


🔹शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्याची मागणी !
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.23जुलै):-शाळेत जेवण बनवण्यासह निवडणूक संदर्भातील कामे, सर्वेक्षण, माहिती संकलित करणे, वेळोवेळी येणाऱ्या सरकारी कार्यक्रमांची अंमलबजावणीसारखी अनेक अशैक्षणिक कामे शिक्षकांना करावी लागतात. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. मात्र शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवू देण्यापेक्षा अशैक्षणिक आणि टपाली कामे लावली जात असल्याबद्दल शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे कोरोनानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे आव्हान आहे. त्यासाठी शासनाकडून शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जात आहे. त्यातच शाळा सुरू होताच शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात अशैक्षणिक कामांचा मारा केला जात आहे.
शिक्षण विभाग, डायट, विद्या प्राधिकरणाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध अशैक्षणिक कामांत विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यात येत आहे. अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक वैतागले आहेत. मतदार याद्या तयार करणे, जनगणना, पटनोंदणी, शालेय पोषण आहार, सर्वेक्षण, वृक्षारोपण, शाळेची रंगरंगोटी, विद्यार्थ्यांचे बँक खाते, आधार कार्ड काढून देणे, पालकांची सभा, शाळा व्यवस्थापन समिती सभा, शाळेची ऑनलाइन माहिती भरणे, युडायसवर माहिती भरणे, शैक्षणिक अहवाल तयार करणे, शिष्यवृत्तीबाबत माहिती भरणे, शिक्षण विभागाने मागितलेली माहिती पुरवणे, शालेय पोषण आहार वाटपाची कामे, पोषण आहारच्या नोंदी ठेवणे, धान्यसाठा नोंदवणे, साहित्याची मागणी, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, राष्ट्रीय कामात मदत करणे अशी तब्बल शंभरपेक्षा जास्त कामे दिली जात असल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शिक्षणीक नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून बाहेर काढून शासन स्तरावरून शेकडो प्रकारच्या अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची लवकर मुक्तता करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे.













