


संजय बागडे, नागभीड तालुका प्रतिनिधी मो. 96898 65954
नागभीड – बहुजन समाजाला सतत जागृत ठेवण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या जीवाचे रान केले या महापुरुषांमध्ये तथागत बुद्ध, सम्राट अशोक, संत कबीर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीआई फुले, शाहूजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या बहुजन महापुरुषांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या जीवाची पर्वा न करता सतत संघर्ष करून बहुजन समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी त्यांना त्यांच्या हक्क आणि अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी अविरत प्रयत्न केले आज च्या घडीला आपण बघतो आहोत की केवळ या महापुरुषांच्या जयंत्या, मिरवणुका साजऱ्या करून त्यांचे दैवतीकरण केल्या जात आहे आणि त्यांच्या विचारांना तिलांजली दिल्या जात आहे. कोणत्याही समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी तेथील साहित्य हे खूप महत्त्वाचे असते त्या साहित्यामध्ये सामाजिक कविता, सामाजिक गीते, प्रबोधनात्मक कार्यक्रम यामध्ये समाजाला योग्य दिशा दाखवणारे कार्यक्रम असायला हवे परंतु यामध्ये आपल्याला असे दिसते की अनेक कार्यक्रमांमध्ये वक्ते वैचारिक असो किंवा प्रबोधनात्मक असो त्यांनी सावधानपूर्वक शब्दांचा वापर करणे आवश्यक आहे अन्यथा चळवळीची दिशा भरकटते आणि ती चळवळ संपुष्टात येते. जसे की सामाजिक गीतामध्ये बाई भिम महा देवा हुनी भारी देव, तुला देव म्हणाव की भिमराव म्हणावं, भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी यासारख्या गीतांमधून आपल्याला दैवतीकरण आणि पुनर्जन्म यासारख्या संकल्पना पुन्हा आपल्या समाजात रुजत आहे असे दिसून येते म्हणून दुर्दैव, भाग्य असे विधान संपूर्णपणे टाळले पाहिजे अन्यथा आपले चळवळीचे कार्य मंदावेल व समोरच्या पिढीला योग्य तो संदेश जाणार नाही आणि परिवर्तन घडून येणार नाही. त्याचबरोबर गावोगावी तसेच शहरांमध्ये सुद्धा विहारांमध्ये फक्त बुद्ध पूजा पाठ केली जाते. तरी हि विहारे केवळ पूजा पाठाचे केंद्र न बनता नालंदा, तक्षशिला या विश्वविद्यालयासारखी सामाजिक राजकीय, आर्थिक, शैक्षणिक तसेच धम्म संस्काराची केंद्रे बनावी त्या विहारांमध्ये वाचनालय असावी. त्या वाचनालयाचा उपयोग बहुजन समाजातील लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी करून घ्यावा. दैव, नशीब प्रारब्ध, पुनर्जन्म, दैवतीकरण असे शब्द मोठ्या विद्वानाकडून सुद्धा ऐकायला मिळतात यापासून बहुजन समाजाने जागृत राहावे. या शब्दांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कर्तुत्वावर, मनगटावर विश्वास ठेवून तार्किक बुद्धीचा वापर करावा. याकरिता आंबेडकरी विचारवंतांनी पुढे येऊन बहुजन महापुरुषांचच्या विचारांचा प्रचार व प्रसार करावा व महापुरुषांचे विचार जिवंत ठेवावेत. असे मत स्थानिक तुकुम येथे 132 व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अध्यक्ष पदावरून आपले मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक अशोक शिंगाडे सर यांनी व्यक्त केले.
स्थानिक तूकुम (नागभीड) येथे जय भीम युवा ग्रुप व बौद्ध समाज तुकुम यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती कार्यक्रम आयोजन करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक शिंगाडे, प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक जयंत रामटेके, डॉ. अमृतकर, दिवाकर बनकर बौद्ध समाज अध्यक्ष तुकुम, पुरुषोत्तम बनकर, मंदाताई गणवीर, राहुल वरोकर, अक्षय बनकर हे मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते.
जयंतीच्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्राध्यापक जयंत रामटेके यांनी आपले विचार व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून आजच्या सामाजिक सद्यस्थितीचा आढावा घेऊन आजची शिक्षण प्रणाली आणि बहुजन समाजाने घ्यावयाचे उच्चशिक्षण यावरती विशेष असं मार्गदर्शन केलं.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवाकर बनकर बौद्ध समाज अध्यक्ष तूकूम यांनी केले. संचालन गुंजन बनकर यांनी तर आभार अक्षय बनकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जय भीम युवा मंच व बोद्ध समाज तुकुम व गावातील नागरिक यांनी सहकार्य केले.












