


✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
चोपडा(दि.29एप्रिल):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील मराठी विभाग तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने खानदेशातील सुप्रसिद्ध साहित्यिक व चित्रकार तसेच साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू बाविस्कर यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते. यावेळी सत्कारार्थी व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू बाविस्कर तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव डॉ. सौ. स्मिता संदीप पाटील, खानदेशातील सुप्रसिद्ध साहित्यिक, कविवर्य अशोक सोनवणे, विनोदी साहित्यिक विलास पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व माजी प्राचार्य राजेंद्र महाजन, विजय पवार, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे, सौ.भारती बाविस्कर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. एन.सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.के. एन.सोनवणे यांनी केले.
यावेळी खानदेश कवी अशोक सोनवणे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘साहित्यिक राजू बाविस्कर यांना मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार हा खानदेशी मातीचा गौरव आहे.साहित्यिक राजू बाविस्कर यांनी ग्रामीण भागातील मानवी जीवनाचे सखोल चित्रण केले असून खानदेश भूमीचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेले, हा मोठा सन्मान आहे.’ साहित्याचे अभिसरण समाजात झाले तर साहित्याला चांगले दिवस येतील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी माजी प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी आपल्या मनोगतात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त राजू बाविस्कर यांचे बालपण, शिक्षण, दारिद्र्य, संघर्ष, प्रतिकूल परिस्थितीवर केलेली मात, आत्मचरित्र लेखनामागील प्रेरणा यावर प्रकाश टाकला. ‘साहित्यिक राजू बाविस्कर यांच्या लेखनात अतिशयोक्ती नाही तर प्रामाणिकपणाचे व वास्तवांचे पडसाद उमटले आहेत’, असेही यावेळी ते म्हटले.
याप्रसंगी सत्कारार्थी राजू बाविस्कर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘साहित्य अकादमी पुरस्कार हा माझ्या खान्देशी माणसांचा, मातीचा सन्मान आहे. ज्या मातीतून घडतो, त्या मातीशी लेखकाने नाळ जोडून ठेवावी. माझ्या जीवनात चांगल्या माणसांची साथ मिळाली त्यामुळे समाजातील माणसांनीच माझ्यासारख्या लेखकाला मोठे केले . समाजामध्ये जगत असताना माणसांमधील करुणा मला दिसली त्यातून माझी लेखणी घडत गेली, हा साहित्यातील पात्रांचा सन्मान आहे. यावेळी त्यांनी बँड वादक ते चित्रकार पर्यंतचा प्रवास तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील व माजी शिक्षणमंत्री कै. ना. अक्कासो. शरच्चंद्रिका सुरेश पाटील यांच्या सोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड.संदीप सुरेश पाटील आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजू बाविस्कर यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्गक्रमण करीत यश संपादन केले. त्यांच्या वेदना साहित्यातून मांडल्या. त्यांना शब्द रूप देऊन समाजातील पात्रांना जिवंत केले म्हणून हा चोपड्यासारख्या ग्रामीण खानदेशी भूमीचा सन्मान आहे’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी केले तर आभार सौ.सुनीता पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागातील डॉ. एम.एल.भुसारे, एस.जी. पाटील व जीवन पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी बंधू- भगिनी उपस्थित होते.














