Home लेख शिक्षण क्षेत्र आणि शोषित समाज

शिक्षण क्षेत्र आणि शोषित समाज

221

 

 

 

 

 

“आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो .तितकेच महत्त्व शिक्षणाचा प्रसाराला दिले पाहिजे. शिक्षणाशिवाय आपल्याला मा-याच्या जागा काबीज करता येणार नाही. तोपर्यंत खरी खुरी सत्ता आपल्या हाती आली असे म्हणता येणार नाही.”- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. या अविरत चालणाऱ्या प्रक्रियेतूनच माणसाने प्रगती केली आहे. आज शिक्षण ही आपली चौथी मूलभूत गरज बनली आहे. शिक्षणाशिवाय जगणे म्हणजे अज्ञानाच्या अंधकारात जगणे होय. जोपर्यंत आपण शिक्षणाचा अर्थ समजून घेऊ शकत नाही. तोपर्यंत शिक्षणाचा खरा अर्थ समजून येत नाही.

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे .त्याचप्रमाणे शिक्षण हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे. याचा योग्य उपयोग झाला पाहिजे असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते. अथांगत ज्ञानाचा महामेरू बनून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा खरा अर्थ समजून घेतला व जगात ज्ञानाचे विविध क्षेत्र पादाक्रांत केले. पण त्यांना ज्या परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागले ते अत्यंत संघर्षात्मक होते. या संघर्षातूनच त्यांनी नव्या शिक्षणाची ओळख झाली. पण हा संघर्ष त्यांना का करावे लागला? कारण त्या वेळची भारतीय समाज व्यवस्था अत्यंत रुढीजन्य व मनू व्यवस्थेने ग्रासली होती. शूद्र समाजाला व स्त्री वर्गाला शिक्षणाचा अधिकारच नाकारला होता म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकराला वर्गाच्या बाहेर राहून शिक्षण घ्यावे लागले. ब्राह्मणांनी बहुजन समाजाला सत्य कधी सांगितलेच नाही. त्याला धर्माची व देवाची भीती सांगून विद्येपासून वंचित ठेवून. अज्ञानी व अंधश्रद्धा बनवले. या वर्गाने मोठ्या धूर्तपणे धर्मापेक्षा मोठे घोटाळे निर्माण केल्याने अन्य समाज सर्व दृष्ट्या मागास राहिला आणि ते सर्वार्थाने आंधळे बनले. हे गंभीर परिणाम शिक्षण क्षेत्रामध्ये असल्याकारणामुळे भारतीय समाजाला अंधकाराच्या खाईत लोटलेले गेले .

भारत देशात सम्राट अशोकाच्या काळात ज्ञानाचा अखंड प्रवाह वाहत होता .अनेक देशातील विद्यार्थी तक्षशिला, नालंदा या विद्यापीठात येऊन ज्ञान संपादन करत होते. नव्या ज्ञानाच्या विविध शाखा नालंदा विद्यापीठात सुरू झाल्या होत्या. पण ब्राह्मणशाहीच्या प्रस्थापनेसाठी वैदिक व्यवस्थेने शुद्र आणि स्त्री वर्गाला ज्ञानाची कवाडे बंद करण्यात आली. धर्मग्रंथाच्या अमानवीय नियमाने बहुजनांना पदोपदी छळले. त्यांचे मानवीय हक्क नाकारले .पण अठराव्या शतकातील ब्रिटिश साम्राज्याच्या शिक्षण विषयक तरतुदीनी समाजात नवे चैतन्य निर्माण केले. भारतीय स्वातंत्र्यातील चाललेल्या चळवळीतून शिक्षणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचले. त्यानंतर भारतीय संविधानाने शिक्षणाला मूलभूत हक्कात स्थान दिले.

२६ जानेवारी १९५० पासून भारतीय समाजाला नव्या शिक्षण व्यवस्थेची ओळख झाली. शोषित समाजातील शिक्षणाचे प्रमाण आज अत्यंत अल्प झालेले आहे .संविधान लागून ७४ वर्ष होऊनही आपण शोषित समाजाचे शिक्षणाचे प्रमाण वाढवू शकलो नाही. त्यांच्या झोपडी पर्यंत ज्ञानाचा प्रकाश आपण पोहोचवू शकलो नाही. त्याचे कारण म्हणजेच शोषित समाजाविषयी उच्चवर्णीय समाजामध्ये असलेली हीन भावना होय. त्या भावनेच्या अनुषंगानेच आज वर्तमानातही शोषित समाजांचे शिक्षणातील प्रमाण अत्यंत कमी आहे. त्याची कारणे आणि उपाययोजना यावर मी थोडे चिंतन मांडले आहे .

*शिक्षणाचा अर्थ:-*

ज्ञान प्राप्त करणे हा शिक्षणाचा खरा अर्थ आहे.

शिक्षण म्हणजे विविध कौशल्य आत्मसात करणे .

आपल्या मानसिक शक्तीचा विकास करणे हा शिक्षणाचा अर्थ आहे.

माणसाला स्वतंत्र विचार करायला लावते ते शिक्षण.

अन्यायालाचा प्रतिकार करणे हा शिक्षणाचा खरा अर्थ आहे.

