ते वापर करु शकतात. ओबीसीचा मंडल लढ्याचा देशभर भडका उडालेला असताना तो दाबून टाकण्यासाठी मंडल विरोधी वातावरण याच ब्राम्हणी मिडियाने तापवून ओबीसी समाजाला भ्रमित करण्यात आले. तत्कालीन प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग यांनी मंडलची घोषणा केल्याबरोबर त्यांच्यावर आगपाखड करण्यात हा ब्राम्हणी मीडिया अहोरात्र झटत होता.सरकारला बदनाम करून त्यानंतरच्या आरक्षणविरोधी घटनांचा केवढा मोठा गवगवा प्रसारमाध्यमांनी केला.ओबीसींकरीता आरक्षण लागू केल्याने जणू देशावर संकटच आले अशाप्रकारे चित्र उभे केले गेले. तर मंडल अर्थात ओबीसी आरक्षणावरुन अवधान विचलित करण्यासाठी निघालेल्या रामरथयात्रेला भरभरून प्रसिद्धी देण्यात आली. आणि ओबीसी लढा निर्णायक भूमिकेत येऊ नये यासाठी बाबरी विध्वंस, बॉंबस्फोटाची मालिका, धार्मिक जातीय दंगे ओबीसींच्या आरक्षणाच्या प्रश्नापेक्षा अवाढव्य मोठे करुन दाखवण्याची किमया दलाल मीडियाने साधली.

घराघरात दूरदर्शन संच स्थिर होऊ लागताच रामायण, महाभारत आणि यांसारख्या अन्य धार्मिक मालिकाही प्रसारित करण्यात कुचराई केली नाहीच. विज्ञानाच्या आविष्कारातून तयार झालेले टेलिव्हिजन धर्म, कर्मकांड, कुंडली, चमत्कारिक गोष्टीचे प्रचारक बनले. आणि धार्मिक उन्माद वाढीस घालणाऱ्या नव्या अध्यायाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. क्रिकेटच्या सामन्यांचे प्रसारणासाठी खास वेळ राखून ठेवण्यात आलेली असत. निवडणुका आल्या की जसं हिंदुत्व धोक्यात येते,रातोरात धर्म खतरेमें येण्याची कंडी पिकू लागते, अचानक पुलवामा प्रकरण उद्भवते, दारिद्र्यात पिचत पडलेल्या बहिणी लाडक्या होऊ लागतात. शेतात सालभर खपाट पोटाने खपून शेतकरी पिक काढतो, बाजारात मातीमोल दराने सोयाबीन कापूस धान आदी शेतमाल विकावा लागतो, तो शेतकरीही ऐनवेळी ‘किसान सम्मान निधी योजने’त फिट्ट बसतो आणि दारुच्या व्यसनामुळे शेतकरी आत्महत्या घडतात असा जावईशोध पत्रकारितेला लागलेला असतो. हिंदुत्व धोक्यात आलेले असल्यामुळे स्त्रियांवरील बलात्काराच्या घटना, तरुणांवरील बेरोजगारीची टांगती तलवार, ओबीसी मराठा मागासवर्गीय आरक्षणाचे प्रश्न कस्पटासमान होऊन जातात.
आणि अशाच पारंपारिक मानस घडवण्याचा विडा उचललेला मीडिया आरक्षणविरोधीतत्व रोमारोमात भरलेल्यांशी खुलेआम उठबस करणारा ‘बुवा’ ‘भाऊ’ बनून ओबीसीचं भलं करणारा आहे असा दवंडी पिटत असतो, तर अच्छे दिन आणणारा नॉनबायलॉजिकल ‘अवतारी पुरुष’ चमत्कारिक वाटून जणू त्याची लाट तयार झाल्याची बित्तंबातमी कव्हर करण्याचे जिगरबाज काम गोदी मीडिया करत असतात.

अर्थात, मीडिया म्हणजे निर्जीव अशी तंत्रसाधने नव्हेत, तर जितीजागती जातवर्गीय हितसंबंध पुष्ट करणारी मोजक्या माणसांची ही जमात. जनमानस पोखरून टाकणारी टोळधाड! केवढी मोठी बलवत्तर ही मीडियाची सत्ता. पण या मीडियावर कुणाची मांड आहे? वृत्तपत्र संपादक इलेक्ट्रॉनिक मीडिया आदी ठिकाणी किती ओबीसी दलित आदिवासी आहेत? हा प्रश्न या देशाच्या केद्रीय सत्तेतील विरोधी पक्षनेते सार्वजनिक ठिकाणी उपस्थित करतात आणि जातीजनगणना करण्यासाठी आग्रही असतात. आणि ओबीसी दलित आदिवासी मागास यांच्यापैकी मीडियावर नसतील मर मिडीयामध्ये चलती असलेले यांची बाजू मांडणार कशी? कोण? यांना न्याय कसा मिळेल?

अपवाद वगळता सामाजिक न्यायाच्या बाजूने उभे राहत नाही म्हणून प्रस्थापित मीडियावर क्रुद्ध असलेला जनसमुदाय मीडियावर विश्वास ठेवू इच्छित नाही. बाजारु मीडिया,पाखंडी मीडिया, नारदी मीडिया, दलाल मीडिया, भांडवली मीडिया,गोदीमीडिया,पीतपत्रकारिता म्हणून बोळवण करत असतात. मूठभर बड्या हस्तींचे, उच्चजातीय हितसंबंधाचे लांगुलचालन करुन कष्टकरी समाजाला मातीत घालणारा मीडिया म्हणून मीडियाचा पानउतारा होत असते. भाटगिरी करणे, सत्ताधीन असणे, चाटुगिरी करणे, चापलूसी करणे ही अंगभूत वैशिष्ट्ये असलेल्या या मीडिया चे चालक मालक वाहक उच्च जातवर्गीय.गोबेल्स तंत्रावर आधारित एकच झूठ तपशील वारंवार सांगितले की तेच खरं वाटायला लागते. हेच तंत्र जाहिरातीत वापरून ग्राहकांना मतीगुंग बनवले जाते.धर्म, अर्थ, राजकारण, सत्ता याबाबतच्या मतलबी प्रचारामुळे सामान्य भलामाणूस यात भरडला जातो नाडला जातो नागवला जातो.भलेभले सूज्ञ उच्चशिक्षितही समाजी यात फसतात समाजव्यवस्था समजून न घेतल्याने, अशा खतरनाक मीडियाचा बीमोड कसा करायचा हा सवाल डीजीटल समाजाला अधिकच अंतर्मुख करणारा ठरावा.तरच भलामाणूस ताठपणे उभा होईल!

✒️अनुज हुलके(मो:-9823883541)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here