


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.29मे):-सध्या सर्वञ जनगणना सुरू आहे. जनगणनेची प्रक्रिया सन २०२७ पर्यंत सुरू राहणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात ११ नविन जिल्ह्याची निर्मिती होणार असे कळते.
नविन निर्माण होणाऱ्या ११ जिल्ह्यात अनेक वर्षापासून मागणी सुरू असलेल्या चिमूर जिल्ह्याचे नाव नाही. चिमूर जिल्हा घोषित करावा, अशी मागणी सर्वप्रथम स्वातंञ्य संग्राम सैनिक व माजी जिल्हा परिषद सदस्य दामोदर काळे गुरूजी यांनी केली. यानंतर अनेक निवेदने, आंदोलने, मोर्चे, बंद घेण्यात आले. चिमूरच्या सर्व नागरिकांचा या मागणीला पाठिंबा आहे.
जिल्ह्यांच्या मागणीसाठी शासनाने एक अभ्यास समिती गठित केलेली होती. त्यात प्रस्तावित २२ जिल्ह्यांचा समावेश होता. चिमूरची ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती पाहू जाता चिमूर जिल्हा होणे अभिप्रेत आहे.
परंतू सध्या सुरू असलेल्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या विचारात घेवून त्यानुसार जिल्हे घोषित केले जातील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. चिमूरला अतिरिक्त जिल्हाधिकारी यापूर्वी देण्यात आलेले आहेत. तसेच जिल्हा पातळीची अनेक कार्यालये याठिकाणी आहेत, परंतू चिमूर जिल्हा होतो किंवा नाही हे सांगणे कठिण आहे.
चिमूर जिल्ह्याचा रेटा सातत्याने शासनदरबारी लावणे गरजेचे आहे. अकरा जिल्ह्यात विदर्भात नागपूरमधुन कळमेश्वर तर यवतमाळमधुन पुसद हे जिल्हये निर्माण होणार असे कळते. परंतू चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचे नाव दिसत नाही. नविन होणाऱ्या जिल्हा निर्मितीच्यावेळी चिमूर जिल्हा व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे.