जाणिवाचा शोध घेऊन समाजउन्नतीचा वसा घेणे हा करा अर्थ शिक्षणाचा आहे .पण आज हा अर्थ आपल्याला दिसून येते का?

*शिक्षणाची व्याख्या :-*

शिक्षण म्हणजे माणसाला निर्भय बनवते, त्याला एकतेचा धडा शिकवते, त्याच्या हक्काची जाणीव करून देते आणि त्याचे हक्कासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देते ते म्हणजे शिक्षण.

निरोगी शरीरात निरोगी मनाचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय.
ॲरिस्टॉटल

संपूर्ण जीवनाची तयारी म्हणजे शिक्षण .
हरबारर्ट स्पेन्सर

अनुभवाचे पुनसंघटन म्हणजे शिक्षण.
जाॅन ड्युई

मानवातील उपजत दैवी गुणांची अभिव्यक्ती मध्ये शिक्षण होय .

स्वामी विवेकानंद

सर्व अवयवाचा व शक्तीचा नैसर्गिक विकास म्हणजे शिक्षण ..

शारीरिक व मानसिक दृष्ट्या विकसित झालेल्या सुजाण मानवाचे आपल्या बौद्धिक भावनात्मक व संकल्पात्मक परिसराशी होणारे उत्कृष्ट सम व्यवस्थापन म्हणजे शिक्षण होय.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करेल तो गुरुकुल राहणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी

*शिक्षणाचा बदलता आलेख*

अठराव्या शतकातील सुधारणावादी चळवळीमुळे भारतात शिक्षणाची नवी चळवळ उभी राहिली. या चळवळीतील अनेक उच्चवर्णीय समाजसुधारक तयार झाले पण त्यांनी आपल्या जातीच्या पलीकडे पाहिले नाही .धर्मग्रंथाच्या नियमाना नाकारले नाही हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजेत. ब्रिटिशांनी इथल्या उच्चवर्णीय लोकांना शिक्षण दिले. त्यांनी आपल्या प्रशासकीय कामासाठी वापर केला. स्वतःचे राज्य वाढवले .त्यांचा असा समज होता की, जे वर्ग शिक्षित झाले ते वर्ग इतर माणसाच्या शिक्षणाला मदत करतील.पण उलट झाले उच्चवर्णीय समाजाने शोषित समाजाला शिकवण्यापेक्षा अनेक अडचण निर्माण केल्या. अशा वातावरणात पुणे शहरात महात्मा ज्योतिराव फुले यांनी अन्यायावर मात करून १जानेवारी १८४८ ला भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा काढून उच्चवर्णीय लोकांच्या व्यवस्थेला जबरदस्त आव्हान दिले .त्यांच्या शाळेत शिकलेली मुक्ता साळवे या मुलीने अत्यंत प्रभावी असा निबंध लिहिला. त्या काळातील स्त्री शोषण व शुद्राच्या जगण्यातील वास्तवतेचा अनुबंध उलगडून दाखवलेला आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या शिक्षण विषयी कार्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी योग्य साथ दिली. ब्राह्मण समाजाचा व इतर समाजाचा रोश पत्करून शिक्षणाचे पवित्र कार्य केले. आज आपली स्त्री उंच भरारी घेत आहे .
महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते ते म्हणायचे,

*”विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नितीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्तविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्ये केले”*

इतके अचूक शिक्षणाचे महत्त्व महात्मा फुलेंनी ओळखले होते.

स्वातंत्र्य काळातील बदलत्या जाणिवांचा व जीवनाचा प्रभाव शिक्षणावर पडू लागला. एक पिढी शिकून लागली .२६ जानेवारी १९५० पासून आपले संविधान लागू झाले. सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार मिळाला. अनेक घटक शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाले. अनेकांनी प्रगती केली. पण अजूनही अनेक शोषित घटक आहेत की त्यांना शिक्षणाची खरी ताकद समजली नाही. त्यांना शिक्षण क्षेत्रातून हद्दपार करण्याचे कार्यक्रम आज शिक्षण प्रणाली करत आहे. खाजगी संस्थेच्या निर्मितीने सरकारी शाळा ओश पडत आहेत. शिक्षण हा पैसा कमावण्याचा धंदा झाल्याने शिक्षणाचा मुख्य हेतूच लयास गेला आहे. नव्या ज्ञानाच्या विविध संसाधनातून उच्चवर्णीय समाज पुढे जात आहे. पण आपला शोषित समाज आज शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर कसा फेकला जाईल यासाठीच तजवी सुरू आहे. श्रीमंताच्या घशात शाळा घालून त्यांना अतोनात पैसा कमावण्याचे साधन मिळत आहे. बेरोजगारासाठी चेष्टा सुरू आहे .आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नव्या तंत्रज्ञाने शिक्षणाचे बाजारीकरण केले आहे. आपल्या शोषित समाजाचे स्थान या शिक्षण क्षेत्राचे आलेखात कुठे आहे? हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.त्या गंभीर चिंतन आज होणे गरजेचे आहे.

