


कराड : (दि. 27, प्रतिनिधी) ” मराठी भाषा दिन हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून जगभरातील मराठी भाषिकांकडून तो साजरा केला जातो. मराठी भाषा आपल्या समृद्ध साहित्यिक परंपरा आणि अर्थपूर्ण बारकाव्यांसह, देशाच्या भाषिक वारशात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. महाराष्ट्र हे साहित्यिक उत्कृष्टतेचे माहेरघर आहे आणि मराठी भाषा दिन हा मराठी साहित्याला समृद्ध करणाऱ्या दिग्गजांचा गौरव करण्याचा आणि साजरा करण्याचा दिन आहे. कुसुमाग्रजानी मराठी भाषेला ज्ञानपीठ मिळवून दिले. कुसुमाग्रज यांचे साहित्यातील योगदान खूप मोठे आहे. त्यानिमित्ताने मराठी भाषेचा गुणगौरव करणे हे मराठी भाषिक म्हणून आपले कर्तव्य ठरते.” असे प्रतिपादन प्रा. सौ. कांचन थोरात यांनी केले. त्या श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे मराठी विभाग आयोजित ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने आयोजित व्याख्यान प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीमती एस. आर. सरोदे मॅडम होत्या. आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की , “मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असताना आपल्या भाषेचा गौरव कसा होईल या साठी प्रयत्न केला पाहिजे. आपली मायबोली म्हणून मराठी भाषेतूनच सर्व व्यवहार व्हायला हवेत. मराठी भाषेबरोबरच इतर भाषाही शिकणे आता गरजेचे झाले आहे.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व विद्यार्थांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मराठी विभाग प्रमुख प्रा. एस. एस. बोंगाळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. व्ही. आय. आंबेकरी यांनी करून दिली तर आभार प्रा. के. एस. महाले यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. ए. एम. मुजावर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी कु. अक्षता सुतार आणि कु. शेजल कदम यांनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गीत सादर केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.













