


◾तलाव चौपाटीची ऐशीतैशी ; “थुकपॉलिश” कामांची झाली पोलखोल ; सा. बां. कडे पूर्ण माहिती अधिकार घेणार – विष्णू रणदिवे
✒️किशोर बावणे(विशेष प्रतिनिधी)
साकोली(दि.12जून):-शहरातील मध्यवर्ती नविन तहसिल रोडवर ७ महिन्यांपूर्वी सुमारे ४ करोड रुपये खर्च करून तलाव चौपाटीचे लोकार्पण झाले. परंतु येथे जनतेला असे आढळले की निव्वळ पैसे कमविण्यासाठी हा चौपाटीचा देखावा करण्यात आला. येथे टाईल्स निकृष्ट कामामुळे निघत आहेत. वृक्षांना पाणी नाही. अशी दैन्यावस्था झाली असून यात खरंच ४ कोटी रुपये खर्च केले का.? याचा संपूर्ण अंदाजपत्रक, बिलांसहित माहिती अधिकार संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे घेऊन हा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केला जाईल असा सणसणीत आरोप जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष विष्णू रणदिवे यांनी केला आहे.
◻️मध्यवर्ती तलाव सौंदर्यीकरण करून येथे रोडवरील शासकीय जागा विकल्याचे गैरकृत्य झालेले अतिक्रमणे न हटविता तलाव चौपाटीला सुमारे ४ कोटींचा खर्च आला. याचे उदघाटन १७ ऑक्टोबर २०२५ ला आमदार नाना पटोले यांचे हस्ते संपन्न झाले. आज ७ महिने लोटले येथील गट्टू ( टाईल्स ) निकृष्ट दर्जाची पोलखोल करीत आहेत. असंख्य वृक्ष मृतक झालेली आहेत. चौपाटीच्या आतमध्ये दररोज नशेखोर दारू पितात, सिगारेट ओढतात, अश्लिल चाळे करतात. याचे मागे छायाचित्रांसहीत पुरावे “साकोली सोशल मिडीया” वर आलेले आहेत. म्हणजे जनतेचे ४ कोटी रुपये खर्च करून लिपापोती कार्य करीत सर्व बिले मार्च अंती निकाली काढीत काही अधिकारींनी येथून आपली बदली सुद्धा केली आहे. असा सणसणीत आरोप युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू रणदिवे यांनी केला. तलाव चौपाटी म्हणजे रोडवरून स्पष्ट व दर्शनीय भागात दिसणारे बालोद्यान होय. पण येथे शासकीय भूखंडावरील जागा साध्या स्टँम्प पेपरवर विकून अतिक्रमणे थाटणा-यांना अगोदर न हटविता अतिक्रमण चाळीच्या मागे अदृश्य चौपाटी निर्माण केली. याचा जनतेला काहीच फायदा झालेला नाही. फक्त ४ करोड रूपये काही अधिकारी, संबंधित कंत्राटदार हे येथून कमाई करून गेलेले आहेत. आता यावर येत्या दोन दिवसांत समंधित विभागाला तलाव चौपाटी सौंदर्यीकरण अंदाजपत्रक, साहित्य बिले, शासनाला दाखविलेली रक्कम व सर्व तपशिलवार माहिती ही माहिती अधिकारातून मागविण्यात येत आहे. आणि या प्रचंड भ्रष्टाचारावर उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विष्णू रणदिवे यांनी केला आहे.
————————-
◻️काय म्हणाले जिल्हा उपाध्यक्ष •
“साकोलीत कुणीही काहीही बोलत नाही, याचाच गैरफायदा उचलला आहे. या तलाव चौपाटीत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार असून हा सामान्य जनतेचा पैसा भ्रष्टाचा-यांकडून कसा वसूल करून शासनजमा केला जातो. हे चांगल्यापैकी आम्हाला ठाऊक आहे. आम्ही मृतक असलेले लोकप्रतिनिधी नाही तर जागृत जनतेचे सेवक आहोत” 
— विष्णू नरहरी रणदिवे
“जिल्हा उपाध्यक्ष”
युवक काँग्रेस भंडारा जिल्हा