*शिक्षण क्षेत्रात शोषित समाज मागे राहण्याची कारणे*

*अज्ञान /दारिद्र*

शोषित समाजातील अनेक लोक हातावर पोट घेऊन जगतात. त्यांना एक वेळच्या जीवनासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे तो स्थिर राहू शकत नाही. तो सातत्याने भटकत असतो. आपली उपजीविकासाठी तो सातत्याने स्थलांतर करतो. त्यामुळे त्यांच्या जीवनाला स्थिरता लाभू शकत नाही .बकाल अवस्थेत राहणे ,अत्यंत गरिबी , मिळकतीचा अभाव त्याचप्रमाणे शिक्षणाविषयी अज्ञान. आपण शिकून काही मोठे होणार नाही हा न्यूनगंड .त्यांच्यामध्ये असल्याने शोषित समाज शिक्षणाच्या क्षेत्रात येताना दिसत नाही .जर तो आला तरी काही वर्ग शिकतो आणि नंतर तो शाळेमधून गळती होते. त्यामुळे अज्ञान आणि दारिद्र्य हे शोषण समाजाचे शिक्षणापासून मागे राहण्याचे प्रमुख कारणे आहेत.

*शिक्षणाविषयी उदासीनत*

शोषित समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी होण्याचे मुख्य घटक शिक्षणाविषयीची उदासीनता होय. त्यांना ज्या व्यवस्थेने छळले ती व्यवस्था ज्या विचाराची होती तेच विचार त्यांच्या मनामध्ये आजही आहेत. शिक्षण विषयी त्यांना आवड नाही. शिक्षण हे माणसाच्या प्रगतीचे साधन आहे हे त्यांना पटत नाही. अनेक बाबांच्या आहारी तो जात आहे. शिक्षणाकडे त्यांचा कल नसतो. आपल्या मुलांना योग्य शिक्षण मिळायला हवे असे त्यांना वाटते पण तो कृती करत नाही कारण त्यांच्या सभोवतालचे वातावरण शिक्षणाला सहाय्य करणारे राहत नाही. शोषित समाज शिक्षणाच्या मागे राहण्याचे एक कारण शिक्षणाची उदासीनता होय.

*आत्मभानाचा अभाव*

माणसाला शिक्षण प्राप्त करायचे असेल तर त्यांच्यासमोर एक ध्येय असले पाहिजेत. ते ही आपल्याला आत्मभानाने मिळते .ज्या वर्गांनी हिंदू धर्माची उतरंड नाकारली .१४ऑक्टोंबर १९५६ ला धम्मचक्र प्रवर्तन केले. तसेच फुले, शाहू ,आंबेडकर यांचा विचार आत्मसात केला. त्यांनी प्रगती केली. त्यांच्या नेत्रदीपक प्रगतीने जग विस्मयचकित झालेली आहे. पण शोषित घटकात
आत्मभानाचा अभाव आहे. त्यांना शिक्षणासाठी जी ऊर्जा मिळाला हवी ती ऊर्जा मिळत नाही. फुले ,शाहू, आंबेडकर यांना स्वीकारायला तो तयार नाही .डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे आधुनिक आंदोलन चालवले त्या आंदोलनापासून नवे आत्मभान अस्पृश्य बांधवांत निर्माण झाले. त्यांनी धर्माला नकार दिला व शिक्षणाचे वाट धरली.

आज शोषित समाजात घटकाला शिक्षणाच्या प्रगतीपथावर चढायचे असेल तर फुले, शाहू, आंबेडकरांचे त्री सूत्र आत्मसात करावे लागेल. त्याच्या संघर्ष आपल्या जागृतीची ऊर्जा बनवावी लागेल .तेव्हा शोषित समाज शिक्षण क्षेत्रात पुढे येऊ शकतो. शोषित समाजात एकही नेता व समाजसुधारक समाजाला दिशादर्शक दाखवला तयार नाही. म्हणून त्यांच्यात आत्मभान निर्माण झाले नाही .शोषित समाज शिक्षणाच्या मागे राहण्याचे आत्मभानाचा अभाव महत्त्वाचे कारण आहे.

*संस्कृतीचा प्रभाव*

शोषित समाज अज्ञानात असल्यामुळे त्यांना पारंपारिक संस्कृतीच्या विचारातच गुरफटून ठेवता येते .हे इथल्या संस्कृतीच्या ठेकेदारांना समजल्याने. त्यांनी संस्कृतीच्या नावाखाली अनेक सणाच्या माध्यमातून त्यांना बाहेरचे जग दाखवले नाही. मी माझ्या संस्कृतीचा नियमाने वागलो नाही तर माझ्यावर संकटे येतील अशी त्यांची धारणा झाली आहे. ज्या संस्कृतीने त्याचे ह्क्क नाकारले तीच संस्कृती आज तो गोजरात बसलेले आहे. नव्या संस्कृतीची ओळख तो करू यायला तयार नाही. देव,धर्म,रूढी, परंपरा यामध्ये तो गुरफटून पडलेला आहे. हा वर्ग आजही संस्कृतीच्या प्रभावातून सुटू शकला नाही. पैसे नसताना सण साजरा करणारा हा शोषित समाज. ज्या संस्कृती त्याचे सामाजिक ,आर्थिक राजकीय व शैक्षणिक शोषण केले आहे. पण त्यावर तो चिंतन करताना दिसत नाही . काही विचारवंत त्यावर आवाज उठवतात .पण ते संस्कृतीचे मोरके त्यांना दाबून टाकतात .म्हणून शोषित समाज शिक्षणाच्या मागे असण्याचे कारण सांस्कृतिक संस्कृतीचा प्रभाव हा सुद्धा आहे.

