Home पुणे महाराष्ट्रासाठी नामुष्की

महाराष्ट्रासाठी नामुष्की

43

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने आणखी एका क्लास चालक व त्याचा मुलाला अटक केल्याची बातमी वर्तमानपत्रात वाचली. नीट पेपर फुटीचा तपास करणाऱ्या सीबीआयकडून आतापर्यंत १३ जणांना अटक केली असून त्यात अनेक मोठे मासे त्यांच्या गळाला लागले आहेत. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असल्याने आणखी मोठे मासे सीबीआयच्या गळाला लागण्याची शक्यता आहे तसेच अनेक धक्कादायक खुलासेही समोर येण्याची शक्यता आहे. सीबीआयने नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत जे १३ आरोपी अटक केले आहेत त्यातील १० आरोपी हे महाराष्ट्रातील असल्याने या पेपर फुटीचे कनेक्शन महाराष्ट्राशी असल्याचे दिसून येत आहे.

अर्थात ही महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही तर लाजिरवाणी बाब आहे. लातूरमधील रसायन शास्त्राचा निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी हा या पेपरफुटी मागचा मास्टर माईंड असल्याचे पुढे आले आहे. त्याच्या बरोबरच मनीषा मांढरे या जीवशास्त्राच्या प्राध्यपिकेलाही पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, लातूर, नागपूर नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांचे या घोटाळ्याशी थेट कनेक्शन आढळून आले आहे. विशेष म्हणजे विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरातून आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मनीषा गुरुनाथ मांढरे, मनीषा संजय हवालदार, पी व्ही कुलकर्णी, तेजस शाह व डॉ मनोज शिरुरे असे पुण्यातून अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत तर लातूरमधून शिवराज मोटेगावकर, अहिल्यानगर मधून धनंजय लोखंडे, नाशिकमधून शुभम खैरनार असे महाराष्ट्रातून अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

विशेष म्हणजे अटक झालेले सर्व आरोपी उच्चशिक्षित डॉक्टर, प्राध्यापक क्लास चालक आहेत. लाखो रुपये पगार घेऊन प्राध्यापकी करणारे आणि ज्यांना देवमाणूस म्हणून समाजात मान दिला जातो अशा डॉक्टरांकडून अशा घटना घडणे धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेला काळीमा फासणाऱ्याच या घटना आहेत. कोट्यवधी रुपये मिळवण्याच्या लालसेने हे उच्चशिक्षित लोक गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत. केंद्रीय शिक्षण विभागाचे देखील हे मोठे अपयश आहे. नीट पेपर फुटीमुळे शिक्षण विभागाचे लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. सर्वसामान्य नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा परीक्षेवरील विश्वासच उडाला आहे. अर्थात नीट सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेचा पेपर फुटण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील दहा वर्षात अशा विविध परीक्षांच्या पेपर फुटीच्या शेकडो घटना घडल्या आहेत.

यामुळे परीक्षांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नीट सारख्या वैद्यकीय परीक्षेच्या क्षेत्रात प्रवेश देणाऱ्या परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी तळमळीने दोन दोन वर्ष अभ्यास करतात. रात्रीचा दिवस करून मेहनत घेतात. त्यांचे एकच स्वप्न असते ते म्हणजे नीट परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन डॉक्टर व्हायचे. मात्र त्यांचे हे स्वप्न ध्वस्त करण्याचे काम कुलकर्णी, मोटेगावकर सारखे लोक करतात. गोरगरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वप्न हिरावून घेणाऱ्या या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. याआधीही असे प्रकार घडले होते तेंव्हाही काही आरोपींना अटक करण्यात आली होती मात्र त्यांच्यावर जरब बसेल अशी कारवाई झाली नाही त्यामुळेच असे घोटाळे पुन्हा पुन्हा घडत आहेत.

कोणतेही गुन्हे केले तरी पैशाच्या जोरावर आपण सहिसलामत सुटू शकतो अशी भावना या गुन्हेगारांमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळेच ते अशाप्रकारचा गुन्हा करुन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली असली तरी ती पुरेशी नाही केंद्र सरकारने या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या आरोपींवर मग तो कितीही मोठा आणि पैसेवाला असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई केलीच पाहिजे. जोवर या लोकांवर जरब बसेल अशी कारवाई होत नाही तोवर या घटना थांबतील असे वाटत नाही. यातील सर्वाधिक आरोपी हे महाराष्ट्राचे असल्याने महाराष्ट्राची मानही शरमेने खाली झुकली आहे. महाराष्ट्रासाठी ही एकप्रकारची नामुष्कीच आहे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालणे गरजेचे आहे. 

✒️श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here