Home महाराष्ट्र अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त सुसंस्कृत विचारांचे कीर्तन; समाजप्रबोधनाचा जागर

अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त सुसंस्कृत विचारांचे कीर्तन; समाजप्रबोधनाचा जागर

83

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.12जून):-अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त गंगाखेड येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत समाजप्रबोधनाचा लाभ घेतला. ११ जून रोजी सायं ७ वा मल्हारराव मित्र मंडळ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जन्मोत्सवानिमित्त हा भव्य सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या प्रभावी प्रबोधनात्मक कीर्तनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. कीर्तनातून महाराजांनी तळीराम प्रवृत्ती, युवापिढीचे प्रश्न, शिक्षणाचे व्यापारीकरण, शेतीतील बिकट परिस्थिती व उत्पन्नाच्या अडचणी यांवर परखड भाष्य केले. जिल्हा परिषदेच्या शाळा वाचल्या पाहिजेत, शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा करावा, तसेच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांच्या मोबाईल वापरावरही नियंत्रण आवश्यक असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. नोंदणी विवाहावेळी मुलीच्या कुटुंबातील किमान एका सदस्याची उपस्थिती अनिवार्य करण्याची मागणीही त्यांनी उपस्थित लोकप्रतिनिधी व श्रोत्यांसमोर मांडली.

महिला-पुरुष, युवक-युवती अशा सर्व घटकांचा हजारोंच्या संख्येने सहभाग लाभला. कार्यक्रमास खासदार संजय जाधव, माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, गटनेते ॲड. मिथिलेश केंद्रे, क्षितीज चौधरी, राष्ट्रीय समाज पक्षाचे अशोक हाके, विलास गावडे, ब्रिजेश गोरे, शिवसेना (उबाठा) गटातील पदाधिकारी, दीपकराव बोराडे, विठ्ठलराव रबदडे (मामा), लिंबाजी देवकते तसेच भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुंमरे आदी मान्यवर उपस्थित होते.

संयोजक समितीतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मल्हारराव होळकर मित्र मंडळाचे मुख्य प्रवर्तक जितेश गोरे यांनी नगराध्यक्षा सौ. उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांच्याकडे मा आ डॉ मधुसूदन केंद्रे यांच्या मार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सुशोभीकरणाऐवजी पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी केली. या मागणीस उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात पाठिंबा दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाळासाहेब टेकाळे, डार्लिंग भुसणर, पंकज मुलगीर, जनार्धन परकड, दत्ता भुसणर, बाळू कुकडे, आकाश होरे, मुंजा भुंमरे, गोविंद खटिंग आदींनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आभार मोतीराम देवकते व पद्युदेव जोशी यांनी केले.

सुसंस्कृत राजकारणाचा संदेश देणारा, समाजाला दिशा दाखवणारा हा कीर्तन सोहळा गंगाखेडकरांच्या स्मरणात राहील, असा सूर उपस्थितांमध्ये दिसून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here