*विज्ञानवादी जाणिवांचा अभाव*

आज विज्ञान तंत्रज्ञाने फार मोठी प्रगती केली आहे .भारतीय लोकशाहीचे महत्त्व उद्दिष्टे विज्ञाननिष्ठता समाज निर्माण करणे आहे. पण तो हेतू काही प्रमाणात साध्य झाला तरी अजूनही शोषित समाज घटकांना विज्ञाननिष्ठ जाणीवांचा अभाव दिसतो. हा समाज शिक्षणाविषयी जागृत नसल्याने अनेक भोंदू बाबा, खोटे संत ,साध्वी प्रवचनाच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या खाईत त्यांना लोटतात. विद्यार्थ्यांचा नरबळी दिल्या जातो. हे किती विकृत मानसिकता आपल्या समाजात मजबूत झालेली आहे .भोंदू बाबा शोषण करतो.प्रवचनात खोट्या भाकड कथांचे गुणगान करतो. समाजाला गुरफडून ठेवतो. त्याचे शारीरिक व मानसिक शोषण करतो. पण त्यावर कोणी बोलायला तयार नाही .प्रवचनाच्या नावाखाली अनेकच वाईट घटना घडत असतात. राजकर्त्यांना फायदा असल्याने ते प्रवचन आयोजित करतात. नेते साधू संन्याशाला मानाचे स्थान देतात. बलात्कारी बाबाला संरक्षण पुरवायचे काम करतात .त्याच्यात विज्ञाननिष्ठ जाणीव नसल्याने समाज पूर्णपणे लीन होत आहे. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजत नाही. जे थोडेफार शिकले तेही विज्ञानवाद स्वीकारला तयार नाहीत. आपल्या चालीरीती बदलायला तयार नाही. म्हणून शोषित समाज शिक्षणाच्या प्रवाहात न येण्याचे महत्वाचे कारण विज्ञाननिष्ठ जाणिवाचा अभाव आहे.

*संविधानातील हक्का विषयी जागृती नाही*

२६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधान लागू झालं. नव्या भारताचे नवे स्वप्न साकार झाले .पण भारतीय संविधानात असलेले शोषित समाजाचे हक्क काय व ते कोणते.? यावर चिंतन होताना दिसत नाही. राजकीय पक्षाने धर्माच्या व जातीच्या नावावर आपली पोळी शेकली आहे. धर्मांध व जातिवाद देशात वाढला. पण शोषित समाजाला संविधानातील हक्काविषयी जागृती केली नाही. शिक्षण घेऊ शकला नसल्याने संविधानातील हक्क काय हे त्यांना माहित नाही. जर का ते माहित झाले असते तर तो बंड करून उठला असता. अशी भीती असल्याने त्यांच्या हक्काविषयी जनजागृती त्यांनी केली नाही. धर्म धोक्यात आहे. जाती व्यवस्था चांगली आहे. संस्कृत ज्ञानाची भाषा आहे .संविधानात आमची काहीच नाही. अशा खोट्या वल्गना करून शोषित माणसाच्या डोक्यात धर्म जातीच विष पेरलं .जाती जातीत लढवलं. संविधानाविरुद्ध तयार केलं. पण आज मोठ्या प्रमाणात हा वर्ग जागृत झाला आहे. शोषित समाजात काम करणाऱ्या संघटना हक्काविषयी जागृती करून देत असल्याने तो पुढे येत आहे. पण आजही बहुसंख्य शोषित समाज संविधानातील हक्काविषयी जागृत नाही. हे महत्त्वाचे कारण शोषित समाजाच्या शिक्षणाच्या प्रवाहात न येण्याचे आहे.

