


✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.27मे):-महाराष्ट्राच्या आंबेडकरी आणि विद्रोही राजकारणात मोठी खळबळ उडवणारी राजकीय घडामोड घडली असून विद्रोही पत्रकार, कट्टर आंबेडकरी समर्थक आणि स्वाभिमानी पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत रिपब्लिकन सेनेत सामान्य कार्यकर्ता म्हणून दमदार प्रवेश केला आहे.
केवळ स्वतःचा प्रवेशच नाही…, तर त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भीम आर्मीमधील अनेक प्रभावी व निष्ठावान कार्यकर्त्यांना रिपब्लिकन सेनेच्या झेंड्याखाली आणण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे अनेक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आंबेडकरी चळवळीत नव्या वादळाची चाहूल लागली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पद भूषविल्यानंतरही पद, प्रतिष्ठा, सत्ता आणि राजकीय व्यवहारांपेक्षा बाबासाहेबांचा विचार, स्वाभिमान आणि समाजहित मोठे मानणाऱ्या डॉ. माकणीकर यांनी जुन्या पक्ष नेतृत्वाला कायमचा रामराम ठोकत नव्या संघर्षाची दिशा स्वीकारली आहे.
त्यांचे शब्द आज हजारो कार्यकर्त्यांच्या मनात ज्वाला निर्माण करत आहेत,
*“मला पद नको…, सत्ता नको…, मला फक्त बाबासाहेबांचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचा आहे.”*
मराठवाड्याची शान आणि भावी आमदार म्हणून ओळख असलेले वीरेंद्र लगाडे यांनी डॉ. माकणीकर यांच्या विचारांना नवी दिशा दिली. त्यांच्या आग्रहास्तव डॉ. माकणीकर यांनी श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली निष्ठेने काम करण्याचा निर्धार केला. बाबासाहेबांच्या विचारांसाठी तन-मन-धन आणि प्रसंगी जीव ओतणारे डॉ. माकणीकर आता कोणत्याही पदाच्या अपेक्षेशिवाय रिपब्लिकन सेनेचा एक सामान्य सैनिक म्हणून मैदानात उतरले आहेत.
राज्यातील सर्व जाती, धर्म, पंथ आणि विविध पक्षांमध्ये विखुरलेल्या आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे मोठे मिशन त्यांनी हाती घेतले आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे अब्दुल शफिक शेख, राष्ट्रवादीचे संदीप जाधव, भीम आर्मीच्या राखी वासनिक यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची मजबूत फळी आज रिपब्लिकन सेनेच्या मागे उभी राहत आहे.
राजकीय स्वार्थासाठी नव्हे…, तर विचारांच्या लढाईसाठी लोक एकत्र येऊ लागल्याची भावना आता सामान्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. डॉ. माकणीकर यांच्या विद्रोही शैलीमुळे आणि थेट अन्यायावर प्रहार करणाऱ्या स्वभावामुळे अनेक तरुण कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेकडे आकर्षित होत असल्याचे चित्र दिसत आहे.
“ही केवळ पक्षांतराची घटना नाही…, तर आंबेडकरी चळवळीला नवसंजीवनी देण्यासाठी एका विद्रोही योद्ध्याने उभारलेला नवा लढा आहे,” अशी चर्चा आता महाराष्ट्रभर रंगू लागली आहे.
रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून राज्यात आंबेडकरी विचारांचे प्रबळ वादळ निर्माण करण्यासाठी डॉ. राजन माकणीकर मैदानात उतरले असून आगामी काळात महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवण्याची ताकद या चळवळीत निर्माण होत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.















