Home महाराष्ट्र संघर्षाचा महामेरू माईसाहेब आंबेडकर 

संघर्षाचा महामेरू माईसाहेब आंबेडकर 

122

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी माता रमाबाई यांचे २७ मे १९३५ ला निधन झाले असता बाबासाहेब मानसिकदृष्ट्या बरेच खचले होते. तब्बल १३ वर्षांच्या नंतर ते डॉ. शारदा कबीर यांचेशी विवाह करतात. योगायोगाने शारदा कबीर या सुद्धा बाबासाहेबांच्या रत्नागिरी जिल्ह्यातीलच असतात. दुसरा योगायोग असा की, पुढं डॉ. शारदा कबीर मुंबईला बाबासाहेबांच्या राजगृह बंगल्याच्या जवळच असलेल्या कबुतरखान्या जवळच वास्तव्याला असलेल्या असतात. शारदा कबीर सुद्धा अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या आजारांना सामोरे जात असतात, त्यांनाही वाचनाची आवड अधिक असते, त्यांचाही बौद्ध धर्माकडे कल असतो. त्याही आंतरजातीय विवाहाचे समर्थक असतात. त्यांच्या कुटुंबातून त्यांच्यासह सहा जणांचा आंतरजातीय विवाह होतो.

   डॉ. शारदा कबीर यांचे वडील कृष्णराव विनायकराव कबीर हे आरोग्य खात्यातील औषधी विभागात अधीक्षक म्हणून नोकरीला असतात. ते तसे पुरोगामी विचाराचे होते. मुलींच्या शिक्षणा करिता तो काळ फार उपयुक्त नव्हता तरीही त्यांनी मुलगी शारदा यांना मेडिकलला टाकले. १९३७ मध्ये शारदा कबीर अत्यंत मेहनतीने एम.बी.बी.एस.पास होऊन डॉक्टर होतात. पुढं त्या एम. डी. ला प्रवेश घेतात. एम. डी. चे लेखी पेपर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे दिलेले असतात मात्र प्रॅक्टीकलच्या काही दिवस आधी त्या गंभीर आजारी पडतात. कित्येक दिवस त्या अंथरुणाला खिळून राहतात, त्यांची शरीर प्रकृती कमालीची खालावते तश्याही अवस्थेत त्या अभ्यास सुरूच ठेवतात, पण एकातून दुसरे दुखणे उद्भवत जाते त्यामुळे त्या एम. डी. होऊ शकल्या नाही. 

     आजारपणामुळे एम.डी. चा नाद सोडून दिल्यानंतर अंथरुणावर पडून पडून त्या वैचारिक, धार्मिक ग्रंथ वाचायला लागतात. एखाद्या अधाश्या सारख्या त्या वाचन करू लागतात. त्यातून त्या बौद्ध साहित्याचे प्रचंड वाचन करत गेल्या व १९३७ लाच त्या मानसिकदृष्ट्या बौद्ध होऊन जातात. आजारपणातून बरे झाल्या नंतर त्या गुजरात मधील एका नामांकित इस्पितळात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू होतात. तिथं असतानाही काही दिवसांनी त्यांना पुन्हा मोठा आजार जडतो. कामाचा प्रचंड ताण, आजारपण, काळजी घेणारे कोणी नाही, तिथल्या वातावरणाचा त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत गेल्याने शेवटी त्या राजीनामा देऊन मुंबईला निघून येतात. 