*राजकीय नेत्याची तकलादू वृत्ती*

आज देशात अनेक राज्ये विषमतेच्या आगीत जळत आहे. मणिपूर , महाराष्ट्र ,कोलकत्ता व इतरही राज्यात अन्य अन्याय अत्याचार वाढले आहेत. एन्काऊंटर वृत्ती वाढली आहे. बुलडोझर वृत्ती वाढली आहे . आर्थिक शोषण शैक्षणिक शोषण केले जात आहे. जातीच्या नावावर अन्याय केला जात आहे स्त्री विटंबना केली जात आहे. आदिवासी समूहावर अन्याय केला जात आहे. त्याला प्रमुख कारण म्हणजे राजकारणाचा वचक नसते होय. नेतेच अशा कामात सामील असल्याने कायद्याचे राज्य कमी झाले आहे.नेता म्हणेल तो कायदा अशी व्यवस्था निर्माण झाली आहे. असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात उभा झालेला आहे .राजकीय लोकांनी शोषित समाजाचा फक्त मतासाठी वापर केला. हा घटक आमचे निवडणुकीत किही बिघडवू शकत नाही. ही भावना झाल्याने ते त्या वर्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. त्याचे अधिकार नाकारतात. त्यांना फुकटची काही मदत केली तर त्यांच्या वापर निवडणुकीत करतात. त्यामुळे नेत्यांच्या या भूमिकेमुळे शोषित समाजात उभी फूट पडली आहे. नेते भांडण्याचे नाटक करतात शेवटी एक होतात. पण गावातील राजकारण दोन्ही मित्र शत्रू होतात. एकमेका विरुद्ध लढतात. अशा वातावरणात शोषित समाज कसा काय शिक्षणात सामील होऊ शकतो. साड्या वाटणे ,शिधा वाटणे, पैसे वाटणे या गोष्टी काही प्रमाणात योग्य असल्या तरी त्यातून शोषित समाजाचे शोषण होत आहे. कारण त्यांना मत पाहिजेत तुम्हाला फक्त एक दिवसासाठी शिधा पाहिजे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मतदाना विषयी सतर्क करताना म्हणतात की,*तुम्ही आपल्या मिळालेल्या हक्काचा योग्य उपयोग कराल की नाही ! मी जी एवढी चळवळ चालवली आहे ती काहीतरी तत्त्वाला धरून चालवली आहे. आपल्या पुढार्‍यांची ही अशी नीतिमत्ता पाहून मला खेद होतो. मला तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे. की तुम्ही स्वाभिमानी व्हा. आपला पुढारी कोण हे ठरवा .तो सांगेल त्याप्रमाणे वागा. आपली मते विनाकारण विकू नका .नाहीतर कोणी येऊन एक दोन रुपये देऊन तो तुमची मते घेईल* आपल्यातील संविधान नैतिकता नष्ट झाल्याने राजकर्ते व शोषित समाज घटक असे वागताना दिसतात .राजकारणाची हुजूरगिरी करण्याचे जोपर्यंत हा समाज सोडू शकत नाही तोपर्यंत शोषित समाज शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकत नाही . शिक्षणाच्या प्रवाहात शोषित समाज न येणे यासाठी राजकीय नेत्यांची तकलादूवृत्ती हे एक महत्त्वाचे कारण आहे.

*एकसमान अभ्यासक्रम नसणे* भारतातील शिक्षणात एकसमान अभ्यासक्रम नसल्याने श्रीमंत माणसाचे मुलं चांगल्या शाळेत शिकत असतात. त्यांचा अभ्यासक्रम नव्या ज्ञानाची सुसंगत असतो .कौशल्यवर आधारित असतो .पण बाकीच्या विद्यार्थ्यांना देशपातळीवर अभ्यासक्रमाची ओळख नसल्याने तो शिक्षण घेऊनही मागे पडतो. जेव्हा देशपातळीवर परीक्षा होता तेव्हा राज्याच्या अभ्यासक्रमातील प्रश्न विचारात नाही. ते सीबीएससी यामधील प्रश्न विचारतात. प्रश्न पत्रिका काढणारे तेच असल्याने आपल्या शोषित समाजातील विद्यार्थी स्पर्धेच्या बाहेर फेकला जात आहे. आज अनेक मुलं अहोरात्र मेहनत करतात. पण त्यांना योग्य अभ्यास क्रम नसल्याने ते यशस्वी होताना दिसत नाही. काही परीक्षा घेणाऱ्या संस्था इतर समाजघटक स्पर्धेत पास होऊच नये याची रणनीती करतात. आयबीपीएस,टीसीएस ,एनटीएस किंवा इतर परीक्षा घेणाऱ्या संस्थावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेले आहेत .यामध्ये सुधारणा करण्याची गरज गरज आहे. परंतु ते होत नाही कारण अनेक राजकारणाचे हात त्याच्यामध्ये असल्याचे निदर्शनास येते.एकसमान अभ्यासक्रम नसणे हा सुद्धा शोषित समाज शिक्षणात मागे राहण्याचे कारण आहे.

*जातीनिष्ठ व्यावसायाची आवड*

आज जातीची अस्मिता नव्याने मोहरून येत आहे .ज्या जातींना जोडण्याचे काम बाबासाहेबांनी केले त्याच जातींना तोडण्याचे काम आजची व्यवस्था करत आहे.जातीय कोंडवाड्यात कोंडण्याचे काम शासन व्यवस्था करत आहे .उपवर्ग करण्याच्या नावाखाली जाती व्यवस्था आणखी मजबूत होत आहेत. ज्या जातीवर अन्याय झाला तोच वर्ग पुढे येत आहे. जाती ही राजकारणाची व्होट बॅक झालेली आहे. त्यामध्ये भटके, विमुक्त ,वंचित ,मागासवर्गीय, आदिवासी या शोषित समाजात जात व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी जातीच्या नावाने विविध योजना तयार करून जाती पुन्हा बळकत होत आहेत. जातीतून शोषण झाले तरी काही घटक पुन्हा जातीच्या घाणीच्या डब्यात शिरताना दिसत आहेत. आज जातीयतेने नवे रूप घेतले आहे. एवढाच फरक दिसून येतो .शोषित समाजाच्या शिक्षणाच्या प्रवाहातून हद्दपार करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जातीनिष्ठ व्यवसायाची आवड हा सुद्धा आहे .

