


नवोदित साहित्यिकांची मनापासून दखल घेणारे आणि जमेल तशी साहित्य क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणारे ज्येष्ठ कवी उद्धव कानडे, पुणे यांचे निधन झाल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रात अपरणीत हानी झाली आहे. त्यांच्या समवेत व्यवस्थित केलेले काही क्षण आठवतात….
टाकळी ढोकेश्वर येथील अपंग विद्यालयांमध्ये रावसाहेब झावरे सर यांनी १९९५-९६ मध्ये काव्य संमेलन ठेवलेले होते आणि या काव्यसंमेलनासाठी सिंधुताई सपकाळ यांच्यासह उद्धव कानडे उपस्थित झालेले होते. कवी उद्धव कानडे आणि आमची ती पहिलीच भेट होती. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक कवी, साहित्यिक मित्र त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामध्ये चंद्रकांत पालवे,अरविंद निकाळजे,भास्कर दादा लगड, चंद्रकलाताई आरगडे, प्रा.शंकर चव्हाण, शशिकांत शिंदे, एम.पी. दिवान, डॉ.शंकर चव्हाण, बाबासाहेब सौदागर, अर्जुनराव सदाफुले,डॉ.अशोकराव शिंदे, गिताराम नरवडे, डॉ.बाबासाहेब बांडे, वसंत मुरदारे या सर्व जेष्ठ मंडळी सोबतच नव्याने लिहिणारे मनिषा गायकवाड, संगीता फसाटे, संजय बोरुडे, तत्कालीन शहनाज उर्फ शर्मिला गोसावी, कैलास दौंड व आम्ही सीएसआरडी महाविद्यालयातील रमेश वाघमारे, मी सुनील गोसावी व इतर काही मित्रांसह सहभागी झालेलो होतो. त्या ठिकाणच्या काव्यवाचनानंतर उद्धव कानडे यांनी सर्वांची जाणीवपूर्वक चौकशी केली. चर्चा केली. तेव्हा शब्दगंध ची घडीपत्रिका आम्ही प्रसिद्ध करत होतो आणि ती पयेणंकेन मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचलेली होती.त्याबद्दलही त्यांनी भेटीत आवर्जून उल्लेख केला.त्यानंतर छोट्या-मोठ्या साहित्यिक कार्यक्रमातून त्यांच्या भेटी होत राहिल्या पण जास्त जवळीक ज्या भेटीत आली ती भेट म्हणजे प्रा.डॉ.शंकर चव्हाण यांना गदिमा साहित्य पुरस्कार जाहीर झाला होता, तो स्वीकारण्यासाठी अहमदनगर मधुन डॉ शंकर चव्हाण, आकाशवाणी केंद्राचे सेवानिवृत्त अधिकारी लियाकतअली सय्यद साहेब यांच्या सह आम्हीं गेलो. ज्येष्ठ कथाकार द.मा.मिराजदार यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ होणार होता. त्याच बरोबर चित्रपट,गीतकार किशोर कदम (सौमित्र) यांनाही पुरस्कार मिळणार होता. पिंपरी चिंचवड येथील भरगच्च सभागृहात सदर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे क्षणचित्रे मी चित्रित केले. कार्यक्रम संपल्यानंतर उद्धव कानडे व सदाफुले काका यांचे आभार मानण्यासाठी आम्ही थांबलो होतो. उद्धव कानडे यांचेशी बोलत असतानाच द.मा. मिराजदार तिकडे आले. त्यांनी विचारले आता पुढचा कार्यक्रम काय ? चव्हाण सर म्हणाले, ‘आम्ही आता नगरला जाणार आहोत,पण तत्पूर्वी जेवण करणार आहोत.तुम्ही जर येणार असेल तर आपण सर्वजण एकत्र जाऊ या’ उद्धवजी कानडे यांनी आमची त्यांच्या सोबत एकत्र जेवण आणि गप्पा मारण्याची हाऊस पुरी केली. ते दादांना घेऊन आमच्या सोबत जेवणाला आले.आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी राहिलेले सय्यद साहेबांनी द.मा मिरासदार दादा यांना बोलते केले. त्यांनी ग दि माडगूळकर पासून तर आनंद यादव पर्यंत च्या असंख्य आठवणी सांगितल्या. गप्पांची मैफिल उद्धव कानडे आणि सदाफुले काका यांच्यामुळे रंगली. ती मैफल मनात साठवतच आम्ही कधी नगरला पोहोचलो समजले नाही.
त्यानंतर एकदा शब्दगंध साहित्य संमेलनातील काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आम्ही त्यांना विचारलं आणि उद्धव कानडे शब्दगंधच्या काव्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून सहकार सभागृहांमध्ये उपस्थित राहिले. त्यावेळी शब्दगंधच्या सर्व नवोदित मित्रांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अनेकांना त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सभासद होण्याबाबतची कल्पना दिली. पुण्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचे आश्वासित केले. नंतरच्या काळात त्यांनी काही कार्यक्रमांसाठी आम्हाला पुण्याला बोलावले. विचारांची आदान प्रदान वाढत राहिली.
शब्दगंध च्या कोणत्याही कार्यक्रमाचे वृत्त पुण्यातील वृत्तपत्रात आले आणि ते त्यांनी वाचले की लगेच फोन करत. यावर्षीच्या पंधराव्या संमेलनासाठी ही त्यांना आम्ही येण्यासाठी आग्रह केलेला होता. सुरुवातीला त्यांनी होकार ही दर्शवला पण दोन दिवसानंतर पुन्हा जमणार नसल्याचे कळवले कारण त्यांची तब्येत फारशी बरी नव्हती आणि ते ज्या मित्रांच्या सोबत यायला तयार होते, त्या मित्राला याच तारखेला इतर काही काम निघाले असल्यामुळे त्यांनी ताबडतोब नकार कळवला. या वर्षीच्या शब्दगंध साहित्य संमेलनात त्यांची कविता ऐकायची राहून गेली, ती कायमचीच…… त्यांच्यासोबत पुण्यात काही कार्यक्रमाला सहभागी होण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने काही वेळा जाणे झाले. तेव्हा ते आवर्जून अनेक साहित्यिकांशी ओळख करून देत आणि शब्दगंधच्या उपक्रमाबद्दल तोंड भरून कौतुक करत. असे कवी उद्धव कानडे आपल्या मधून गेल्याने अतिशय दुःख होत आहे. त्यांच्या अनेक आठवणी मनात साठवून ठेवत त्यांना शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
*सुनील गोसावी*
संस्थापक,सचिव
*शब्दगंध साहित्यिक परिषद* महाराष्ट्र राज्य.
९९२१००९७५०














