


सातारा/ खटाव, प्रतिनिधी/ नितीन राजे 9822800812
: खटाव तालुक्यात अद्याप एकही दमदार पाऊस झाला नाही. येरळवाडी आणि नेरसह इतर तलावांनी ऐन पावसाळ्यातच कोरडा पडत चालला आहे.
खटाव तालुक्यात मध्यम आणि लघुप्रकल्पांतील १० तलाव आहेत तालुक्याला दुष्काळाचे चटके बसू लागल्याने पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.
तालुक्यात येरळवाडी, नेर तलाव हे मध्यम प्रकल्प आहेत. येरळवाडी तलावात ९.८४ टक्के (१.९३ दलघमी), तर नेर तलावात १७.८१ टक्के (२.१० दलघमी) पाणीसाठा आहे. तालुक्याची कायम तहान भागविणाऱ्या या दोन्ही तलावांत पाण्याची आवक शून्य असल्याने दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले
आहे. लघुप्रकल्पांतील दरूज (०.१२ दलघमी) आणि मायणी (०.३० (दलघमी) या दोन्ही तलावांत मिळून ०.४२ दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा आहे. येळीव, पारगाव, शिरसवडी, कानकात्रेवाडी, सातेवाडी, डांभेवाडी हे लघुप्रकल्प कोरडे पडले आहेत. अशातच तालुक्याची जीवनदायिनी असलेली येरळा नदीही कोरडी पडल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या या तालुक्यात यंदा पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत, तरी एकही दमदार पाऊस पडला नाही. मध्यंतरी झालेल्या पावसाने तालुक्यात पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र, त्यानंतर लगेचच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या
दुष्काळी परिस्थितीत पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात खालावत आहे. शेती सिंचनाची परिस्थिती बिकट झाली आहे. काही भागात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.
आगामी काळात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर पाण्याअभावी यंदाच्या
खरिपासोबत हजारो हेक्टरवरील बारमाही पिके अडचणीत येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, तलावांतील पाणी संपल्याने येरळा नदी परिसरातील ओढे-नाले, बंधारे, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. परिणामी, नागरिकांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे तालुक्याची तहान भागविण्यासाठी ज्या पाणी योजना पूर्ण झाल्या आहेत. त्या योजनांचे तलावांत आवर्तन सुरू करणे आवश्यक झाले आहे.