*आर्थिक असमानता*

आज शोषित समाजात मोठ्या प्रमाणात आर्थिक असमानता निर्माण झाली आहे. बदलत्या जागतिकीकरण आणि खाजगीकरणाचा गंभीर परिणाम त्यांच्या आर्थिकतेवर पडला आहे. अनेक खाजगी संस्था व बांधकाम व्यवस्था कामगार व शेतकरी समाजाचे आर्थिक शोषण करत आहेत. आर्थिक प्रगती योग्य नसल्याने ते आपल्या मुलाला योग्य शिक्षण देऊ शकत नाही. कोरोना महामारीने शोषित समाजाचं जीवनच उद्वस्त केले. त्यांचा आर्थिक कणाच तुटल्याने तो शिक्षणाच्या परिघाबाहेर फेकला गेलेला आहे.

देशातील आर्थिक असमानतेची दरी एवढी वाढली आहे की येथे श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शोषित समाजाचा विद्यार्थी कसा पुढे येईल. हा एक अत्यंत महत्त्वाची प्रश्न आहे. जगातील तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होण्याचा भ्रम तयार करून ,शोषित समाजाचा आर्थिक स्थर कुठे आहे हे वास्तव डोळेझाक केले जात आहे. कंपन्या मालामाल झाल्या आहेत. तर शोषित समाज शोषणाचा शिकारी झाला आहे .अशा आर्थिक असमानतेत शोषित समाज शिक्षणात कसा पुढे येईल. कारण त्यांच्या शिक्षणाच्या वाटास त्यांनी बंद केलेले आहेत

*उच्च शिक्षणात शोषित समाजाचे प्रमाण*

शोषित समाजातील विद्यार्थी प्राथमिक अवस्थेत प्रवेश घेत असले तरी ते पूर्ण शिक्षण करतात असे नाही. ते उच्च शिक्षण घेण्यापर्यंत पोचू शकत नाही .आणि घेतले तरी त्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे . त्यामुळे या समाजात सुधारणा होत नाही. जवळपास नव्वद टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. प्राथमिक शिक्षण घेत असताना 52% विद्यार्थी प्राथमिक शिक्षण पूर्ण करतात .अशा या वास्तवापासून हा समाज अंधारात जात आहे .विविध योजना लागू करूनही त्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला नाही .कागदोपत्री अनेक योजना दिसत असल्या तरी जमीनवरचे वास्तव वेगळे असते. उच्च शिक्षणात शोषित समाजाचे प्रमाण वाढवायचे असेल तर त्यांना मुक्त व अनिवार्य शिक्षण पदवी पर्यंत असायला हवे. शोषित समाजाला उच्च शिक्षणाच्या वाटेवर आणायचे असेल तर त्यासाठी खास महामंडळ तयार करून त्यांना प्रशासकीय व्यवस्थेत त्याचा वापर करायला हवा.

*राजकारणात नेतृत्वाचा अभाव*

शोषित समाजाला राजकीय हक्क मिळाले तरी त्यांना त्याचा लाभ मिळत नाही. विकले जाणारे नेतृत्व असल्याने जो कोणी नेता होतो तो समाजापासून दुर जातो. नेतृत्वाला समाजाचे देणे घेणे नसल्याने तो आपल्या वर्गाकडे फक्त मताचा राजकारणासाठी उपयोग करतो. व सारा मलिदा स्वतःच खातो. हे अत्यंत भयावस वास्तव शोषित समाज राजकारणाच्या नेतृत्वात दिसून येत आहे. काही नेतृत्व याला अपवादही राहू शकते.म्हणून राजकारणात नेतृत्वाचा अभाव असल्याकारणामुळे हा समाज शिक्षणाचे प्रवाहात येत नाही

