Home महाराष्ट्र बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार यांची पदमुक्ती अटळ-सामाजिक न्याय विभागाने दिले प्रतिज्ञापत्र

बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार यांची पदमुक्ती अटळ-सामाजिक न्याय विभागाने दिले प्रतिज्ञापत्र

229

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.4एप्रिल):-पुणे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील निबंधक इंदिरा अस्वार यांना पदमुक्त करण्यात यावे, अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र सामाजिक न्याय विभागाने महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाला दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या ५ तारखेला त्यांच्या पदमुक्तीची शक्यता अटळ आहे. तत्कालीन महासंचालकांनी त्यांची विभागीय चौकशी करण्याची विनंती वरिष्ठांना केली होती. तसेच त्याची तातडीने पदमुक्ती केली होती. यावर निबंधक इंदिरा अस्वार ह्या मॅटमध्ये गेल्या होत्या.

पुण्यातील बार्टी सध्या विविध कारणामुळे प्रकाशझोतात येत आहे. येथील गैरव्यवहार करणाऱ्यांना तत्कालीन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी घरचा रस्ता दाखविल्यानंतर स्पर्धा परीक्षा केंद्राचा गोलमाल कारभार करणाऱ्यांना हाताशी धरून काही अधिकाऱ्यांनी बार्टीत अक्षरशः धिंगाणा झाल्याचे दिसून येते. तत्कालीन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी आपल्या पारदर्शक कारभारामुळे बार्टीला सर्वोत्तम पर्याय करण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागात लोकांना बार्टीचे महत्त्व समाजावून सांगितले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर बार्टीत चालत असल्याचा संदेश दिला होता. एवढेच नव्हे तर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःचे उखळ पांढरे करणाऱ्या संस्थांना घरी बसविले होते. निविदा प्रक्रिया इ-ऑनलाइन केल्यामुळे काही भामट्या संस्थांचे धाबे दणाणले होते. यातून तत्कालीन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्याविरोधात कार्यालयातील काही लोकांना हाताशी धरून कट रचण्यात आला होता. दरम्यान काही प्रकरणामध्ये अधिकारीच दोषी आढळल्याने त्यांच्यावरही महासंचालकांनी कारवाई केली होती. भीमा कोरेगाव येथील भोजन निविदामध्ये झालेला घोळ यासह माहिती अधिकारात चुकीची माहिती देणे, त्यात खोडतोड करणे यासह अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्यात आला.

याप्रकरणी तत्कालीन महासंचालक गजभिये यांनी निबंधक इंदिरा अस्वार यांना पदमुक्त केले होते. तसेच त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही वरिष्ठांना दिलेल्या पत्रात केली होती. मात्र, निबंधक इंदिरा अस्वार यांनी मॅटमध्ये जाऊन पदमुक्तीवर स्थगिती मिळविली होती. दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, मागील सुनावणीमध्ये सामाजिक न्याय विभागाने पदमुक्त करण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र मॅटला दिल्याची चर्चा आहे. तसेच येत्या ५ एप्रिलला सुनावणी होणार असून त्यांची पदमुक्ती अटळ असल्याची चर्चा आहे.

निबंधक इंदिरा अस्वार यांची विभागीय चौकशी करा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमधील निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार यांची विभागीय चौकशी करावी म्हणून महासंचालकाने सामाजिक न्याय विभागाला पत्र दिले आहे. पदमुक्ती झाल्यावरही त्यांची विभागीय चौकशी होणे आवश्यक आहे.

यावर मात्र, नवीन महासंचालक सुनील वारे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्यांना पुन्हा बार्टीत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नोकरीतून बडतर्फ केलेल्या काही लोकांनाही पुन्हा कामावर घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. माहिती आयोगाने दिलेल्या पत्रानुसार इंदिरा अस्वार यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार महासंचालकांना आहे. मात्र, त्यांचे हात कोणी, कशासाठी बांधले, असा प्रश्न आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आय.एल. नंदागवळी, पुंडलिक घ्यार, विजय मानवटकर आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here