Home बीड खाजगी सावकारी आणि सट्टेबाजीने हजारो कुटुंबांची राखरांगोळी

खाजगी सावकारी आणि सट्टेबाजीने हजारो कुटुंबांची राखरांगोळी

307

🔸लाखाला हजार रुपये रोजच्या व्याजामुळे काहींनी दिला जीव तर अनेकजण परागंदा

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.19जून):-जिल्ह्यात मागच्या काही काळात खाजगी सावकारी आणि सट्टेबाजी मोठ्याप्रमाणावर बोकाळली आहे. सट्टा घेणारे बुकी तेच,सट्टा खेळण्यासाठी पैसे कमी पडले तर लाखाला हजार रुपये व्याजाने पैसे देणारेही तेच आणि पुन्हा वसुलीसाठी माणसे उचलून नेण्यापर्यंतची यंत्रणा राबविणारेही तेच,अशा काही मोजक्याच लोकांच्या चक्रात जिल्ह्यातील अनेकजण भरडले जात आहेत.सट्टेबाजी आणि खाजगी सावकारीमुळे आतापर्यंत हजारोंच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे.काहींनी जीव दिला आहे,तर अनेकांना घरदार विकून परागंदा व्हावे लागले आहे.तरीही सट्टेबाजी आणि खाजगी सावकारीचे दुष्टचक्र मोडण्यासाठी ना प्रशासन पुढे येत आहे,ना लोकप्रतिनिधींना काही गांभीर्य आहे.

बीड जिल्ह्यात खाजगी सावकारी हा काही नवीन विषय नाही. खाजगी सावकारीमुळे यापूर्वी देखील अनेक बळी गेले आहेत.खाजगी सावकारांनी घरेदारे, शेती लिहून घेण्याच्या घटना नेहमीच्याच असतानाच आता खाजगी सावकाराला सट्टेबाजीची जोड मिळाली आहे. पूर्वी क्रिकेटसारख्या खेळावर सट्टे लागायचे आता तर कशावरही सट्टा लावला जातो.सट्टा घेणारे बुकी प्रत्येक शहरात मोजकेच असले आणि त्यांची पोलिसांना माहिती असली तरी या सट्टेबाजीवर कारवाई मात्र होताना दिसत नाही.या सट्टेबाजीमध्ये सारे काही गमावल्यानंतर सावकाराचा ससेमिरा चुकत नसल्याने काहींना जीव दयावा लागला आहे. तर मागच्या २ वर्षात एकट्या बीड शहरातून ५० पेक्षा अधिक व्यापाऱ्यांना परागंदा व्हावे लागले आहे. एका शहराचा आकडा हा असेल तर जिल्ह्याची परिस्थिती कशी असेल याचा विचारही करवत नाही. मात्र कधीतरी एखादी कारवाई करण्यापलीकडे पोलिसांकडून या सट्टेबाजीवर कारवाई झालेली नाही.

सट्टेबाजीचे सॉफ्टवेअर
पूर्वी सट्टेबाजी फोनवर सांगून आणि त्याच्या बुकींकडे नोंदी ठेवून केली जायची, मात्र आता तर या सट्टेबाजीने आणखी पुढचा टप्पा गाठल्याचे सांगितले जात आहे.सट्टेबाजांनी स्वतःचे असे सॉफ्टवेअर निर्माण केले आहेत,ते सॉफ्टवेअर प्रीपेड आहेत आणि त्यातून सट्टा खेळाला जातो अशी माहिती आहे.

खाजगी सावकारीची सांगड
सट्टेबाजीमध्ये सध्यातरी व्यापारीवर्ग,विशेषतः २५-४० वयोगटातील व्यापारी मोठ्याप्रमाणावर सक्रिय आहेत. फार काही न करता झटपट पैसे कमविण्याचे साधन म्हणून सट्टेबाजीकडे पहिले जाते.यात सुरुवातीला एक दोन वेळा लक लागते आणि नंतर मात्र उतरता प्रवास सुरु होतो. उतरता प्रवास सुरु झाला का मी मग त्या व्यापाऱ्याला सट्टा खेळण्यासाठी पैसे पुरविणारे खाजगी सावकार आहेत.’तुम्ही खेळा,हे पैसे’ असे म्हणत लाखो रुपये लावले जातात,त्याला पुन्हा लाखाला हजार रुपये रोज असे व्याज आकारायचे,अनेक व्यापारांकडे असे व्याजाचे कोट्यवधी रुपये थकले आहेत.

वसुलीसाठी काहीही…
एकदा का एखाद्याकडे ५० लाखापेक्षा अधिक रक्कम थकली, की मग त्याच्या सांपत्तिक स्थितीनुसार त्या व्यक्तीकडे सावकाराचा ससेमिरा सुरु होतो.अगदी त्याची वाहने जप्त करून, त्याचे घर,शेती विकायला भाग पाडून त्याच्याकडील पैशांची वसुली केली जाते.काही सावकार तर थेट त्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबासमोर स्वतःचे कपडे काढून बसतात आणि शिवीगाळ करीत वसूलीचा तगादा लावतात असा अनेकांचा अनुभव आहे.

मृत्यूनंतरही होत नाही सुटका
सट्टेबाजी आणि खाजगी सावकारीतून आतापर्यंत काहींनी आत्महत्या केल्या. काहींच्या आत्महत्यांची नोंद झाली, काहींची नोंदही होत नाही. बरे ज्याने पैसे घेतले तो मेला म्हणजे त्याच्या कुटुंबाची सुटका होत नाही. तर त्यासाठी त्याच्या कुटुंबियांना धमक्या देऊन शेत,घर विकायला लावले जाते आणि त्यातून वसुली होते.
—-
पोलिसांची मदत तर दूर,त्रासच
अशा प्रकारांची दाद मागायची कोणाकडे हा देखील प्रश्नच आहे.पोलिसांकडून पीडित कुटुंबाला मदत तर होत नाही, उलट त्रासच होती. मध्यंतरी एका व्यक्तीने सावकाराला वैतागून आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या कुटुंबाने तक्रार दिली, त्या सावकारांवर काय कारवाई झाली माहित नाही , मात्र त्यातील काहींनी मयताच्या कुटुंबीयांविरुद्धच तक्रार दिली आणि त्या तक्रारीची मात्र पोलिसांनी वेगाने दखल घेत, त्या कुटुंबाला खाक्या दाखविला. अखेर सारे शेत विकून त्या कुटुंबाला सावकारांचे पैसे द्यावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here