*उपाययोजना*

*शिक्षण विषयक जागृती निर्माण करणे*

शोषित समाजाला शिक्षण प्रवाहात आणायचेच असेल तर त्यामध्ये शिक्षणाविषयी जनजागृती करावी लागेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना भा.ल.भोळे लिहितात की, *शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचा साधन असतं व्यक्तिगत अभ्युदयाचं नव्हे. व्यक्तिगत अभ्युदय तर होईलच, व्हावाच. ! माणसाने उच्च पदाची आकांक्षा धरू नये असे मुळीच नाही .त्यांनी प्राध्यापक व्हाव, वकील व्हाव, डॉक्टर व्हावं, नवनवी क्षितीजे आपल्या कबीर घेण्याचा प्रयत्न करावा. पण इथेच थांबू नये ज्या समाजातून आपण आलो ज्या समाजाच्या सामुदायिक आकांक्षेत आपल्याला मोठे केलं. त्या समाजाचं आपण काही देणं लागतो त्याची सतत जाणीव ठेवावी .त्यामुळे शिक्षणातून उपजीविकेची कौशल्य प्राप्त व्हावी .शिक्षणातून माहिती मिळावी .शिक्षणातून आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील अडचणी सोडवण्यासाठी साधने उपलब्ध व्हावी. हे सगळं बाबासाहेबांना हवच होता. पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये शिक्षणातून धारदार अशा प्रकारची सभोवतालच्या समाज जीवनाची जाणीवही निर्माण व्हावी. अशी जाणीव जागृती झाल्याशिवाय शिक्षणाचे सामाजिक प्रयोजन यशस्वी होऊ शकत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाला सामाजिक अभियांत्रिकेचे एक साधन, उपकरण मानत होते. शिक्षणाची तराप लावून हा समाज ढवळून टाकीन ही आकांक्षा त्यांच्या मनामध्ये होती. म्हणूनच त्यांच्या दृष्टीने शिक्षेने केवळ बौद्धिक विकासाचं आणि व्यक्तिगत विकासाचे माध्यम नव्हतं तर ते नैतिक, सामाजिक लोकशाहीची जडणघडण करण्याचा साधन होतं. शिक्षणाद्वारे त्यांना येथे सामाजिक, नैतिक लोकशाही निर्माण करायची होती .त्या लोकशाहीची पायाभरणी करायची होती*
हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजेत.ही भुमिका शोषित समाजातील शिकलेल्या व्यक्ततीची असाली.आज याच उपाययोजनाची गरज आहे . तांडे ,टोली,झोपडपट्ट्या व इतर भागात प्रबोधन शिबिर घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे लागेल. शिक्षणातून आपला विकास होतो यावर पथनाट्य, शॉर्ट फिल्म तयार करून त्याचे उद्बोधन वर्ग घेता येतील. यासाठी राज्यपातळीवर शोषित शिक्षण कलापथक निर्माण करून त्याचा कार्यक्रम गाव पातळीवर घेता येईल. शोषित समाजातील लेखक, कवीं,कलाकार यांनी यामध्ये सहभागी करून शिक्षण विषयक जनजागृती करता येऊ शकते.

*संविधान हक्काची जाणिव निर्माण करणे**

आपल्याला भारतीय संविधानाने सर्वांना अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकाराची जाणीव शोषित समाजाला करून द्यावी. विविध प्रकल्पाचे माध्यमातून जनप्रबोधन व्हावे. मंदिर बांधण्यापेक्षा संविधान हक्काची जाणीव निर्माण करून देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे शोषित समाज देशपातळीवर शिक्षण क्षेत्रात भरारी घेऊ शकतो. यासाठी गरज आहे योग्य नेतृत्वाची. तसेच संविधानावर पूर्णपणे विश्वास असणाऱ्या राज्यव्यवस्थेची.

*नव्या शिक्षण प्रवाहात आणणे*

शोषित समाजातील घरचे वातावरण हे शिक्षणासाठी अनुकूल नसल्याने गावातील सरकारी शाळेतील त्यांना नव्या वाटांचे नवीन शिक्षण द्यावे. त्यांच्या बोली भाषेतून बोलणारे अध्यापक जर लाभले तर तो शिक्षणाच्या प्रवाहात सामील होऊ शकतो. नव्या बदलाचे शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण शोषित समाजाला मिळावे हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे. यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन संविधान सप्ताह साजरा करावा. यातून विविध उपक्रमाच्या माध्यमातून शोषित समाजातील विद्यार्थ्यांना व पालकांना उद्बोधन करावे.

*आर्थिक उन्नतीचा मार्ग दाखवावा*

शोषित समाजाच्या आर्थिक विकास झाला नसल्याने त्यांना पारंपारिक व्यवसाय व मिळेल ते काम करून उपजीविका करावी लागते. त्यांना स्वयं सहाय्य गट तयार करून त्यांना आर्थिक विकासाचे ज्ञान द्यावे. छोटे छोटे काम धंद्यातून त्यांना आर्थिक विकास करता येतो. यावर वर्कशॉप आयोजित करावे. आर्थिक उन्नती करता शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी तरच आर्थिक विकास होऊ शकतो .

*वर्तमानात शिक्षण क्षेत्रात शोषित समाजाचे स्थान*

वर्तमानातील शिक्षण क्षेत्रात शिक्षणाचे स्वरूप बदलते आहे नव्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीने शिक्षणातील साचेबंधता कमी झाली आहे. आपण का शिकतो व त्या शिक्षणाचा खरा उद्देश काय ? यावर आज चर्चा होणे गरजेचे आहे. पण जे वर्ग उन्नत व श्रीमंत आहेत त्यांचेच पाल्य वर्तमान शिक्षण क्षेत्रात पुढे आलेले आहेत. आणि आमचे शोषित बांधव कावड यात्रा, धार्मिक सण, नेत्याचे पोस्टर चिकटवने, क्रिकेट पाहणे,प्रवचन ऐकणे,सतरंज्या उचलणे अनेक विविध उपयोगी नसणाऱ्या कामात मग्न आहेत. त्यांचा जन्म हा सेवेसाठी व धर्मासाठी झाला आहे अशी खोटी आश्वासने देऊन त्यांना यामध्ये गुंतवून ठेवतात. त्यामुळे या शोषित समाजाचे फार मोठे वाटोळे झालेले आहे.

