


अनिल साळवे, प्रतिनिधी
गंगाखेड (प्रतिनिधी)
राज्यभर सुरू असलेल्या मराठा आरक्षण लढ्यास वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. मराठा बांधवांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे, हि माझी कायम भूमिका आहे. मात्र, तरीही गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांची उद्घाटने व इतर कार्यक्रम मी करू नये, अशी जर मराठा समाज बांधवांची भूमिका आहे. परिणामी, त्यांच्या भावनेचा, विनंतीचा आणि भूमिकेचा आदर करून मी मतदार संघातील सर्व उद्घाटने व इतर कार्यक्रम टाळणार आहे, अशी माहिती गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड शहरातील जनसंपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
माझ्यासाठी माझी जनता सर्वेपरी आहे. त्यांचा भरघोस पाठींबा असल्याने मी विधानसभेत पोहोचलो आहे, याचीही मला जाणीव आहे. त्यामुळे गंगाखेड विधानसभा हा माझा परिवार असून मी जनतेचा सेवक आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सुख-दु:खात मी त्यांच्या सोबत आहे आणि नेहमी असेन. त्यामुळे मराठा समाज बांधवांच्या भावनेचा आदर करणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणून उद्घाटने व कार्यक्रम टाळण्याचा मी स्वतः निर्णय घेतला आहे. तसेच मराठा आरक्षणाचा विषय कायमस्वरूपी सुटावा यासाठी बिहार राज्यप्रमाणे ६४ ते ६५ टक्क्यांपर्यंत आरक्षण मर्यादा वाढवावी लागेल, याचाही राज्य शासनाने सकारात्मक विचार करावा, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी म्हटले.
या निमित्ताने मला सर्वांना हेही आवर्जून सांगायचे आहे की, आपल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी मी शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यातील ती कामे वेळेवर सुरू झाली नाहीत तर, तो निधी पुन्हा शासनास वर्ग होवू शकतो. त्यामुळे त्या-त्या गावातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक किंवा इतर जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते तेथील विकासकामांचे उद्घाटन किंवा भूमिपूजन करण्यास मराठा बांधवांना कोणताही आक्षेप घेवू नये. जेष्ठांच्या हातून उद्घाटन किंवा भूमिपूजन झाल्यास त्या कामांचा निधी शासनास जमा होणार नाही. परिणामी, मतदारसंघातील विकासकामे सुरळीत सुरू राहातील. त्यातून विकासात्मक वाटचालीस कोणतीही खिळ बसणार नाही. याचा सर्व सकल मराठा बांधवांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशीही विनंती आ.डॉ.गुट्टे यांनी मराठा समाज बांधवांना उद्देशून केली आहे.
मराठा समाज हा कायम माझ्या सोबत राहिला आहे. त्यांची खंबीर साथ असल्याने माझी वाटचाल सुरळीत आहे. त्यामुळे त्यांच्या भावना मी कधीही दुखावणार नाही. म्हणूनच उद्घाटने व कार्यक्रम टाळण्याचा निर्णय घेत आहे, अशीही स्पष्टोक्ती आ.डॉ.गुट्टे यांनी दिली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासपचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे, पालम प्रभारी माधवराव गायकवाड, तालुका प्रभारी हनुमंत मुंढे, संचालक संभुदेव मुंढे, तालुका अध्यक्ष रामप्रसाद सातपुते, सामाजिक कार्यकर्ते राजेभाऊ बापू सातपुते, उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण आप्पा मुंढे, युवक तालुकाध्यक्ष बालासाहेब लटपटे, वैजनाथ टोले, भास्कर ठवरे, उध्दव शिंदे,बालासाहेब शिंदे, आप्पासाहेब कदम, उध्दव चोरघडे, गोविंद डोणे, नागेश शिंदे यांच्यासह पत्रकार बांधव, पदधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
म्हणून या कामांचे भूमिपूजन झाले स्थगित
सकल मराठा समाज बांधवांनी कार्यक्रम स्थळी येवून केलेली विनंतीमुळे त्यांच्या भावनेचा आदर करून विकासकामांचे नियोजित भूमिपूजन स्थगित करण्याचा निर्णय आ.डॉ.गुट्टे यांनी घेतला. त्या स्थगित भूमिपूजनात मौजे.राणीसावरगाव येथील रेणूका माता मंदिर जाण्याचा रस्ता ५ कोटी, हिंगोली-हट्टा-धनगर टाकळी-पालम राणीसावरगाव रस्त्याची सुधारणा ४ कोटी, राममा ३६१ फ पारधेवाडी-उखळी (खु)-हरंगुळ-खादगाव, रामा २३४ अकोली-इसाद, रामाम ७५२ के पासून ढवळकेवाडी ते मालेवाडी, राममा ३६१ फ ते झोला-पिंपरी पुढे सांगवी-भुजबळ ते रावराजूर, प्रजिमा उमरथडी आरखेद- फरकंडा-बरबडी पासून मु.पिंपळगाव-पारवा पेठशिवणी-सेलू-पेंडू ते कौडगाव, रामा २३५ बनवस रस्ता रूंदीकरणसह ८ कोटी, प्रजिमा ३५ रावराजूर-सिरपूर-पालम-पुयनी ते आडगाव-वनभुजवाडी, रामा २३५ चाटोरी-बोरगाव (बु) उरवंटी-बोथी, रामा २५४ ला मिळणारा रस्ता १ हजार लक्ष, गंगाखेड शहरातील उपविभागीय व तहसील कार्यालय नवीन इमारत बांधकाम १ कोटी ५० लाख, क्रीडा संकुल बांधकाम ४९९.९८ लक्ष रूपये या कामांचा समावेश आहे.