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा साधारण १९२२ पासून वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त राहिलेले आहेत. १९२२ ला बाबासाहेब सीताराम शिवतरकर यांना पत्र पाठवतात त्यात ते अलिकडे प्रकृती अगदी नादुरुस्त झाली आहे असे कळवतात. फेब्रुवारी १९२७ ला दत्तोबा पवार व डिसेंबर १९२७ ला दादासाहेब गायकवाड यांना लिहिलेल्या पत्रात ते तब्येत बरीच खराब असल्याचे कळवतात. पुढं पुढं त्यांचा आजार हा बळावत गेलेला आहे. १९३५ ला रमाबाईंच्या निधनाने ते अजूनच खचून जातात. तेंव्हा त्यांना त्यांची काळजी घेण्याकरिता, वेळीच औषधोपचार करणाऱ्या व्यक्तीची गरज भासते. डॉ. मालवणकर यांच्याकडं नियमित उपचार घेत असल्याने व डॉ. शारदा कबीर तिथं कामाला असल्याने त्यांना बाबासाहेबांच्या आजारपणाची व उपचार पद्धतीची पूर्ण माहिती झालेली असते. १९४७ च्या अखेरीस त्या बाबासाहेबांना नियमित औषध घेण्याचे समजून सांगतात व तुम्ही तुमच्या पत्नीला हे सर्व समजून सांगा म्हणजे त्या वेळोवेळी तुम्हाला गोळ्या देतील. तेंव्हा बाबासाहेब काहीसे रडवेले होतात व मला बायको नाही असे सांगतात तेंव्हा शारदा कबीर यांना गहिवरून येते व येवढ्यामोठ्या महामानवाचे कसे होईल?, त्याने उराशी बाळगलेले स्वप्न कसे पूर्ण होईल? असे प्रश्न त्यांच्या मनात येतात व बाबासाहेबांविषयी त्यांच्या मनात आपुलकी निर्माण होते.

    पुढं बाबासाहेब त्यांना लग्नाची मागणी घालतात तेंव्हा डॉ. शारदा कबीर अत्यंत गोंधळून जातात, त्या डॉ. मालवणकर व त्यांच्या भावाला विचारतात ते दोघं लग्नाला होकार देण्याचा सल्ला देतात. दिनांक १५ एप्रिल १९४८ ला दिल्ली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. शारदा कबीर यांचा नोंदणी पद्धतीने विवाह होतो. या दिवसा पासून त्या सविता आंबेडकर, माईसाहेब म्हणून प्रचलित होतात. बाबासाहेब त्यांना प्रेमानं शरू म्हणत. विवाहानंतर त्या बाबासाहेबांची पुरेपूर काळजी घेतात. संविधान, हिंदू कोड बिल, बुद्धा अँड हिज धम्मा च्या निर्मितीत, बौद्ध धर्म स्वीकारण्यात, धर्मांतर सोहळ्यात त्या सावली प्रमाणे त्यांच्या सोबत असतात. अखेर ६ डिसेंबर १९५६ ला बाबासाहेबांचे महपरिनिर्वाण होते. इथून त्यांच्या खडतर जीवनाला सुरवात होते. अनेक आरोप त्यांच्यावर लावले जातात. त्या अतिशय भयभीत अवस्थेत जगत असतात.

        बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रधानमंत्री पंडित नेहरू त्यांना मेडिकल ऑफिसर म्हणून नोकरी व राज्यसभेचे सदस्यत्व देऊ करतात पण त्या ठाम नकार देतात , पुढं प्रधानमंत्री इंदिरा गांधी त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व देऊ करतात तेंव्हाही त्या नकार देतात. पुढं नामांतराच्या लढ्यात, रिडल्स प्रकरणी त्या स्वतःला झोकून देतात. दलीत पँथर सोबत त्या बरीच वर्षे सक्रिय असतात. बौद्ध धर्मियांना राखीव जागा मिळाव्या, प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांना खडे बोल सुनावतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारत रत्न पुरस्कार मिळावा म्हणून संघर्ष करतात. बाबरी प्रकरणी अयोध्या ही पूर्वीची साकेत नगरी असून बाबरीच्या जागी बुद्ध विहार आहे म्हणून सर्वोच्य न्यायालयात केस दाखल करतात. या प्रश्नाकडं बौद्ध धर्मीय देशांचे लक्ष वेधण्या करिता विविध देशांशी संवाद साधतात. इतरही प्रश्र्नी वेळोवेळी त्या संघर्ष करतात. आंबेडकरी चळवळीत फूट पाडणाऱ्या लोकांना ते तसे न करण्या विषयी वारंवार सांगतात. नवयुवकांना चळवळीत आणण्याचा प्रयत्न करतात. जीवनाच्या अखेर पर्यंत त्या चळवळीत लढाऊ बाण्याने सक्रिय राहतात. दिनांक २९ मे २००३ ला त्यांचे निर्वाण होते.

✒️लेखक:-जयसिंग वाघ(जळगाव)मो:-९८८१९२८८८१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here