शोषित समाजाला संविधानाच हक्क मिळाले असले तरी ते वास्तव पासून दूर आहेत .अनेक घटकांच्या जातीच्या नावावर मारले जाते. जातीवरून शिवी दिली जाते. यामधून समाजाचा फायदा कमी व तोटा जास्त होतो आमच्या शोषित भगीनी नवरात्र, दुर्गादेवी ,शारदा देवी, महालक्ष्मी अशा विविध सणाला व्रत ठेवतात. या व्रताचा त्यांना काहीच फायदा होत नाही. पण बाजारपेठेला मोठा आर्थिक फायदा होतो . मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी आचार विचारांचे ग्रंथ न वाचता पारंपारिक शोषित व्यवस्थेला आपला खांद्यावर घेऊन चालणारा हा शोषित समाज परिवर्तनासाठी पुढे येताना दिसत नाही.ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.आज शोषित समाजातील बांधवांनी आपण जे करत आहोत त्यावर योग्य की अयोग्य चिंतन करावे. येणाऱ्या भावी पिढ्यांना असेच कार्यक्रम देणे म्हणजे शिक्षणापासून त्यांना वंचित करण्याची सोय आपणच करून देणे होय. म्हणून शोषित समाजातील बांधवांनी महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वसा धरावा त्यामधून त्यांना शोषणाची मुक्ती मिळू शकते. नव्या परिवर्तनासाठी नवे धर्मांतर हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. धर्मांतर करून आपले जीवन सुखी व समृद्ध करता येते. शोषित समाज बांधवाने जरूर विचार करावा. नाहीतर वर्तमान शासन व्यवस्था त्याला गुलाम बनवल्याशिवाय ठेवणार नाही. ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. श्रीमंतांना शाळा विकून त्याची सुरुवात झालेली आहे. आपण आत्ताच सुधारलो नाही तर आपला मृत्यू अटळ आहे .

*समारोप*

शोषित समाजाला नव्या शिक्षणाच्या प्रवाहात यायचे असेल तर धार्मिक गुलामगिरी नाकारावी लागेल. नवीन संवर्धनात्मक संस्कृतीने तो समाजाचा विकास करू शकतो .भविष्यातील येणाऱ्या वादळांना रोखण्यासाठी शिका..! संघटित व्हा..!! आणि संघर्ष करा ..!!! हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र त्यांनी अंगीकार करावा .हाच मार्ग त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील स्थान वाढवू शकतो . दुसरा कोणताच मार्ग शोषित समाजाला वाचवू शकत नाही.शिक्षणाची नाकेबंदी कशी होती यावर कवी लिहितात की,

“हजारो वर्षापासून साधनवंचित समाजाला
मनुव्यवस्थेने शिक्षणाची नाकेबंदी करून गुलाम केले
तसेच
आजचे राज्य व्यवस्थेचे सरकारे शिक्षणाची नाकेबंदी करतात
सरकारी शाळा बंद करण्याचा घाट घालतात
खाजगीकरणाच्या नव्या शाळा यांना मान्यता देतात
आणि आमचे अंधभक्त धार्मिक उन्मादात तल्लीन राहतात..
आमच्या पिढ्या बरबाद करणाऱ्या राजतंत्राला बळ देतात..
त्याच्या षड्यंत्रकारी चक्रव्यूहात अडकतात .
शिक्षण सोडून वारी करतात,
विविध उपक्रमा सहभागी होतात. आपल्या पायावर आपणच वार करतात .
आर्थिक आरक्षणाच्या नावाखाली आरक्षणाच्या मुद्द्याला बगल देतात..
ही बेजबाबदार व्यवस्था
शिक्षणाची नाकेबंदी करून
समस्त बहुजन समाजाला गुलामीच्या जोखंडात अडकवत आहे .
त्यांचा कावा आपण ओळखून आंदोलन केला पाहिजेत .
आपल्या येणाऱ्या पिढ्यांना वाचवलं पाहिजेत..
खाजगीकरणाच्या दलाला उकडून फेकला पाहिजेत .
तरच शिक्षणाच्या नाकेबंदीला आपण लगाम लागू शकतो.
आणि
मुक्त स्वातंत्र्याचे नवे शिक्षण उपलब्ध करून देऊ शकतो.
तेव्हाच भारत हा जगातील खरा लोकशाहीप्रधान देश ठरेल”
आणि शोषित समाजाला नवे शिक्षणाचे दालन उघडे होईल.

संदर्भ ग्रंथ

१)फडके य.दी , ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’,
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई, १९९१ पृष्ठ क्रमांक ५५३

२)भडंग लोहे, एमपीएससी डाइट, प्रगती बुक्स पुणे ,एप्रिल २०१६ पृष्ठ क्रमांक क्रमांक १.१

३)मुन वसंत (संपादक), ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषणे’, खंड क्रमांक १८, भाग एक, पृष्ठ क्रमांक ३०६ ,३०९

४)मुन वसंत (संपादक), डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे, खंड अठरा , खंड दोन, पृष्ठ क्रमांक ५७०
५)सबाने अरूणा ,आकांक्षा त्रैमासिक, एप्रिल मे जून १९९९ पृष्ठ क्रमांक ५२
६)गायकवाड संदीप, “काळजात ठसठसणाऱ्या जखमांचा प्रदेश “सीवली प्रकाशन नागपूर, २०२२,पृष्ठ क्रमांक १६४

 

 

संदीप गायकवाड नागपूर
९६३७३५७४००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here